सर्वोच्च न्यायालयाची सरकारला सूचना
नवी दिल्ली - देशात जमावाकडून काही व्यक्तींना ठार मारण्याच्या घटना अलिकडच्या काळात घडल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी संसदेने नवीन कायदा तयार करावा अशी सुचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सरन्यायाधिश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज ही सूचना करताना असे प्रकार रोखण्यासाठी तसेच गायींच्या हत्येवरून होणारे हल्ले थांबवण्यासाठी काही मार्गदर्शक सूचनाहीं जारी केल्या आहेत.
राज्यात कोणालाही कायदा हातात घेऊ न देण्याची जबाबदारी राज्य सरकारांना स्वीकारावी लागेल व असे प्रकार त्यांनी रोखावेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखणे ही सर्वस्वी राज्य सरकारांचीच जबाबदारी आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे. लोकांना कायदा हातात घ्यायला लावता कामा नये आणि लोकांनीही स्वताच कायदा असल्याच्या थाटात वागू नये असेही न्यायालयाने सुनावले आहे. जमावाकडून होणारे हल्ल्यांचे प्रकार अलिकडे वारंवार होत आहेत त्या प्रकारांना पोलादी हातानेच रोखले पाहिजे. राज्य सरकारांना या प्रकारांविषयीची जबाबदारी टाळता येणार नाही असेही न्यायालयाने नमूद केले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी कडक शिक्षेची तरतूद असलेला नवीन कायदा संसदेनेही संमत केला पाहिजे अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.
No comments:
Post a Comment