Sunday, 6 September 2015

व्यवसाय करण्याची प्रक्रिया सोपी

व्यवसाय करण्याची प्रक्रिया सोपी करण्याला चालना देण्यासाठी सरकार ई-बिझ मंचावर अधिक सेवांचा समावेश करणार

मुंबई, 5-9-2015

देशामध्ये व्यवसाय करणे सोपे करण्यासाठी केंद्र सरकार ई-बिझ या संगणकीय मंचावर  अधिक सेवांचा समावेश करणार आहे. सध्या ई-बिझ मधून उपलब्ध असलेल्या 14 सेवांमध्ये वाढ करून यावर्षाखेर पर्यंत त्या 26 वर नेण्याचा सरकारचा विचार आहे. औद्योगिक धोरण आणि चालना विभागाचे (डीआयपीपी) सचिव अमिताभ कांत यांनी आज मुंबईत मनी लाईफ फाऊंडेशनच्या चर्चासत्रात ही माहिती दिली. ठराविक काळामध्ये आम्ही राज्य आणि केंद्र सरकारच्या सेवांचे एकात्मिकरण करणार असून त्यामुळे केवळ एकाच कागदावर एकाच वेळी शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यानं भारतामध्ये व्यवसाय करणे अतिशय सहज सोपे होईल, असे त्यांनी सांगितले.

जागतिक व्यवसाय सुलभतेच्या तक्त्यामध्ये भारत अतिशय खाली 142 व्या क्रमांकावर आहे. भारताच्या या क्रमवारीत सुधारणा करण्याची सरकारची तीव्र इच्छा आहे. डीआयपीपीने गेल्या 1 वर्षात अस्तित्वात असलेले विविध नियम शिथिल करून आणि त्यांना व्यवहार्य बनवून या दिशेने पुढाकार घेतला आहे. तसेच माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रशासक प्रभावी आणि कार्यक्षम बनवण्यात योगदान दिले आहे. 

सध्याच्या काळात भारतामध्ये व्यवसायाला अनुकूल असे वातावरण नव्हते, हे कांत यांनी मान्य केले. मात्र, विविध प्रकारच्या परवानग्यांची चौकट आपण भंग करू शकलो तर भारत एक उत्पादक राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण करू शकेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी एका विशेष प्रकारच्या मानसिकतेची आवश्यकता असून हे एक मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले. विविध सेवांचे विलीनीकरण आणि एकात्मिकरण करून भारतानं तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. आपल्या व्यवस्थेमध्ये असलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे नष्ट केली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी कागदोपत्री व्यवहार कमी करून ऑनलाईन व्यवहारांवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. व्यवसाय सुलभतेच्या क्रमवारीच्या आधारे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय लवकरच देशातल्या राज्यांची यादी प्रसिध्द करणार असल्याची माहिती अमिताभ कांत यांनी दिली. राज्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ही एक सकारात्मक बाब असून गुंतवणूकदारांना त्याचबरोबर जनतेला कोणती राज्ये उत्तम पध्दतीने आणि कोणती वाईट पध्दतीने काम करत आहेत हे दिसून येईल, असे ते म्हणाले. पुढील आठवड्यात ही यादी प्रसिध्द होईल अशी माहिती त्यांनी दिली. 

केरळच्या पर्यटनाची ‘प्रत्यक्ष देवांची भूमी’ या जाहिरातीचे आणि त्यानंतर ‘अतुल्य भारत’ या जाहिरातीचे शिल्पकार असलेले अमिताभ कांत यांनी ब्रॅडींगचे महत्व स्पष्ट करतांना सांगितले की, ही संकल्पना केवळ जाहिरातीपुरती मर्यादित न ठेवता उत्तम उत्पादनाच्या वितरणाशी निगडित असली पाहिजे. ब्रॅण्ड निर्मिती ही वस्तू लोकांपर्यंत पोहचवण्याशी संबंधित असली पाहिजे. चांगली जाहिरात, चांगले उत्पादन आणि चांगले वितरण यांचा मिलाप असला पाहिजे, असेही ते म्हणाले. कॉर्पोरेट ब्रॅण्डच्या जाहिरातींपेक्षा सार्वजनिक क्षेत्रातल्या जाहिराती अधिक आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. मेक इन इंडिया ही मोहिम भारताला जागतिक पातळीवरील उत्पादन क्षेत्रात महत्वाचा उत्पादक म्हणून पुढे आणण्याशी, थेट परकीय गुंतवणूक प्रणालीत उदारीकरण निर्माण करण्याशी, भारताला नवनिर्मितीचे केंद्र बनवण्याशी आणि जागतिक पुरवठा साखळीतील एक दुवा अशी भारताची ओळख निर्माण करण्याशी संबंधित आहे.

No comments:

Post a Comment