Monday, 15 December 2014

ज्येष्ठांच्या कल्याणासाठी विधायक पाऊल

ज्येष्ठांच्या कल्याणासाठी विधायक पाऊल
ज्येष्ठांसाठी कायदे करून प्रश्न सुटणार नाही, तर त्या कायद्यांचा त्यांना लाभ कसा होईल हे महत्वाचे आहे. ई-जीवन प्रमाणपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणे ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे, असे मत सुर्वेनगर येथील आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळाने व्यक्त केले आहे. यापुढे आम्ही ऑनलाइनच जीवनप्रमाणपत्र सादर करू असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा घेऊन ज्येष्ठांना या कायद्याची माहिती करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा कार्यक्रम आखला आहे.
सुर्वेनगर, त्रिमुर्तीनगर, आझाद हिंदनगर, अध्यापक ले-आउट, सुमितनगर, इरिगेशन कॉलनी, लोककल्याण सोसायटी, गोरले ले-आउट, शास्त्रीनगर, पन्नासे ले-आऊट, भांगे विहार, जयताळा आदी भागातील ज्येष्ठांमध्ये जनजागृती करण्याचे काम या मंडळाने हाती घेतले आहे. मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव रक्षक, सचिव राम पवनारकर, मधुकर काकडे, वसंत आष्टनकर, प्रकाश महाजन, वामनराव दिघेकर, देवराव शोभणे, अशोक बन्सोड, जितेंद्र भोयर, घनश्याम खेमुका, कृष्णा खोब्रागडे, डॉ. विजय, एन. इंगोले आदी सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फेस्कॉमचे सचिव मनोहर खर्चे उपस्थित होते.
'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमांच्या माध्यमातून या मंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यासपीठ निर्माण करून दिले. ज्येष्ठांना आलेल्या अनुभवांची देवाण-घेवाण करणे आणि जीवन जगण्याचा मार्ग सुकर करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे पवनारकर यांनी सांगितले. ज्येष्ठांसाठी सुविधा निर्माण करण्याबरोबर सामाजिक भान ठेऊन कार्य करण्याची शपथही या मंडळाने घेतली. रुग्णांना मदत व्हावी यासाठी रुग्ण मदत केंद्र स्थापन करण्याचा मानस या मंडळातील सदस्य जितेंद्र भोयर यांनी बोलून दाखविला. शासनाच्या योजना आणि ज्येष्ठ नागरिक मंडळांचे विधायक उपक्रम यांची योग्य सांगड निर्माण झाली तर ज्येष्ठांसाठी पुढचे आयुष्य नक्कीच आनंददायी ठरेल, असा विश्वासही ज्येष्ठांनी व्यक्त केला.

1 comment: