तोफखाना केंद्रातील जवानांचा शपथविधी
नाशिक : आपण कोणत्या राज्यातून आलो आहोत, कुठल्या जाती-धर्माचे आहोत हे विसरून जावे. कारण एका सैनिकासाठी त्याचा देश व त्या देशाचा सन्मान हीच महत्त्वाची बाब असते. त्यामुळे आपण सर्वप्रथम भारतीय आहोत व भारताच्या मान-सन्मानासाठी सांघिक कामगिरीच्या बळाचा वापर करा, असे आवाहन दक्षिण आर्टिलरी कमांडचे मेजर जनरल अरुण खन्ना यांनी केले.
नाशिकरोड आर्टिलरी सेंटर व रेजिमेंट ऑफ आर्टिलरीच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा केंद्राच्या परेड मैदानावर लष्करी थाटात पार पडला. यावेळी खन्ना प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी उपस्थित जवानांना प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त करताना सांगितले, तुम्ही सैन्य दलामधील तोफखाना विभागात येऊन देशसेवा करण्याचा घेतलेला निर्णय अभिमानास्पद आहे. आपल्या कर्तव्याची सदैव जाणीव ठेवून सांघिक कामगिरीचे बळ लक्षात घेऊन शत्रूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहून शारीरिक व नैतिक धाडसाच्या बळावर देशाचा मान-सन्मान उत्तरोत्तर उंचविण्याचा प्रयत्न करा व आपल्या पालकांबरोबरच संपूर्ण देशवासीयांना गर्व होईल, अशी कामगिरी बजवावी, असे आवाहन खन्ना यांनी यावेळी नवसैनिकांना केले.
नव्याने लष्करात दाखल झालेल्या जवानांना संपूर्ण सैन्य प्रशिक्षण देणारे नाशिकरोड देवळाली आर्टिलरी सेंटर हे भारतातील सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रात दरवर्षी सुमारे ३000 ते ४000 निवड झालेले नवसैनिक प्रशिक्षणासाठी दाखल होतात.
या नवसैनिकांचा प्रशिक्षण कालावधी ४२ आठवड्यांचा असतो. यामध्ये १९ आठवड्यांच्या कालावधीत या जवानांना सैन्य दलाच्या प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते. तोफखान्यातील ३0६ सैनिकांनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करत उपस्थित लष्करी अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली देशसेवेची शपथ घेतली.
'मेरी संतान देश को सर्मपित'
महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, तामिळनाडू, केरळ, पंजाब आदि राज्यांमधून आलेल्या नवसैनिकांच्या माता-पित्यांचाही लष्कराच्या वतीने 'गौरव पदक' देऊन सन्मान करण्यात आला. पदक प्रदान कार्यक्रमात देशाच्या विविधतेत असलेली एकता दिसून आली. यावेळी उपस्थित जवानांच्या आई-वडिलांनी आपापल्या राज्यांमधील पारंपरिक पोशाख परिधान केला होता व एका रांगेत आपल्या सैनिक मुलासमवेत उभे राहून अधिकार्यांच्या हस्ते पदक स्वीकारले. सदर पदकावर लष्कराच्या बोधचिन्हासह 'इंडियन आर्मी' असे इंग्रजीत व हिंदीत 'मेरी संतान देश को सर्मपित' असे वाक्य लिहिलेले होते. 'मेरी संतान देश को सर्मपित'
यांचा झाला विशेष गौरव
४२ आठवड्यांच्या लष्करी प्रशिक्षणादरम्यान सर्वच गटांमध्ये ३0६ जवानांपैकी उत्कृष्ट कामगिरी करत लक्ष वेधून घेणार्या एकूण नऊ जवानांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सुशीलकुमार तिवारी, पंकज सिंग (गनर), प्रदीप सिंग, (तांत्रिक सल्लागार), रमित धतवाला, बिजेंदर यादव (चालक), प्रभाकर सिंग, महादेव बाबर यांचा समावेश आहे. तसेच मनजित सिंग या नवसैनिकाने सर्वच गटात चमकदार कामगिरी क रत उत्कृष्ट अष्टपैलूचा किताब पटकाविला.
No comments:
Post a Comment