Sunday, 1 March 2015

चला निसर्गाकडे : एक अनोखा छंद

अकलूज गावचा एक माणूस गेली ३० ते ३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्या घेतो  आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात.


अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं,
 'कुठून आणता ही सीताफळं? तुमचे मळे आहेत का?'

'कुठले मळे साहेब? आम्ही गरीब माणसं. लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात. झाडं उगवलीत दरीत. सारं फुकटच. आम्ही फळं गोळा करतो. पिकवतो आणि तुम्हाला विकतो. शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची.'


त्या विक्रेत्याकडं गहिवरल्या डोळ्यानं पहात ही व्यक्ती डझनभर सीताफळं विकत घेते. पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी!  बारमाही काम करता येईल असा हा देश. बिया फेकल्या तरी अमृतासमान चव असणारी फळे पिकवणारी इथली माती.  बिया साठवून एखादा जरी घाटावरून त्या दरीमध्ये फेकणारा भेटला तरी हजारो कुटुंबांची तो सोय करून जातो. वर वर किरकोळ वाटली तरी ही घटना अंतर्मुख करते.
ही दृष्टी किती लोकांची असते? जर प्रत्येकानं असा एखादा छंद बाळगला तर काळ बदलून जाईल.


अशा माणसांना काय व्यक्तिगत दुःख असत नाही, असं नाही... तोही पिंजून गेलेला असतो. पण अशा प्रेरणा तो दाबत नाही, तो त्या कृतीत आणतो. आपल्याला आपलं अंतर्मन कित्येकदा एखादं सत्कृत्य करायला सांगत असतं; पण कितीवेळा आपण ते करतो? एखाद्या आंधळ्या भिकाऱ्याला काही तरी दान करावं म्हणून खिशात गेलेला हात कित्येकदा तसाच बाहेर येतो.

सरहद्दीवर विनाकारण गोळीबार करणारे शेजारी देश. शहरा - शहरात स्फोट घडविणारे अतिरेकी, देशात राहून देशद्रोह करणारे काहीजण आणि अशा अनेक उलट्या काळजाच्या व्यक्तींच्या समूहामध्ये उद्विग्न झालेले आपण सारे. आपल्याला बिया फेकणारी अशी एखादी व्यक्ती भेटली, तर शहारून जातो आपण. मनाला कुणीतरी गार फुंकर मारून सुखावतंय असं वाटतं. 

जंगलाची तोड होते. रस्त्यासाठी, इमारतींसाठी झाडांची तोड होते. तितक्या प्रमाणात ती पुन्हा लावली जातात का?   तोडलेल्या झाडांवरच्या पक्ष्यांचं पुढं काय होतं? याचाही विचार नको का करायला?
झाडांशिवाय आणि पक्ष्यांशिवाय असलेलं गाव ते गाव कसलं?  ग्लोबल वॉर्मिंगच्या जागतिक परिषदा होत राहतात. मिडियातून त्यांचा उदो उदो होतो. त्यातून साध्य काय होतं? झाडं लावणारे, ती जगवणारे, पक्ष्यांना दाणे टाकणारे, झाडांवरच्या घरट्यांकडं भरल्या डोळ्यांनी बघणारे आणि सीताफळांच्या बिया फेकणारे शेवटी पडद्याआडच राहतात. 

सर्वेपि सुखिनः संतु। सर्वे संतु निरामय... या संस्कृत उक्ती काय   

किंवा


दुरितांचे तिमीर जावो ।
 विश्व स्वधर्म सूर्येपाहो।
 जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात।। 
 हे ज्ञानदेवांच्या पसायदानातील सूत्र काय


किंवा

या बिया फेकणाऱ्या माणसाची प्रेरणा काय.
या तिन्ही गोष्टी एकच आहेत असं वाटून जातं...

मिञांनो आपणही असा एखादा सर्वोपयोगी छंद जोपासण्यात किंवा तसा प्रयत्न करण्यात काय वावगं आहे... नाही का?

- आंतरजालावरून सादर

No comments:

Post a Comment