सियाचिनचा बहाद्दूर जवान हुतात्मा; देशाने वाहिली श्रद्धांजली
नवी दिल्ली : सियाचिनमध्ये हिमकडे कोसळून त्याखाली सहा दिवस गाडले गेलेले लान्स नाईक हनुमंतप्पा कोप्पड यांची मृत्यूशी झुंज अखेर गुरुवारी संपली. हनुमंतप्पा या लढवय्या जवानाने गुरुवारी 11 वाजून 45 मिनिटांनी दिल्लीतील आर. आर. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
गेल्या दोन दिवसांपासून हनुमंतप्पा यांचे प्राण वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ डॉक्टरही प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते; पण गुरुवारी त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि या वीराची प्राणज्योत मालवली. हनुमंतप्पांच्या पश्चात त्यांची पत्नी महादेवी आणि दोन वर्षांची मुलगी नेत्रा कोप्पड असा परिवार आहे. कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यातील बेटादूर गावचे हनुमंतप्पा 13 वर्षांपूर्वी लष्करात दाखल झाले होते.
हनुमंतप्पा यांच्या मेंदूकडे होणारा प्राणवायूचा पुरवठा खालावला. त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांना न्यूमोनियाची लागण झाल्याचे सीटी स्कॅनमधून स्पष्ट झाले होते. त्याचप्रमाणे त्यांची विविध इंद्रिये हळूहळू निकामी होत गेली. शक्य तितके सर्व उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही रुग्णालयात जाऊन हनुमंतप्पांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. संपूर्ण देशभर हनुमंतप्पाच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थना केली होती; पण हनुमंतप्पाच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या मूळगावासह संपूर्ण देश शोकाकुल झाला आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात होती. ट्विटर या सोशल नेटवर्क साईटवरूनही अनेक जण आपल्या भावना व्यक्त करत होते.
सियाचिन हिमनदी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून ते नियुक्त होते. गेल्या डिसेंबरमध्ये तेथील 19,500 फूट उंचावरील शिखरावर नियुक्त झालेल्या तुकडीत त्यांचाही समावेश होता. तिथे उणे 40 अंश तापमानाला आणि ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांना जवानांना तोंड द्यावे लागते. सियाचिन हिमनदीमध्ये 3 फेब्रुवारीला हिमस्खलनामुळे 19 मद्रास बटालियनचे दहा जवान ढिगाऱ्याखाली सापडले होते. हिमस्खलन झालेल्या ठिकाणी तब्बल 25 फूट बर्फ कापून काढल्यानंतर सहा दिवसांनी हनुमंतप्पा कोप्पड यांना जिवंत बाहेर काढण्यात आले होते.
हनुमंतप्पा हे नेहमीच जोखमीच्या मोहिमांसाठी उत्सुक असत. 13 वर्षांच्या लष्करी सेवेत अत्यंत धोकादायक आणि आव्हानात्मक भागांत त्यांनी जिद्दीने सेवा बजावली आहे. 33 वर्षांचा हा जवान उच्च ध्येयाने भारावलेला आणि उत्तम शरीर कमावण्यावर भर देणारा होता, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. काश्मिरात दहशतवाद्यांविरोधी मोहिमांत ते पाच वर्षे आणि ईशान्य भारतातही दोन वर्षे त्यांनी अतिरेक्यांविरोधात झुंज दिली आहे.
दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली
लान्सनायक हनुमंतप्पा कोपड यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपाध्यक्ष अमित शहा, "आप‘ नेते कुमार विश्वास, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, चित्रपट अभिनेता सनी देओल यांनी हनुमंतप्पांना श्रद्धांजली वाहिली.
गावावर शोककळा
दरम्यान, हनुमंतप्पांच्या निधनाची बातमी कळताच, त्यांच्या कर्नाटकातील धारवाडजवळच्या बेटादूर गावावर शोककळा पसरली. मात्र, गावचा जवान देशासाठी कामी आला, हा अभिमानाचा हुंदकाही त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
No comments:
Post a Comment