पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते "बेटी बचाव बेटी पढाव" मोहिमेचे उद्घाटन
"मुलींच्या आयुष्यासाठी भिक्षा मागण्याकरिता भिक्षूक म्हणून आपण आलो असल्याचे" भावनिक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला केले. "बेटी बचाव, बेटी पढाव" या राष्ट्रीय मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी आज हरियाणातल्या पानिपत येथे ते प्रचंड संख्येने जमलेल्या जनसमुदायासमोर बोलत होते. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जोपर्यंत आपण 18 व्या शतकातल्या मानसिकतेला धरुन आहोत तोवर आपल्याला 21 व्या शतकातले नागरिक म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असे खडे बोल सुनावून स्त्रीभ्रूणहत्येचे मूळ असणारा मुलामुलीमधला भेदभाव संपुष्टात आणण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. हे संपवणे ही आपल्या प्रत्येकाची सामुदायिक जबाबदारी आहे. अन्यथा आपण आपल्या सध्याच्या पिढीच्या नुकसानासाठी तर जबाबदार ठरूच, याखेरीज पुढल्या पिढयांसाठी मोठे संकट निर्माण करू, असे पंतप्रधान म्हणाले.
स्त्री-भ्रूणहत्येमध्ये सहभागी होणाऱ्या डॉक्टरांनाही पंतप्रधानांनी खडे बोल सुनावले. वैद्यकीय शिक्षण जीव वाचवण्यासाठी असते, मुलींना ठार करण्यासाठी नाही, याची आठवण त्यांनी डॉक्टरांना करून दिली. हा कार्यक्रम हरियाणातल्या पानिपत येथे आयोजित केला असला तरी आपला संदेश देशभरात सर्वत्र लागू आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मुलीच जन्माला आल्या नाहीत तर तुम्हाला सुना कशा मिळणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अनेक जणांना शिकलेल्या सुना हव्या असतात पण आपल्या स्वत:च्या मुलींना शिकवायला ते इच्छुक नसतात, हा ढोंगीपणा संपला पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.
पानिपतमधले सुप्रसिध्द उर्दू विद्वान अल्ताफ हुसेन हाली यांच्या ओळी पंतप्रधानांनी उद्धृत केल्या – "भगिनींनो, मातांनो, मुलींनो तुम्ही जगाचे अलंकार आहात, तुम्ही राष्ट्रांचा प्राण आहात, संस्कृतींचा सन्मान आहात" मुलींना दिल्या गेलेल्या महत्वाबाबत प्राचीन धर्मगंथांमधली वचनेही त्यांनी उद्धृत केली.
मुली कशा प्रगती करू शकतात आणि कसे नाव कमावू शकतात हे समजावण्यासाठी पंतप्रधानांनी मूळची हरियाणाची असलेली अंतराळवीर कल्पना चावलाचे उदाहरण देऊन तिच्या आठवणींना उजाळा दिला. मुली क्रीडा, शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रात उत्तम प्रगती करत असून कृषी क्षेत्रातही त्या महत्त्वाचे योगदान देत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
आईची प्रकृती गंभीर असतानाही या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षितचे आभार मानले. यातून त्यांची प्रतिबद्धता दिसून येत असून अशीच प्रतिबद्धता समाजात लिंग भेदभाव दूर करण्यासाठी आवश्यक आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी यावेळी वाराणसीतल्या जयापूर गावाचेही उदाहरण दिले. आपल्या सल्ल्यानुसार आता हे गाव प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर आनंदोत्सव साजरा करते आणि पाच झाडे लावते. देशभरातल्या जनतेने हे उदाहरण घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
मुलींच्या लाभासाठी "सुकन्या समृध्दी खाते" पंतप्रधानांनी सुरू केले. तसेच "बेटी बचाव बेटी पढाव" अशी प्रतिज्ञा देणाऱ्या स्टॅम्पचेही अनावरण केले.
देशवासी आणि सरकार यांनी मिळून काम केले तरच ही योजना यशस्वी होऊ शकते असे केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी सांगितले. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि तात्काळ सहाय्य पुरवण्यासाठी "वन स्टॉप क्राइसिस सेंटरच्या" स्थापनेची घोषणाही गांधी यांनी केली.
मुलींना पोषक आहार आणि शिक्षण देऊन त्यांना सबल करण्याचे आवाहन विशेष आमंत्रित सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षित-नेने यांनी जनतेला केले. सरकारच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आणि यामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल व्हायला मदत मिळेल, अशी आशा माधुरी दिक्षित-नेने यांनी व्यक्त केली.
हरियाणाचे राज्यपाल प्राध्यापक कप्तान सिंग सोलंकी, मुख्यमंत्री मनोहर लाल, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, स्मृती इराणी, जे.पी.नड्डा, राव इंद्रजित सिंग, बिरेंदर सिंग आणि के. पी. गुज्जर हे देखील यावेळी उपस्थित होते
बेटी बचाव, बेटी पढाव योजनेची ठळक वैशिष्टये
• बाल लिंग दर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींचे सबलीकरण करणे, हे सरकारच्या महत्त्वाकांक्षी “बेटी बचाव, बेटी पढाव” या योजनेचे उद्दिष्ट आहे. 2014-15 च्या अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार सुरुवातीला 100 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी करण्यात येणार आहे.
• सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश मिळून देशातल्या निवडक 100 जिल्हयात ही योजना राबविण्यात येणार आहे. या जिल्हयात बाल लिंग दर, हा 1000 मुलांमागे 918 मुली या राष्ट्रीय दरापेक्षा कमी आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय संयुक्तपणे ही योजना राबविणार आहेत.
• या योजनेची व्याप्ती : अंदमान-निकोबार बेटे (1), आंध्र प्रदेश (1), अरुणाचल प्रदेश (1), आसाम (1), बिहार (1), चंदिगड (1), छत्तीसगड (1), दादरा-नगर हवेली (1), दमण व दिव (1), गोवा (1), गुजरात, हरियाणा (12), हिमाचल प्रदेश (1), जम्मू काश्मीर (5) (5), झारखंड (1), कर्नाटक (1), केरळ (1), लक्षद्विप (1),मध्य प्रदेश (4), महाराष्ट्र (10),मणिपूर (1), मेघालय (1),मिझोराम(1), नागालँड (1), दिल्ली (5), ओदिशा (1), पुद्दूचेरी (1), पंजाब (11), राजस्थान (10), सिक्कीम (1), तामिळनाडू (1), तेलंगणा (1), त्रिपुरा (1), उत्तरप्रदेश (10),उत्तराखंड (2), पश्चिम बंगाल (1)
• बेटी बचाव, बेटी पढाव योजनेंतर्गत महाराष्ट्रातले 10 जिल्हे: बीड, जालना, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, वाशिम, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि सांगली.
• 2011 च्या जनगणनेनुसार सीएसआर (बाल लिंगगुणोत्तर) आणि 2015-16 मधील जिल्हयानुसार गाठण्याचे उद्दिष्ट : बीड 2011 चा सीएसआर 807 (उद्दिष्ट 925), जालना 870 (उद्दिष्ट 938), जळगाव 842 (899), अहमदनगर 852 (929), औरंगाबाद 858 (880), बुलडाणा 855 (872), वाशिम 863 (928), उस्मानाबाद 867(928), कोल्हापूर 863 (910) आणि सांगली 862 (उद्दिष्ट 865).
• योजनेअंतर्गत महत्त्वाच्या बाबी – गर्भधारणेची पहिल्या तिमाहीतच अंगणवाडी केंद्रांमध्ये नोंद, एकात्मिक बाल विकास योजनेची सेवा विस्तारणे, रुग्णालयात प्रसूती करण्याचे प्रमाण वाढवणे, जन्मनोंदणी आणि गर्भपूर्व निदान तंत्रज्ञान कायद्याची काटेकोर अंमलबजावणी.
• शिक्षण हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, मुलींची शाळांमध्ये नोंदणी, मुलींना अनुकूल अशा शाळांना प्रोत्साहन, मुलींच्या शाळागळतीचा दर घटण्यासाठी पावले उचलणे, यांचा “बेटी पढाव” उपक्रमात समावेश आहे. याखेरीज मुलगे-केंद्रीत रुढीरिवाजांमध्ये बदल घडवणे यावरही याअंतर्गत भर दिला जाणार आहे.
• “बेटी बचाव बेटी पढाव” मोहिमेसाठी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दिक्षितची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
-आंतरजालावरून सादर
No comments:
Post a Comment