नाशिक (रविवार, 10 डिसेंबर 2017)
- ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखान्यात सुखोई-३० या लढाऊ विमानांचे काम पुढील दीड वर्षे पुरेल इतकेच असल्याने त्यानंतर कामे कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे; परंतु केंद्र सरकार एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर वाया जाऊ देणार नाही. त्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी पुढील ३० वर्षे पुरेल इतके सुखोई ओव्हर ऑइलिंगचे काम दिले जाणार आहे. त्याचबरोबर आणखी चाळीस सुखोई-३० विमाने तयार करण्याची ऑर्डरही ‘एचएएल’ला मिळेल, असे आश्वासन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज दिले.
ओझर टाउनशिपमधील किनो थिएटरमध्ये ‘मेक इन इंडिया’अंतर्गत राबविण्यात आलेल्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप समीट-२०१७ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. डॉ. भामरे म्हणाले, की संरक्षण क्षेत्रात नाशिकच्या ओझर येथील ‘एचएएल’ने आतापर्यंत ६५ टक्के उत्पादनाचा वाटा उचलला आहे. सध्या सुखोई-३० ही लढाऊ विमाने तयार करण्याचा शेवटचा टप्पा सुरू आहे. २०१९ पर्यंत सुखोईची कामे राहतील. त्यानंतर मात्र कामे मिळणार नसल्याची भीती कामगार, अधिकारीवर्गात आहे. पण पुढील ३० वर्षे सुखोईचे ओव्हर ऑइलिंगचे काम ओझर ‘एचएएल’मध्ये केले जाणार असल्याने कर्मचाऱ्यांनी भीती न बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.
आतापर्यंत आपण रशियाकडून तंत्रज्ञान घेऊन लढाऊ विमाने तयार करायचो; परंतु ‘मेक इन इंडिया’अंतर्गत नवउद्योजक तयार करण्यासाठी एचएएलने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपअंतर्गत उत्पादनाला सुरवात केली आहे.
आतापर्यंत संरक्षण क्षेत्रातील ४० टक्के कामे आउटसोर्सिंगने करून घेण्यात आली आहेत. देशांतर्गत कौशल्याला वाव देऊन रोजगारनिर्मिती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करून देशासाठी सहकार्य देण्याचे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले. या वेळी एचएएलचे व्यवस्थापकीय संचालक टी. सुवर्णा राजू, सिमेलाचे सीईओ पी. जयपाल, एचएएलचे अतिरिक्त महासंचालक निर्मल थसय्याह आदी उपस्थित होते. ओझर मिग कॉम्प्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी दलजित सिंग यांनी भविष्यात ‘पीपीटी’मधूनच कामे करताना उत्पादनाबरोबरच संशोधन व विकास क्षेत्रातही हाच फॉर्म्युला अमलात आणला जाणार असल्याचे सांगितले. या वेळी ‘सुखोई-३० एमकेआय’च्या बांधणीकरिता शंभरावा असेंब्ली पार्ट डायनामॅटिक टेक्नॉलॉजी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदयंत मल्होत्रा यांच्याकडून स्वीकारण्यात आला. ‘एचएएल’मुळे संरक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याचे श्री. मल्होत्रा यांनी सांगितले.
या वेळी संघटनेचे खजिनदार अविनाश कुलकर्णी, संघटक सचिव बाळासाहेब थोरात, उपाध्यक्ष सचिन माळोदे, यजुवेंद्र बरके, सहचिटणीस श्रीकांत पगार, प्रवीण गाढे, कार्यकारिणी सदस्य राहुल कोळपकर, सुधीर राजगुरू, कमलेश बनकर, सोमनाथ जाधव, मुकुंद क्षीरसागर, किशोर जाधव, रमेश कदम, विजय न्याहारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खासगी कंपन्यांना हेलिकॉप्टर निर्मितीचा परवाना
‘एचएएल’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक टी. सुवर्णा राजू यांनी भविष्यात भारतीय लष्कराला नागरी मोहिमांसाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या ‘एएलएच ध्रुव’ या हेलिकॉप्टर निर्मितीचा परवाना देशातील काही खासगी कंपन्यांना देणार असल्याचे सांगितले. ‘एएलएच ध्रुव’ या हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्याने कमी अंतराची प्रवासी वाहतूक, व्हीआयपी प्रवास, नैसर्गिक आपत्तीत शोध आणि बचाव मोहीम, तातडीची वैद्यकीय मदत पुरविणे यांसाठी भारतीय लष्कराला करता येईल, असे त्यांनी सांगितले.
ओझर प्रकल्प बंद पडणार नाही, काळजी नको
ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून यशस्वी चाचणी करण्यात सुखोई-३० हे लढाऊ विमान यशस्वी ठरले आहे. त्यामुळे देशाला आणखी चाळीस सुखोई विमानांची गरज असल्याने ती तयार करण्याची ऑर्डर ‘एचएएल’ला मिळेल. तेजस हेलिकॉप्टरचे काम बेंगळुरू येथील प्रकल्पातून चालते. ते शेअरिंग बेसिसवर ओझर येथील प्रकल्पातून सुरू करण्याचे नियोजन आहे. बेंगळुरू येथून हेलिकॉप्टरचे पार्ट ओझर येथे आणून जोडणी करण्याचे काम दिले जाणार असल्याने ओझर प्लांट बंद पडणार नाही, याची काळजी सरकार घेत असल्याचे डॉ. भामरे म्हणाले. लढाऊ हेलिकॉप्टर व हलक्या लढाऊ विमानांच्या पाचव्या आधुनिक आवृत्तीचे कामदेखील ओझर प्रकल्पात तयार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
No comments:
Post a Comment