Thursday, 29 February 2024

कलेकडे झुकलेली मराठी भाषा अधिक समृद्ध आहे. - दीपक करंजीकर

मुंबई : (रवींद्र मालुसरे ) - शास्त्राशी जोडलेलया भाषा आणि कलेशी जोडलेलया भाषा यामध्ये मराठी ही भाषा संपूर्णपणे कलेकडे  झुकते. ४८ वर्ण, व्यंजने, त्यातले स्वर, उच्चराधित शब्द त्यातून तयार होणारी बोली यातून तयार होणारे पर्यावरण मराठी भाषेशिवाय कुठेही नाही. त्यामुळे मराठीला मी बेलबुट्टीची भाषा समजतो. भारतावर ७०० वर्षात अनेक आक्रमणे होऊनही हा देश स्वतःची संस्कृती जपत सर्वाना सामावून घेऊन उभा आहे. तसेच मराठीचे झाले आहे.  आपली भाषा ही विस्तृत झाली आहे. मराठीतले अनेक शब्द इंग्रजीमध्ये प्रमाण म्हणून गेले आहेत. त्यामुळे मराठीच्या भविष्याबद्दलचा न्यूनगंड काढून टाका अहंगंड बाळगायला हरकत नाही मात्र आहे तो गंड बाळगायला हरकत नाही. सुंदरतेची आस असणारी महत्वाची देशातली भाषा म्हणजे मराठी भाषा आहे.भाषा हा आपल्या जगण्याचा अपरिहार्य भाग  आहे असे मला वाटते. असे प्रतिपादन विख्यात लेखक, अभिनेते आणि सुजाण विचारवंत दीपक करंजीकर यांनी व्यक्त केले. दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्टस, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रम दादर येथे आयोजित करण्यात आला होता. ते पुढे असेही म्हणाले की,  जगात १० कोटी लोकांकडून बोलली जाणारी मराठी ही १० व्या क्रमांकाची भाषा आहे. भाषा दोन प्रकारे व्यक्त होते एक भाषेत पुस्तकं छापली जातात आणि ती बोलली जाते. आपली मराठी भाषा  १३२ देशांमध्ये पोहोचली आहे. दरवर्षी ५०० दिवाळी अंक आणि २००० पुस्तके निघतात आणि देशातल्या अनेक भाषांमध्ये काहींची भाषांतरे होतात. प्रत्येक क्षेत्रांत मराठी माणसाने जे काम केले आहे ते माईलस्टोन ठरले आहे. जी.  ए. कुलकर्णी यांच्यापेक्षा जगात कुणी मोठे नाही. शेक्सिपयरपेक्षा कानेटकरांच्या नाटकांचे विषय पाहिले तर त्यांचा पट मोठा आहे.


साहित्यप्रेमी आणि ज्येष्ठ स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी आपल्या भाषणात म्हणाले की, दिवाळी अंकांची कल्पना महाराष्ट्रातील काशिनाथ रघुनाथ मित्र यांना सुचली ती बंगालच्या दुर्गापूजा अंकामुळे असे अनेक जण आजही बोलताना व लिहिताना दिसतात , परंतु हे चूक आहे हे आता  सिद्ध झालेले आहे, तरीसुद्धा ही चूक दुरुस्त करण्याची तसदी आपले लोक का घेत नाहीत ही गोष्ट बंगाली आणि इंग्रजी दैनिकांतून ठसठशीतपणे यायला हवी. दिवाळीचा सण दिवाळी अंकांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मराठी संस्कृतीत अढळ स्थान लाभलेल्या या दिवाळी अंकांच्या वैभवशाली परंपरेचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले की,  ‘दिवाळी-दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ या उक्तींमधील आनंद दिवाळी साजरा करण्यातील अनेक गोष्टींइतकाच दिवाळी अंक हा त्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो.  गेली ११४ वर्षे मराठी साहित्याचा हा जागर अखंड होत आहे. तो वृद्धिंगत करतांना मराठी वृत्तपत्र लेखक संघाचाही खारीचा वाटा आहे. हे सातत्य इतर भाषांमध्ये फारसे घडताना दिसत नाही. दिवाळी अंकांनी मराठी साहित्यातील विविध प्रकार हाताळले असून, त्यातून अनेक लेखक-साहित्यिक नावारूपास आले आहेत.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख आणि विशेष कार्यअधिकारी मंगेश चिवटे यांना यावेळी संस्थेचे सन्माननीय सभासदत्व प्रदान करण्यात आले. चिवटे यांनी महाराष्ट्रातील  गोरगरिबांच्यासह सर्वांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कल्पनेतून आरोग्य कक्षाच्या माध्यमातून किती प्रमाणात आर्थिक मदत आणि  सर्वोतोपरी सहकार्य केले जाते याचा समग्र आढावा आपल्या भाषणात घेतला. त्याचप्रमाणे मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसेनानी आणि पत्रमहर्षी मनोहरपंत चिवटे यांच्या स्मरणार्थ दिवाळी अंकांच्या पुरस्कारासाठी ७५ हजार रुपयांची देणगी दिली. त्याचबरोबर संस्थेच्या जागेच्या अडचणींचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. विख्यात शल्य चिकित्सक डॉ प्रणय पाठारे यांनी बालमोहनमध्ये मराठी भाषेत शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टरकी करताना ती कसोशीने जपण्याचा प्रयत्न करतो यावेळी अनुभवाला येणाऱ्या गमती जमती त्यांनी आपल्या खूखूशीत भाषणात सांगीतल्या. संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी प्रास्ताविक केले.  गेली ४९ वर्षे दिवाळी अंक प्रदर्शन आणि स्पर्धेची परंपरा संस्थेच्या अडचणीच्या काळात कशी पार पाडली जात आहे याच्यासह संस्थेच्या आणि भविष्यातील कार्याचा समग्र आढावा त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात घेतला.
 यावेळी व्यासपीठावर दादर सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती शुभा द कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे विश्वस्त ऍड. देवदत्त लाड, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड उपस्थित होते.  'ग्रंथ तुमच्या दारी' या उपक्रमाचे जनक नाशिकचे  विनायक रानडे यांना ग्रंथालय चळवळीतील दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते "स्व. दत्ता कामथे स्मृती ग्रंथसखा' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अवतरण सकाळ (मुंबई ) साठी मनोरंजनकार' का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंकाचा पुरस्कार ज्येष्ठ वृत्तसंपादक जयवंत चव्हाण आणि  मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक - मनोरमा संपादिका सौ शोभा श्रीकांत मोरे सोलापूर यांनी स्वीकारला.
अक्षर, वेदान्तश्री, सामना, उद्याचा मराठवाडा या संपादकांसह द इनसाइट या अंकाचे  संपादक पत्रकार सचिन परब यांनी तर संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्व विजया मनोहर कोळस्कर स्मृती अमृतप्रेरणा पुरस्कार काही दिवाळी अंकांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत ज्येष्ठ कामगार नेते स्व वसंतराव होशिंग स्मृती 'माझ्या बोलीभाषेचे मराठी साहित्य आणि व्यवहारातील स्थान' आणि पार्थ फाउंडेशन पुरस्कृत 'मराठी भाषेची चिंता आणि चिंतन' या विषयावर स्वबोलीभाषेत कुसुमाग्रजांना पत्र या दोन राज्यस्तरीय लेखस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर आणि कार्यवाह नितीन कदम यांनी केले. दिगंबर चव्हाण, दत्ताराम गवस, विजय ना कदम, सुनील कुवरे, राजन देसाई, श्रीराम मांडवकर, पंकज पाटील, दिलीप ल सावंत आदी कार्यकर्त्यानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment