इस्लामाबाद, दि. 1 - अणवस्त्राचा पहिला वापर न करण्याच्या आपल्या धोरणावर फेरविचार करण्याचे भारताने संकेत देताच पाकिस्तानी राज्यकर्ते टेंन्शनमध्ये आले आहेत. हिंदुत्वाचा अजेंडा असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असल्याने पाकिस्तान जास्त चिंतित असल्याचे डॉन दैनिकाने निवृत्त पाकिस्तानी जनरलच्या हवाल्याने म्हटले आहे. भारताकडून देण्यात आलेले संकेत हा डिवचण्याचा, चिथावणीचा भाग असल्याचे एहसान उल हक या निवृत्त जनरलने सांगितले. ते अजूनही पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाशी संबंधित आहेत.
मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील भारतीय वंशाचे तज्ञ विपिन नारंग यांनी वॉशिंग्टनमध्ये एका सेमिनारमध्ये बोलताना भारताच्या अणवस्त्र वापरा संबंधीच्या धोरणात बदल झाल्याचे म्हटले होते.
पहिला अणवस्त्राचा वापर न करण्याच्या आपल्या मूळ धोरणापासून भारत दूर गेला आहे. पाकिस्तान अणवस्त्र हल्ला करु शकतो असे भारताला वाटले तर, भारत पाकिस्तानला संधी न देता अणवस्त्रांचा वापर करेल असे त्यांनी म्हटले होते.
भारताचा हा हल्ला पारंपारिक पद्धतीचा नसेल असे नारंग यांनी म्हटले होते. अणवस्त्राचा पहिला वापर न करण्याच्या भारताच्या धोरणाबद्दल सुरुवातीपासूनच आम्हाला संशय आहे असे एहसान उल हक यांनी सांगितले. भारत असे संकेत देऊन एकप्रकारे पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाच्या विश्वासार्हतेला आव्हान देत आहे असे हक यांनी सांगितले. 'लर्निंग टू लाईव्ह विथ द बॉम्ब, पाकिस्तान 1998-2016' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना हक यांनी भारताच्या अणवस्त्र धोरणाबद्दल ही विधान केली.
ऑनलाइन लोकमत
No comments:
Post a Comment