Tuesday, 8 September 2015

फाटलेल्या बुटाने धावला, तरीही "चॅम्पियन' बनला

नागपूर - जिद्द, चिकाटी अन्‌ डोळ्यासमोर निश्‍चित ध्येय असेल, तर कोणतीही अडचण तुमच्या यशाचा मार्ग रोखू शकत नाही. युवा धावपटू शुभम मेश्रामने ते सिद्ध करून दाखविले. त्याचे बूट फाटले होते. त्याने ते शिवले. सुसाट वेगाने धावला आणि "चॅम्पियन‘ होऊनच दम घेतला. 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे रविवारी आंतरमहाविद्यालयीन क्रॉस कंट्री आयोजित करण्यात आली. 12 किलोमीटर अंतराच्या या शर्यतीत शुभमने अव्वल स्थान पटकावून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. शुभमने ज्या परिस्थितीत हे यश मिळविले, ते बघता कुणीही त्याची पाठ थोपटल्याशिवाय राहणार नाही. 

20 वर्षीय शुभमचे आतापर्यंतचे आयुष्य खूप कष्टात गेले. तीन-चार वर्षांचा असताना त्याची आई जळून मरण पावली. पत्नीच्या मृत्यूचा धक्‍का सहन न झाल्याने वडिलांनीही प्राण सोडला. त्या परिस्थितीत एकाकी पडलेल्या शुभमचा शिलाई मशीनचे काम करणाऱ्या मावशीने सांभाळ केला. मावशीची परिस्थितीही जेमतेम असल्यामुळे तिच्या घराच्या बांधकामाचे निमित्त साधून शुभमने रघुजीनगरात किरायाने रूम घेतली. त्यासाठी बेसा येथील बालपांडे फार्मसी कॉलेजमध्ये "लॅब अटेंडन्ट‘ म्हणून त्याने नोकरी पत्करली. दिवसभर ड्युटी करून सायंकाळी घरी परतल्यानंतर तो लगेच सरावासाठी एस. बी. सिटी महाविद्यालयाच्या मैदानावर जातो. माजी आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स प्रशिक्षक वैशाली चतारेच्या मार्गदर्शनाखाली सध्या तो प्रशिक्षण घेतो आहे. 

हजरतबाबा ताजुद्दीन महाविद्यालयात (एचबीटी) बी. ए. प्रथम वर्षाला असलेल्या शुभमने अभ्यासासाठी वेळ मिळत नसल्याने मुक्‍त विद्यापीठातून अकरावी व बारावी केली. त्याच्याकडे ऍडमिशनसाठीही पैसे नव्हते. तेव्हा एचबीटीत क्रीडा शिक्षक असलेले बाबूलाल धोत्रे यांनी त्याला महाविद्यालयात नि:शुल्क प्रवेश दिला. शुभमने क्रॉस कंट्री जिंकून एचबीटीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. शुभमला आंतरराष्ट्रीय ऍथलिट बनायचे आहे. देशासाठी 
पदक मिळवायचे आहे. दुर्दैवाने त्याच्याकडे ना दर्जेदार बूट आहेत, ना "डायट‘साठी पैसे. याही परिस्थितीत त्याचा सकाळ-सायंकाळ संघर्ष जारी आहे.

नरेंद्र चोरे : सकाळ वृत्तसेवा 

No comments:

Post a Comment