Sunday, 1 October 2023

ज्येष्ठ नागरिक दिन

१ ऑक्टोबर हा जागतिक स्तरावर ज्येष्ठ नागरिक दिन म्हणुन साजरा केला जातो. 


ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जे आता ज्येष्ठ नागरिक म्हणजे ६० वर्षावरील वयोगटात आहेत ते तसेच ज्यांच्याबरोबर ही मंडळी राहतात, ते त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी या सर्वांचेसाठी ज्येष्ठ नागरिक ही बिकटस्थिती आहे, की ‘वरदान’ आहे, तो कोणालाच शाप होता कामा नये यासाठी कशा पद्धतीने वागले पाहिजे? 


आपण ६० वर्षाचे झालो, म्हणजे म्हातारे झालो, हा गैरसमज दुर करा.. आता आपले संपले असे कधीही समजु नका .. म्हातारपण त्याला म्हणावयाचे, की ज्याच्यामुळे आपली कार्यक्षमता कमी-कमी होऊ लागते, उत्साह कमी होऊ लागतो, तब्बेतीच्या तक्रारी वाढु लागतात. 

      म्हातारपण हे तीन प्रकारचे आहे. एक म्हणजे वय वाढलेले (हे जन्मतारखेपासुन सुरु होते) याला क्रोनालॉजिकल एजिंग(Chronological) म्हणतात, दुसरे कारण शारीरिक स्थिती- ज्याचा संबध आपल्या आरोग्याशी निगडित आहे याला (Biological) म्हणतात आणि तिसरा प्रकार मानसिक अवस्थेमुळे ज्याला (Phychological) म्हणतात. यातील जन्मतारखेवरुन आपण अमुक वर्षाचे झालो – हे टाळता येत नाही. 


पण बाकीची जी दोन कारणे आहेत ती म्हणजे बायलॉजिकल एजिंग आणि सायकॉलॉजीकल एजिंग यावर आपण लक्ष देण्याचे आहे. त्यावर मात करता येते अगदी अखेरपर्यंत कार्यक्षम जीवन जगता येते.


आपल्या भारतीय संस्कृतीत तर ५० वर्षालाच गॄहस्थाश्रम संपतो आणि ५१ वर्षानंतर वानप्रस्थाश्रम सुरु होतो ते ७५ वर्षांपर्यंत, नंतर सन्यास आश्रम सुरु होतो. अशी संकल्पना आहे. गॄहस्थाश्रम संपत येत असतानाच, आपण स्विकारलेल्या सर्व जबाबदार्या योग्य पद्धतीने , आपल्या पुढील पिढीकडे सुपुर्त करावयाच्या आणि आवश्यक असेल किंवा गरज भासेल तेंव्हा आपल्या अनुभवाचा लाभ त्याना देत 'Retired but not attempted' या युक्तीने आपला वेळ आपल्या अनुभवाचा लाभ जेथे-जेथे देता येईल ते पहावे व एखादे सामाजिक संस्थामध्ये निस्वार्थपणे कार्यरत रहावे, पण त्यापासुन अपेक्षा मात्र काहीही ठेवावयाची नाही. याचबरोबर आपले आत्मकल्याण साधण्यासाठी आत्मनिरीक्षण करुन ध्यान साधना करत चिंतन करुन योग्य ते बदल स्वतामध्ये करुन आनंदानी जाण्यासाठी प्रयत्नशील राहणेचे अपेक्षित आहे.


परंतु सध्या प्रत्यक्षात काय घडत आहे ....


प्रत्यक्षात ६० वर्षावरील वयात लोक ज्येष्ठ नागरिकपेक्षा वॄद्ध नागरिक या भुमिकेतुन जगत आहेत. स्वतः हसत, इतरांना हसवत, निर्भय आणि निर्भार होऊन जगण्याचे ऐवजी बर्याच प्रमाणात चिंता, असुरक्षित भाव, आपणास कोण आता विचारत नाही अशा भावनेने नाईलाज म्हणुन जगणार्यांची संख्या या वयोगटात वाढत चालली आहे. मला बरेच कॉल रोज येत असतात, ज्येष्ठ नागरिक घरातील छोटेमोठे कारणासाठी इगेस्टीक होवुन लगेच आश्रमात यायचेय मला मुलगा सुन वा मुलगी कोणीच पहात नाही वगैरे अवास्तविक दु:ख सांगुन सर्वांना सोडुन आश्रमातच शेवट चांगला होईल अशी भावना असते... 

       अशा मनोवॄत्तीला वेळीच आळा घातला पाहिजे. वास्तविक ६० वर्षांनंतर आपले व्यक्तीगत जीवन खर्या अर्थाने जगण्याची संधी आहे. मानवी जीवनाचा उद्देश्य साधावयाचा असतो यासाठी बाहय गोष्टी, धन पद प्रतिष्ठा मान सन्मान याची फारशी गरज नसते.  चांगले जगण्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतुद तर आपण सामान्यपणे केलेली असतेच, आवश्यक आहे, ते म्हणजे आपले ‘मन’ आणि ‘वेळ’ धार्मिक सामाजिक कार्यात गुंतवणे, आणि आपले आरोग्य सांभाळणे !

      

आरोग्य हीच संपत्ती........


सर्वांत महत्वाचे म्हणजे आपले आरोग्य सांभाळणे. खरे म्हणजे याचे नियोजन पहिल्यापासुन केले पाहिजे. आरोग्य म्हणजे सर्व काही नसले तरी, विना आरोग्य सर्व काही निरर्थक वाटते. पण आजारी पडले पाहिजे असा काही कायदा नाही. जर आपण योग्य तो आहार, योग्य तो व्यायाम, विश्रांती, नियमितपणे घेण्याचे ठरविले तर आरोग्य हा प्रश्नच निर्माण होत नाही. आवश्यक वाटल्यास योग्य तो औषधोपचार- उदा. रक्तदाब, मधुमेह सारख्या व्याधी असतील तर त्यावर उपचार घ्यावयाचा आहे. पण मनात एक संकल्प करावयाचा आहे तो म्हणजे मरेपर्यंत आपणास दुसर्याकडुन सेवा करुन घ्यावी लागणार नाही. अशा पद्धतीने जगावयाचे आहे. आपण आपल्या पायानी चालावयाचे, स्वतःच्या हातानी जेवावयाचे इ. कसलेही परावलंबित्व नको.

याच्याच जोडीला सर्वांत महत्वाचे म्हणजे ‘चित्त ठेवारे प्रसन्न’. आपलं जगणं आणि वागणं आपल्याकडुन असे ठेवावयाचे की, आपणास बघुन कोणी कपाळावर आठया घालता कामा नये, की आपण कोणाकडे बघुन कपाळावर आठ्या घालावयाच्या नाहीत.

 माणसाला अकाली वॄद्ध करणारे कारण म्हणजे निराशा, तणाव (टेंशन) कशाची ना कशाची भिती ! विशेषतः मॄत्युची भीती आणि जस जसे वय वाढु लागते, तसे, जर आपण योग्य तो दॄष्टिकोन जोपासला नाही तर ही भीती निराशा-अनिच्छतता वॄत्तीने जगण्याची सवय आणखीन बळावते.  वर्षातुन ३ वेळा, निरनिराळी प्रेक्षणीय ठिकाणे, धार्मीक ठिकाणे यांना भेट देऊन पुर्ण भारत आपण पाहिला पाहिजे.

       अर्थात हे सर्व करीत असताना, आपण मनुष्य म्हणुन जन्माला आलो आहे, आणि या मनुष्य जन्माचा उत्तम उपभोग तर घ्यायचाच पण उपयोग ही करावयाचा आहे आणि तो म्हणजे वाल्याचा वाल्मिकी होणे, वर्धमानाचा महावीर होणे, सिद्धार्थाचा गौतम होणे ! यासाठी नियमितपणे अध्यात्मिक साधना करुन आपल्यातील क्रोध, लोभ, काम, मोह, अंहकार मत्सर या राक्षशी प्रवॄत्तीपासुन मुक्ती साधुन, मैत्री करुया, समता-बंधुत्व प्रेमळता दयाळु वॄत्तीमध्ये जगणं यालाच भारतीय भाषेत ‘तस्मात योगीभव’ असे म्हणतात. तसे होण्याचा संकल्प या ‘ज्येष्ठ नागरिक दिनाचे निमित्ताने’ ठरवुया .


 सर्व ज्येष्ठ नागरिकांना निरोगी आरोग्यासाठी खुप शुभेच्छा....

No comments:

Post a Comment