शतकानुशतके काळाचा प्रवाह अव्याहत चालत असताना एखादाच असा क्षण येतो ज्या क्षणाला मानवी सभ्यतेच्या इतिहासात 'भाग्यवंत' असण्याचं कोंदण लाभतं. भूतकाळातल्या कित्येक पिढ्या आणि भविष्यातल्याही कित्येक पिढ्यांनी हेवा करावा असा हा भाग्यवंत क्षण अनुभवण्याचे भाग्य मिळायला पूर्वसंचितच असायला पाहिजे. कोणत्याही हिंदू व्यक्तीच्या जन्मात असा क्षण येणं किती कठीण !
मला विचाराल तर जे क्षण 'अनुभवायला मिळाले असते तर.. ' असं मला वाटतं ते म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या मुखातून भगवद् गीता ऐकणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याची देही याची डोळा पाहणे आणि तिसरा म्हणजे प्रभू रामचंद्राचे अयोध्येत पुनरागमन अनुभवणे.
असत्यावर सत्याचा विजय, अनीतीवर नीतीचा विजय या सनातन तत्वाचा उद्घोष करणारे हे क्षण…
सत्प्रवृत्तीवरच्या अखंड श्रद्धेच्या विजयाचे हे क्षण…
कर्मयोगाचे महत्त्व सांगणारे आणि पौरुषाला आवाहन करणारे हे क्षण…
येत्या २२ तारखेला असाच एक ‘भाग्यवंत क्षण’ जगण्याचे 'भाग्य' तुम्हा-आम्हाला लाभते आहे. "जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले । म्हणोनि विठ्ठले कृपा केली ।।" जगतगुरु तुकोबाराय म्हणतात अगदी तशीच भावना आपल्या सर्वांच्या मनात आली तर ती नक्कीच योग्य आहे.
परकीय आक्रमकांच्या जुलुमाच्या, धर्मांध विकृतीच्या खुणा म्हणजे राष्ट्रपुरुषाच्या अंगावरच्या भळभळत्या जखमाच. या जखमा कित्येक शतकांच्या कालावधीनंतरही आपण सहन करत होतो. कित्येक पिढ्या हा कलंक पुसण्यासाठी अनेकविध मार्गांनी झिजल्या. आपल्याकडून ती जखम भरली गेली नाही, तो कलंक पुसल्या गेला नाही तर तो संघर्षाचा वसा आपल्या पुढच्या पिढीला दिला गेला. त्या पिढीनेही आपले आयुष्य पणाला लाऊन तो वसा सांभाळला.
ही, इतका प्रदीर्घ काळ संघर्षरत राहण्यामागची प्रेरणा कोणती होती बरे? असा प्रश्न कुणालाही नक्कीच पडू शकतो; पण त्याचे उत्तर मिळते ते अविचल, अडिग अशा श्रद्धेतून.
'मंदिर वही बनाएंगे' हा केवळ एक नारा नव्हे तर तो एक अखंड तेवत राहणाऱ्या अस्मितेचा हुंकार आहे. एक स्फुल्लिंग आहे जे शतकोत्तरकालवर्षावातही धगधगते राहिले. २२ तारखेला प्राणप्रतिष्ठेच्या यज्ञाचा अग्नी प्रज्वलित होईल तो याच कालातीत स्फुल्लिंगाने. तो प्रज्वलित होताना पाहणे हे तुमचे माझे अहोभाग्यच ! आसेतूहिमाचलच नव्हे तर भारतीय उपखंडाचे प्रतिनिधीही ज्या रामराज्याभिषेकाला हजर राहिले होते, अगदी तसाच क्षण अनुभवण्याची संधी आता आपल्यासमोर आहे.
अशावेळी कुठल्याही नकारात्मकतेला, वाद-विवादाला, आक्षेपाला साधे उत्तर देणे, त्याची दखलही घेणे म्हणजे प्रभूश्रीरामाच्या आगमनाकडे लागलेली आपली इंद्रिये घाणीने बरबटून घेणे. या क्षुद्र विचारांना आपल्या मनात थारा देणे, उत्तर देणे, त्यांची नोंद घेणे म्हणजे त्या 'भाग्यवंत' क्षणाची शोभा स्वतःच्या हाताने घालवणे होय. या सर्वांवर मात करूनच तर हा क्षण अवतरतो आहे हे लक्षात घेऊया. आता काही काळ या सर्वांना बाजूला सारणेच योग्य.
रामायणाचा संदेश आपण आपल्या मनावर कोरून घेतलेला आहेच. निर्णायक संघर्ष करणे आणि प्रखर निष्ठेच्या, समर्पणाच्या सहायाने विजय मिळवणे हे आपण रामायणातूनच शिकलो आहोत. आगामी काळातही ते आपल्याला करावे लागणारच आहे पण सध्या वेळ आहे ती एका स्वप्नपूर्तीचे दृश्य नजरेत भरून घेण्याची, त्याचे साक्षीदार होण्याची !
सध्या उत्पन्न झालेल्या आणि विघ्न आणू पाहणाऱ्या सर्व रावण सैन्यासाठी योग्य वेळी दुसरा कोदंडधारी हात आहेच की! प्रभू श्रीरामाच्या कृपेने त्याचाही उपयोग आपण करणारच आहोत.
मित्रांनो,
प्रभूश्रीराम अयोध्येत आले असताना जशी असेल, आज अयोध्यापुरी पुन्हा तशीच सजली आहे. सर्वत्र रामभक्तांचा उत्साह तसाच जाणवतो आहे. घरोघरी मंगलाक्षतांची रास प्रभूचरणी लीन होण्यासाठी अगदी तशीच आतूर आहे.
'सिंघासन पर त्रिभुअन साई । देखि सुरन्ह दुदुंभी बजाई ।।'
अशी घटिका आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे.
माऊली म्हणतात -
“ तो पहावा हे डोहाळे । म्हणूनि अचक्षूसी मज डोळे ।
हातीचिये लीला कमळे । पुजू तयाते ।।
असेच आपले मनही भावोत्कट झाले आहे.
आता आपणा सर्वांना उत्कंठा लागली आहे ती या क्षणाची; जेव्हा सर्वत्र मंगल वाद्यांचा निनाद घुमावा, घरासोबतच मनेही सुशोभित व्हावीत, शतकांच्या वेदनेचे दुःख दूर होईल असा आनंद साजरा व्हावा. डोळ्यात प्राण आणून आपण तो मंगल क्षण पाहावा. ' प्रभू श्री रामचंद्र की जय' चा जयघोष कंठा-कंठातून यावा.
तेव्हा आता मंगलवाद्ये वाजू द्या,
दारासमोर रंगावली सजू द्या,
तोरणांनी चौकटी शोभू द्या,
घरा-घरातून शंखनाद घुमू द्या,
दिवे-पणत्यांच्या रोषणाईत अवघा चराचर उजळून जाऊ द्या,
आपल्यासहीत इतरांनाही मिष्टान्नाचे घास मिळू द्या,
अवघे आसमंत दुमदुमुद्या..
एकमुखाने बोला..
सियावर रामचंद्र की... !
-
प्रसाद भि. देशपांडे
(शब्दानुग्रही)
No comments:
Post a Comment