Saturday 1 April 2017

तरच महिला निर्भीड होतील : विश्‍वास नांगरे पाटील

नागरीक व पोलीस परिसंवाद
तळेगाव दाभाडे, दि. 1 (वार्ताहर) - मुलींनी सोशल मीडियाचा वापर अतिशय सावधानतेने करावा. महिला व मुलींनी निर्भीड होऊन छेडछाड करणाऱ्यांना धडा शिकवावा. तुमच्या मदतीसाठी तुमचा "पोलीस दादा' सोबत आहे. शांत सुरक्षित कामशेत परिसरासाठी नागरिकांनीच साध्या वेशातील पोलीस व्हावे. पोलीस ठाणे महिलांना माहेरघर वाटावे, पोलीस त्यांचा दादा झाला, तरच महिला निर्भीड होतील, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी केले.
कामशेत येथे शुक्रवारी (दि. 31) नागरीक व पोलीस परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश शिवथरे, कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब खेडेकर, मधुकर काकडे, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.
नांगरे पाटील म्हणाले, मावळ तालुक्‍यातील अवैध धंदे, गुन्हेगारी, दरोडे, गंभीर गुन्ह्यातील इसमांवर करडी नजर असून परिसरात दारू, मटका, जुगार, अवैध धंदे असल्यास पोलिसांत तक्रार करा. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
जमिनीच्या व्यवहारात पोलिसांनी अडकू नये; पोलीस व नागरिकांमध्ये संवाद वाढला पाहिजे.
नागरीक व पोलीस परिसंवादाच्या माध्यमातून नागरीक, महिला व विद्यार्थीनींचे प्रश्‍न जाणून घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित नेहरू विद्यालयाच्या विद्यार्थीनीने स्वागत गीत सादर केले. यानंतर नांगरे पाटील यांनी थेट नागरिकांशी संवाद साधून महिला व मुलींना कोणी त्रास देत आहे का? या प्रश्‍नाने सुरुवात केली. अनेक विद्यालयीन विद्यार्थीनींनी प्रश्‍न विचारले.
कामशेत शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत व पोलीस यांची मिटिंग बोलावून शहरातील वाढलेली अतिक्रमणे एक महिन्याच्या आत काढण्यासाठी, तसेच वाहतूक कोंडी सोडवण्याचे आश्‍वासन यावेळी देण्यात आले. जुना मुंबई-पुणे महामार्गावर व द्रूतगती मार्गावर ठराविक ठिकाणी होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय योजनांवर नागरिकांनी प्रश्‍न मांडले.
सोने, चांदीच्या व्यापाऱ्यांना पोलिसांचा त्रास होत असल्याची एका व्यापाऱ्याने तक्रार करून चोरीचा माल तुम्ही विकत घेतला का? असा प्रश्‍न विचारून पोलिसांच्या गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेले जाते. यामुळे आमच्या व्यवसायावर निष्कारण परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तरुणांनीही उपस्थित राहून प्रश्‍न विचारले. शहरातील शाळांच्या परिसरात शाळा सुटणे व भरण्याच्या वेळी अनेक दुचाकीस्वार शाळेच्या भोवती घिरट्या घालतात. बुलेट गाडीच्या सायलेन्सरमधून फाटक्‍यासारखे आवाज काढले जातात, अशा तक्रारी केल्या. त्यांच्यावर लवकरच कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांना दिले.
कामशेतच्या सरपंच सारिका शिंदे, सदस्या सारिका घोलप, रुपाली शिनगारे, पोलीस पाटील सविता वरघडे, पुणे जिल्हा महिला दक्षता समिती सदस्या कल्पना कांबळे, लायन क्‍लब महेश शेट्टी, सुनील भटेवरा, पंडित नेहरू विद्यालयाचे प्राचार्य एस. डी. घुले, खांडशीचे सरपंच बाळासाहेब शिरसट, ताजेचे सरपंच रामदास केदारी, व्ही. आय. टीचे निलेश गारगोटे, कैलास गायकवाड, तुकाराम शेंडगे, चंद्रकांत राऊत, महादू लगड, विठ्ठल शेंडगे, डॉ. विकेश मुथा, गणेश भोकरे, माजी सरपंच विजय शिंदे तसेच नाणे व पवन मावळातील नागरीक, पोलीस दक्षता कमिटी सदस्य, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व नागरीक उपस्थित होते

No comments:

Post a Comment