Wednesday 1 February 2023

कश्मीर खोऱ्यामध्ये मध्ये काहीतरी अद्भुत घडते आहे - शेफाली वैद्य

 कश्मीर खोऱ्यामध्ये मध्ये काहीतरी अद्भुत घडते आहे 

वाग्देवीचे सोनपाऊल परत आपल्या मूलस्थानी पडते आहे... 


आज पुण्यातल्या धानोरी येथील काश्मीर भवनमध्ये माँ शारदेच्या सुंदर मूर्तीच्या दर्शनाचा योग जुळून आला. बरोबर  लेखिका श्वेता काजळे आणि लेखक अभिजीत जोग होते.  ही मूर्ती कर्नाटकमधल्या आदी शंकराचार्यांनी स्थापित केलेल्या शृंगेरीच्या शारदा पीठातून काश्मीर खोऱ्यातील टिटवाल ह्या गावी बांधण्यात आलेल्या नवीन मंदिरात आसनस्थ होण्यासाठी समारंभपूर्वक नेली जात आहे. 


टिटवाल हे गांव आहे काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात. ज्यांना काश्मीरचा रक्तरंजित इतिहास माहिती आहे त्यांना ठाऊकच असेल की कुपवाडा हा जिल्हा एकेकाळी इस्लामी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांसाठी कुप्रसिद्ध होता. त्याच गावात आता एक नवीन हिंदू मंदिर बांधले गेले आहे. कित्येक शतकांच्या प्रतिक्षेनंतर काश्मीर खोऱ्यात एक नवीन हिंदू मंदिर बांधले गेलेय आणि हे शक्य झालेय केवळ आर्टिकल ३७० हटवल्यामुळे! 


टिटवाल हे गांव पाकव्याप्त काश्मीरमधल्या मूळ शारदा पीठ मंदिरापासून फक्त ४० किलोमीटर दूर आहे. नीलम, मधुमती आणि सरगुन हया तीन नद्यांच्या प्रवाहांच्या संगमाजवळ बांधलेले हे मंदिर आज भग्नावस्थेत आहे, पण एकेकाळी श्री शारदा पीठ, मार्तंड सूर्य मंदिर आणि अमरनाथ गुहा ही जम्मू आणि काश्मीरमधली तीन प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्रे होती. 


काश्मिरी हिंदू दरवर्षी भाद्रपद महिन्यात श्री शारदा पीठाची पायी यात्रा करायचे आणि ती यात्रा टिटवालच्या मंदिरापासून निघायची. ही प्रथा फाळणीपर्यंत सुरु होती. पण फाळणीनंतर ह्या भागात मुसलमान टोळ्यांचे आक्रमण झाले आणि इथले मंदिर आणि गुरुद्वारा हे दोन्ही पाडले गेले आणि मूळ शारदा पीठ स्थान पाकव्याप्त काश्मीर मध्ये गेले. आज इतक्या वर्षांनंतर काश्मीरपूरवासिनी शारदा परत स्वगृही निघालीय. मूळ पीठ जरी आज भारतात नसले तरी तेही लवकरच भारतात परत येईल अशी आशा जागवणारी ही यात्रा आहे. 


शारदा पीठाचा इतिहास फार प्राचीन आहे. ह्याचे उल्लेख आपल्याला हजारो वर्षांपासून मिळतात. काही इतिहासकारांच्या मते शारदा पीठ सम्राट अशोकाच्या काळातही अस्तित्वात होते. सध्या आपल्याला ज्या भव्य मंदिराचे अवशेष दिसतात ते मंदिर काश्मीरवर राज्य करणाऱ्या कर्कोटा राजघराण्यातील एक शक्तिशाली हिंदू सम्राट ललितादित्य मुक्तपीड याने बांधले होते अशी मान्यता आहे. शारदा पीठ मंदिर आणि अनंतनागमधील मार्तंड सूर्य मंदिराच्या रचना आणि बांधकाम शैलीमध्ये बरेच साम्य आहे. ललितादित्य मुक्तपीड यानेच मार्तंड सूर्य मंदिरही बांधले होते. खास काश्मिरी शैलीत सर्वतोभद्र पद्धतीने बांधलेल्या ह्या भव्य मंदिराला चार दिशांना उघडणारे चार दरवाजे होते. 


एकेकाळी शारदा पीठ हे केवळ मंदिरच नव्हते तर ते उच्च शिक्षणाचे एक प्रमुख केंद्रही होते. शारदा पीठ मंदिर परिसरात असलेल्या शारदा विद्यापीठात देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत. एकेकाळी येथे जगातील सर्वात मोठे ग्रंथालय होते असे म्हणतात. शारदा  विद्यापीठाची गणना नालंदा, तक्षशिला, वल्लभी, विक्रमशीला यासारख्या प्रसिद्ध भारतीय विद्यापीठांमध्ये  होत असे.


असे मानले जाते की या विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी द्वारपंडितांकडून प्रवेश परीक्षा घेतली जात असे. प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तरावर विद्यार्थी एक एक पायरी चढून वर जात असे. या विद्यापीठाचा दक्षिण दरवाजा मात्र कित्येक शतके बंद होता कारण दक्षिण भारतातील कोणीही श्रेष्ठ विद्वान तेथे गेला नव्हता. श्री आदी शंकराचार्यांनी काश्मीर पर्यंत पदयात्रा करून तेथील पंडितांचा वादविवादात पराभव केला. त्यानंतर आचार्य दक्षिण दरवाजाने मंदिरात प्रवेश करून शारदा पीठावर मुख्य पीठाधीपती म्हणून आरूढ झाले. 


शारदा पीठाचा उल्लेख सहाव्या ते आठव्या शतकात लिहिल्या गेलेल्या निलमत पुराणात आढळतो. नीलमत पुराण हे काश्मीरच्या इतिहासाचे सर्वात जुने पुस्तक मानले जाते. पुढे अकराव्या शतकात काश्मिरी कवी बिल्हण यांनी शारदा पीठाचे महत्त्व वर्णिले आहे. त्याच सुमारास भारतात आलेल्या अल-बेरूनी ह्या परदेशी प्रवाशाने आपल्या लेखनात मुलतान येथील सूर्य मंदिर, स्थानेश्वर महादेव मंदिर, सोमनाथ मंदिर तसेच शारदा पीठ यांचा भारतीय उपखंडातील सर्वात प्रसिद्ध मंदिरे म्हणून उल्लेख केला आहे. प्रसिद्ध काश्मिरी कवी कल्हण यांच्या राजतरंगिणी या पुस्तकातही शारदा पीठाचा उल्लेख आहे. 


अगदी अकबराच्या दरबारातील विद्वान अबुल फझलने देखील शारदा पीठाचा उल्लेख हिंदूंचे एक महान पूजास्थळ  म्हणून केला आहे. अगदी आजही काश्मिरी हिंदू शारदेची उपासना 


‘नमस्ते शारदे देवी काश्मीरापुरवासिनि

त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ॥’ 


ह्याच श्लोकाने करतात. दुर्दैवाने भारतावरच्या इस्लामी आक्रमणानंतर इतर हजारो हिंदू मंदिरांप्रमाणेच ह्याही मंदिराचा विध्वंस केला गेला. सध्या हे मंदिर भग्नावस्थेत असून आत कोणतीही मूर्ती नाही. केवळ दगडी भिंतींचे  अवशेष उरले आहेत. पाकव्याप्त काश्मिरात गेल्यापासून तर मंदिराची अजूनच दुर्दशा झालेली आहे. 


असे म्हणतात की भगवत्पाद श्री आदी शंकराचार्यांना त्यांच्या द्रष्टेपणामुळे ह्या मंदिराचा होऊ घातलेला विध्वंस कळला होता म्हणूनच त्यांनी इथलीच चंदन काष्ठातली श्री शारदेची मूर्ती तुंगभद्रेकाठी शृंगेरीला नेली आणि तिथे श्री शृंगेरी शारदा पीठाची स्थापना केली व वादविवादात ज्यांचा पराभव केला होता त्या पंडित मंडनमिश्र ह्यांना संन्यास देऊन सुरेशचार्य हे नाव देऊन त्यांचे शृंगेरीचे प्रथम पीठाधीश म्हणून आरोहण केले. तिथपासून शृंगेरीची गुरु परंपरा अखंडित आहे. 


म्हणूनच शृंगेरीहून तिथल्या सध्याच्या शंकराचार्यांनी विधिवत पूजन केलेली ही श्री शारदेची मूर्ती परत काश्मिरपूरवासिनी होणं ह्या घटनेला सर्व हिंदू समाजासाठी विशेष महत्व आहे. मूर्ती उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यात असेल तरी ज्यांना शक्य असेल त्यांनी मुद्दाम जाऊन दर्शन घ्यावे. 


शेफाली वैद्य


No comments:

Post a Comment