Sunday, 6 September 2015

जागतिकीकरणाच्या युगात स्वदेशी - गृहमंत्री राजनाथ सिंग

जागतिकीकरणाच्या युगात स्वदेशीची संकल्पना अद्यापही महत्वाची असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचे प्रतिपादन

मुंबई, 5-9-2015

सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये स्वदेशी ही संकल्पना अतिशय महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी केले आहे.  मुंबईत इंडियन मर्चंटस् चेंबरच्या आंतरराष्ट्रीय पर्यायी वाद निवारण केंद्रामध्ये वेद प्रकाश गोयल कक्षाचे आज त्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. या संकल्पनेकडे सध्याच्या कालखंडात दुर्लक्ष होणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. भारत अद्यापही विकसित देश का बनू शकला नाही, याच्या कारणांचा शोध घेतल्यावर स्वदेशीचे महत्व लक्षात येईल, असे ते म्हणाले. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेचे एक स्वरुप असते, एक स्वभाव असतो, त्यानुसार त्या देशाच्या विकासाच्या संकल्पना निश्चित होत असतात. मात्र, आतापर्यंत कोणत्याही संसाधनाची  कमतरता नसलेल्या भारताला इतर देशांच्या आर्थिक विकासाच्या मॉडेलवर वाटचाल करावी लागल्यानं भारताचा अपेक्षित विकास होऊ शकला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

महागाईच्या मुद्यावर सरकारवर होत असलेल्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. काही निवडक वस्तूंच्या भाववाढीला हवामान आणि इतर घटक जबाबदार असतात. परंतु एकंदर भाववाढीचा विचार केला तर सरकारनं घाऊक दर निर्देशांक आणि ग्राहक दर निर्देशांक नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलं आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. यामुळेच रिझर्व्ह बँकेला दर कपातीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे, असं त्यांनी सांगितलं. सरकारच्या न्याय्य आणि पारदर्शक धोरणांमुळे देशात मोठ्या प्रमाणावर महसूल निर्मिती होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कोळसा खाण लिलाव, स्पेक्ट्रम लिलाव यातून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.  या सरकारनेच भांडवलशहा आणि सरकार यांच्यातल्या साटेलोट्यांना प्रतिबंध केला आहे असे ते म्हणाले.  भ्रष्टाचार निर्मूलनाच्या पातळीवर सध्याच्या सरकारच्या कामगिरीमुळे जगात पहिल्यांदाच भ्रष्टाचारमुक्त भारत अशी देशाची प्रतिमा निर्माण झाली असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केल्यामुळे गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 

भारताच्या काही शेजारी देशांकडून कुरापतखोर कारवाया सुरू असल्या तरी भारताने त्यांच्याबाबत आकसाची भूमिका न ठेवता वसुधैव कुटुंबकम् म्हणजेच हे विश्व एका कुटुंबाप्रमाणे आहे, अशी भूमिका सातत्याने घेतली आहे, असे ते म्हणाले. भारतामध्ये सर्व प्रकारच्या संसाधनांची उपलब्धता मुबलक प्रमाणात असल्याने भारत महासत्ता बनेल असे म्हणण्यापेक्षा भारत जगद्‌गुरू बनेल, असे म्हणायला आपल्याला आवडेल, असे राजनाथ सिंग यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, इंडियन मर्चंटस् चेंबर्सचे अध्यक्ष दीपक पिरामल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

  
  


No comments:

Post a Comment