नवी दिल्ली / फरिदाबाद : लष्करी सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणाऱ्या माजी सैनिकांनाही "वन रॅंक, वन पेन्शन‘चा (ओआरओपी) लाभ मिळेल, यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केल्यानंतर माजी सैनिकांनी आंदोलनाची तलवार म्यान केली. मोदींच्या घोषणेने आमचे समाधान झाले असून, आम्ही उपोषण मागे घेत आहोत; पण सरकारने आपले आश्वासन पाळले नाहीतर देशभर मोठे वादळ निर्माण करू, आमच्या अन्य काही शंकांचे समाधान होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे मेजर जनरल (निवृत्त) सतबीरसिंग यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
फरिदाबादमध्ये मेट्रो रेल्वे सेवेच्या उद्घाटनासाठी आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी "ओआरओपी‘बाबत मोठी घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला. "ओआरओपी‘बाबत काही लोक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत. लष्करामध्ये पंधरा वर्षांपेक्षा अधिककाळ नोकरी करणाऱ्या प्रत्येक जवानाला या निवृत्तिवेतन योजनेचा लाभ होणार असून, कर्तव्य बजावत असताना जखमी झाल्याने निवृत्ती घेणाऱ्यांनाही याचा लाभ मिळेल. "ओआरओपी‘च्या अंमलबजावणीसाठी आम्ही कोणताही पे कमिशन स्थापन केलेला नाही. आता दहा हजार कोटी रुपये द्यायचे असतील तर यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून आम्ही स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मोदी यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच हवालदार, शिपाई, नायक यांनाही या योजनेचा लाभ होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. शनिवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वेच्छा निवृत्ती
स्वीकारणाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नसल्याचे सांगितल्याने माजी सैनिक संतापले होते.
...........
काय म्हणाले मोदी
- समितीच्या माध्यमातून त्रुटी दूर करू
- कॉंग्रेसला या योजनेचे गांभीर्य नाही
- मागील 42 वर्षांत कॉंग्रेसने काही केले नाही
- "ओआरओपी‘ कॉंग्रेसमुळे लटकले
- सरकारच्या चांगल्या धोरणांना कॉंग्रेसचा विरोध
- सरकारच्या आर्थिक धोरणांना यश
- आर्थिक संकटातही देश डगमगला नाही
............
स्वेच्छानिवृत्तीची सुविधा
लष्करामध्ये सैनिकांना स्वेच्छानिवृत्तीची सुविधा मिळते. एखाद्या तुकडीमध्ये चार लोक असतील, यातील कोणा एकासच प्रमोशन मिळू शकते; पण त्याच रॅंकवर काम करणाऱ्या अन्य तिघांना संबंधितांचे आदेश पाळायचे नसतील तर ते स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतात. अशा पद्धतीने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांना निवृत्तिवेतन योजनेचा लाभ घेता येत नाही, असे माजी सैनिकांचे म्हणणे होते.
............
आंदोलकांची घेतली भेट
फरिदाबादच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच माजी सैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या वेळी काही आंदोलकांनी मोदींना गुलाबपुष्प भेट देऊन त्यांच्याशी हस्तांदोलनही केले. मोदींनीही संधी साधत कॉंग्रेस सरकारचे वाभाडे काढले. मागील सरकारनेच हा प्रश्न प्रलंबित ठेवल्याचा आरोप मोदींनी या वेळी बोलताना केला.
..........
"ओआरओपी‘बाबत सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून, माजी सैनिकांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आम्हाला यश आले आहे.
वेंकय्या नायडू, केंद्रीय शहर विकासमंत्री
............
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत; आम्ही त्यांचे आभार मानतो. आम्ही आमचे आंदोलन आता मागे घेत आहोत.
कर्नल (निवृत्त) पुष्पेंद्र सिंह
वृत्तसंस्था , Esakal सोमवार, 7 सप्टेंबर 2015 - 01:30 AM IST
No comments:
Post a Comment