Monday, 9 July 2018

दहशतवादी बुरहान वानीच्या खात्म्याला 2 वर्ष पूर्ण; काश्मीर खोऱ्यात प्रतिबंधात्मक उपाय

श्रीनगर : भारतीय लष्कराने हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला 8 जुलै 2016 रोजी कंठस्नान घातले होते. या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाने काश्मीर खोऱ्यातील संवेदनशील ठिकाणांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. शिवाय, इंटरनेट सेवादेखील बंद ठेवली आहे. तर दुसरीकडे, दहशतवाद्यांनी बंदची हाक दिल्यानं आज एका दिवसासाठी अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

पोलीस महासंचालक एस.पी.वैद यांनी सांगितले की, सध्या जम्म काश्मीरमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती चांगली नाहीय. त्यामुळे भाविकांना सुरक्षितरित्या अमरनाथा यात्रा करता यावी, यासाठी आम्ही सर्वेतोपरी प्रयत्न करत आहोत. दहशतवाद्यांकडून रविवारी बंदची हाक देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे एक दिवसासाठी आम्ही यात्रा थांबवली आहे. काश्मीर खोऱ्यातील तणावाची स्थिती पाहता, भाविकांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी बुरहान वानी यांच्या खात्मा करण्याच्या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवाई होण्याचा धोका लक्षात घेता श्रीनगर हायवेपासून 300 किलोमीटर परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रन्ट (जेकेएलएफ) चा अध्यक्ष यासीन मलिकलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दक्षिण काश्मीरमधील एका गावात शोधमोहीमेदरम्यान शनिवारी जमावानं सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक केली. यावेळी जवानांनी प्रत्युत्तरासाठी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला. यामुळे काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम, शोपिया, अनंतनाग आणि पुलवामामध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

8 जुलै 2016ला बुरहान वानीचा खात्मा
भारतीय लष्करानं 8 जुलै 2016 ला दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरात बुरहान वानीचा खात्मा केला होता. त्राल येथील रहिवासी असलेल्या बुरहान वानीला चकमकीदरम्यान कंठस्नान घालण्यात आले. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय म्हणून ओळखला जायचा. त्याच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी हिंसक निदर्शनं करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment