सत्यशोधक समाजाचा १५० वा वर्धापन दिन २४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने प्रासंगिक लेख प्रसिद्धीसाठी पाठवीत आहे.
सत्यशोधक समाज : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष
१८१८ साली पेशवाई अस्तास गेली आणि हिंदुस्थानात ब्रिटिशांचा एकछत्री अंमल सुरु झाला. हा काळ म्हणजे सांस्कृतिक दृष्टीने अवनतीचा काळ म्हटला पाहिजे, ब्राम्हण कर्मकांडात बुडाले होते, समाजामध्ये कनिष्ठ जातीच्या लोकांना सामाजिक आणि बौद्धिक जीवनात कोणतीच प्रतिष्ठा नव्हती. वर्ण जातिस्त्रीदास्य व धर्मास प्राप्त झालेले विकृत स्वरूप यामुळे तत्कालीन समाजाची स्थिती दयनीय झाली होती, शोषक आणि शोषित अशा दोन वर्गामध्ये समाजाचे विभाजन झाले होते. १८६० साली भारतीय दंड संहिता अस्तित्वात आल्यानंतर दळणवळणाच्या आधुनिक साधनामुळे लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. विचारांची देवाणघेवाण व बदलत्या जगाचा परिचय यामुळे संकुचितपणाची जागा उदारमतवादाने घेतली. आधुनिक शिक्षण पद्धतीने हिंदू - मुस्लिम पारंपरिक, धार्मिक, शिक्षणसंस्था मागे पडल्या इतिहास, गणित, भूगोल, सृष्टीविज्ञान अशा आधुनिक विद्याशाखांनी धार्मिक विद्यांचे स्थान घेतले. शब्दप्रामाण्यवर आधारित कोणतीही जुनी धर्मसंस्था समाजाचा विकास खुंटवणारी आहे, हे नवशिक्षितांच्या लक्षात आले, त्यातून धर्मचिकित्सा सुरु झाली, यालाच ब्रिटिश राजवटीतला प्रबोधनाचा काळ असे म्हणतात, या काळात उदारमतवादी ब्रिटिश सत्तेच्या आगमनामुळे व ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या संपर्कामुळे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात अनेक प्रकारच्या गोष्टींच्या चर्चा सुरू झाल्या, विशेषतः हिंदू धर्मातील कालबाह्य रूढी परंपरेबद्दल व पुरोहित शाहीच्या वर्चस्वाबद्दल, अमानुष जातीप्रथेबद्दल, स्त्रियांच्या दयनीय स्थितीविषयी लिहिणाऱ्यांची संख्या वाढली. उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.आपल्या समाजात प्राचीन काळापासून धार्मिक आणि सामाजिक जीवनाच्या व्यवच्छेदक सीमारेषा कधीही स्पष्ट झालेल्या दिसत नाहीत. त्यामुळे प्रत्येक सामाजिक प्रश्नाचा कोठे ना कोठे धर्माशी संबंध आलेला आहे. प्रथम सामाजिक सुधारणा की राजकीय स्वातंत्र्य हा वाद एकोणिसाव्या-विसाव्या शतकात निर्माण झाला होता लोकहितवादी, महात्मा फुले, न्या रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याप्रमाणेच मुकुंदराव पाटील यांनी सामाजिक सुधारणेचा पक्ष घेतला. देशाच्या स्वातंत्र्याची कळकळ असणे योग्य असले तरी समाजाच्या अधोगतीकडे दुर्लक्ष करून देशाची उन्नती होणे अशक्य आहे . सर्व समाजात शांतता, समता आणि ममता यांचा प्रसार करून सर्व मागासलेल्या वर्गाची विद्यादेवीच्या मंदिरात परस्परांशी ओळख पटविणे, देशबंधुत्व अनुभवास आणून देणे ही देशोन्नतीची अंगे आहेत असे त्यांना वाटत होते तत्कालीन राजकीय चळवळ आणि बहुजन समाजाची समाजोन्नती या परस्पराहून भिन्न असल्याने ही राजकीय चळवळ मागासलेल्या व उपेक्षित वर्गाच्या उन्नतीस मारक आहे त्यामुळे बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक सुधारणाच महत्वाच्या आहेत असा विचार त्यांनी व्यक्त केला.
इंग्रजांच्या अमलांत विशेषतः बंगाल प्रांतात बदलाचे वारे वाहू लागले होते, महाराष्ट्रात सुद्धा ते लवकरच पोहोचले. महाराष्ट्रातील बुद्धिप्रामाण्यवादी, सुधारणावादी, शिक्षित वर्गाने ब्रिटिश राजवटीतील सुधारणांचा स्वीकार आनंदाने केला. या मंडळींनी वैयक्तिक प्रयत्नांबरोबरच संघटनात्मक प्रयत्ननांवर देखील विशेष जोर दिला. उच्च शिक्षित अत्यंत बुद्धिमान व समाजोद्धाराची तळमळ असणाऱ्या समाजसुधारकांनी प्रबोधनाचा लढा सुरू केला, आर्य समाज, ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज यांची भूमिका मात्र वेगळी म्हणजे वेद हे ईश्वरनिर्मित आहेत अशी त्यांची श्रद्धा होती. या तीन समाजाचे संस्थापक वरिष्ठ ब्राम्हण जातीतील होते, आध्यात्मिक समतेसाठी त्यांचे प्रयत्न होते परंतु त्यांचा सर्वसामान्य जनतेशी फारसा संबंध नव्हता, या तीन समाजाच्या पार्श्वभूमीवर सत्यशोधक समाजाने खेड्यापाड्यातील जनसामान्यांच्या मनात स्थान मिळविले, तसेच त्यांच्या जाणिवांना, आकांक्षाना आधुनिक भारताच्या जडणघडणीत जोतिबा फुले यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, परमहंस सभा, मानवधर्म सभा, यांच्याप्रमाणे सत्यशोधक समाजाचे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्या महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, भाऊ महाजन, विष्णुशास्त्री पंडित, महात्मा फुले यांनी माणसाला साध्य मानले आणि व्यक्तिवाद, विवेकवाद, इहवाद या आधारभूत तत्त्वावर स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, न्याय, सहिष्णुता या मूल्यांवर आधारित नवसमाजरचना निर्माण करण्यासाठी प्रबोधन केले. साहित्य, नियतकालिके, कृतीकार्यक्रम इत्यादींच्या माध्यमातून प्रबोधनाचा विचार सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. संघटनात्मक समाजसुधारणेचे कार्य करताना हे सर्वजण एकेश्वरवादी होते सर्व मानव एकाच ईश्वराची अपत्ये आहेत, ईश्वराची आराधना करण्यासाठी पुरोहितांची आवश्यकता नाही, महात्मा फुले यांना तर कोणताही धर्मग्रंथ, धर्मसंस्था आणि समाजसंस्था ईश्वरप्रणित आहे असे वाटत नव्हते . सारे ग्रंथ माणसानेच निर्माण केलेले आहेत त्यांच्या भोवती ईश्वरी आज्ञेचे वलय निर्माण करून समाजाची वंचना केली जाते असे त्यांचे प्रतिपादन होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील सत्यशोधक चळवळ ही एक गतिशील परिवर्तनवादी सामाजिक चळवळ होती. महात्मा फुले यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करून आपल्या कार्याला संघटनात्मक रूप दिले. धर्मसत्तेखाली भरडले व अर्थसत्तेखाली पिळलेले शेतकरी, शेतमजूर, दलित, पददलित, स्त्रिया आदी शोषित जनसमूह हे सत्यशोधक चळवळीच्या केंद्रस्थानी होते. सत्यशोधक चळवळीने आमूलाग्र सामाजिक परिवर्तनाचाआग्रह धरला. बहुजन समाजाच्या सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा अपूर्व लढा दिला. हजारो वर्षांपासून दबलेल्या, पिचलेल्या, शोषलेल्या जनसमूहाने प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आपले मानवी हक्क व मानवी प्रतिष्ठेसाठी पुकारलेले ते एक लोकआंदोलन होते. सत्यशोधक चळवळीचा मराठी जनसमूहांच्यावर दूरगामी परिणाम झाला. आधुनिक महाराष्ट्राचा पुरोगामी विचार घडविण्यात सत्यशोधक चळवळीचे सर्वाधिक श्रेय आहे. सत्यशोधक चळवळ खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेली आधुनिक भारतातील पहिली प्रबोधनपर लोकचळवळ होती.
महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून समाजाच्या पुनर्मांडणीचे बीजारोपण केले. सत्यशोधक चळवळ ही परिवर्तनाची चळवळ म्हणून सतत उल्लेखलेली गेली, पण त्याबरोबर च ती शेतकऱ्यांना आत्मभान देणारी , त्यांचे मागासलेपण आणि शोषण यांची कारणमीमांसा करणारी महाराष्ट्रातील पहिली शेतकरी चळवळ होय. सत्यशोधकांनी शेतकऱ्यांच्या जीवनातील अठराविश्वे दारिद्रय दुःख अज्ञान श्रद्धा अंधश्रद्धा याचबरोबर त्यांना नागविणारी प्रस्थापित व्यवस्था यांचे वस्तुनिष्ठ चित्र सत्यशोधकीय नियतकालिकांतून मराठी जनसमुहापुढे ठेवले या देशात सर्वाधिक शोषित उपेक्षित हा शेतकरीच असून त्याची मनमानी लूट प्रत्येकजण कशी करत असतो याचे वास्तव लोकभाषेतून निर्भीडपणे मांडले गेले. परंतु सत्यशोधक चळवळीचा शेतकरी आणि शेती विषयक विचार कोणीच गंभीरपणे घेतला नाही याचे कारण शेतकऱ्यांविषयी असलेला तुच्छताभाव आणि त्याच्या जगण्याची दखलच न घेण्याची अभिजन मानसिकता हे आहे शोषणाची मुळे शोधताना धर्मसंस्था, राज्यसंस्था, सरंजाम शाही नोकरशाही याचबरोबर इथला सामान्य जो शेतकऱ्यांच्या श्रमावर जगत होता तोही शेतकऱ्यांची मनमानी लूट करीत होता सत्यशोधक चळवळीचा श्वासच हा मुळी शेतकरी होता त्यामुळे त्यांनी या घटकांचा समाचार घेताना शेतकऱ्यांमधील घातक समजुती, रूढीपरंपरा अडाणीपणा यासारखे त्याचे जगणे उध्वस्त करणारे घटक या साऱ्यांवर सत्यशोधक चळवळीने रोखठोक आसूड ओढले.
महात्मा फुले व सत्यशोधक चळवळीने मध्यमवर्गीय, नागर, पांढरपेशा वर्गाबाहेर असलेल्या ग्रामीण शेतकरी कष्टकरी दलित वंचित जनसमूहांच्या मागासलेपणाची व शोषणाची मूलगामी मीमांसा केली व त्यांच्या समग्र मुक्तीचे क्रांतीतत्व मांडले. महात्मा फुल्यांच्या विचारांचे अधिष्ठान लाभलेली सत्यशोधक चळवळ ही प्रामुख्याने शोषित जनसमूहांना केंद्रित ठेवून निर्माण झाली होती, तसेच मानवी हक्काच्या प्रस्थापनेसाठी एका पर्यायी शोषणमुक्त, समतामूलक समाजरचनेची गरज प्रतिपादन करणारी अशी ही चळवळ होती, या चळवळीने सामाजिक व धार्मिक सुधारणांसाठी ध्येयधोरणे निश्चित करून ती यथाशक्ती राबविण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधकीय साहित्य, विधिविवाह, शेतकरी संघटन, कामगार संघटन, नियतकालिके, सत्यशोधक जलसे, प्रबोधन कीर्तने - प्रवचने, शिक्षण प्रसार अशा विविध क्षेत्रात व्यापक रचनात्मक कार्य उभे राहिले.
दीड शतक उलटल्यानंतर महात्मा फुले यांचे चरित्र आणि कार्य, त्यांची महानता, महात्मेपण उत्तरोत्तर प्रभावित आणि प्रकाशमान होत चालले आहे, काही प्रतिगामी शक्ती त्यांचे चरित्रहनन करतात परंतु सनातन विचारांच्या लोकांनीही आता जोतीरावांचे मोठेपण मान्य केले आहे, पण ज्या स्तरातील लोकांसाठी, बहुजन शेतकरी कामगारांसाठी सत्यशोधक चळवळ निर्माण झाली होती, त्यांना आता या समाजाचे महत्त्व वाटत नाही, त्यांना सत्यशोधक विचारसरणीचा विसर पडला आहे, सारा समाज गुलामगिरीतून मुक्त व्हावा, समाजात सुधारणा व्हावी, त्यांची नैतिक प्रगती घडून विवेकमूल्यांची अभिवृद्धी व्हावी हा सत्यशोधक समाज स्थापनेमागील हेतू होता, पण स्वातंत्र्यानंतर समाजाचा विवेक वाढला नाही, याउलट भ्रष्टाचार, काळाबाजार, शोषण करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या, भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान संधी व समान हक्क दिले पण अस्पृश्यांवर अन्याय होतच आहेत, खेड्यापाड्यात स्त्रियांचे शिक्षण वाढले नाही, समाजात आजही म्हणावा तसा बुद्धिवादी दृष्टीकोन निर्माण झाला नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे याचाच अर्थ सत्यशोधकांचे कार्य आजही संपले नाही, दीडशे वर्षानंतरही अपेक्षित यश प्राप्त झाले नाही त्यामुळे आता सत्यशोधक समाजाने काही गोष्टीचा फेरविचार करणे काळाची आवश्यक आहे.
- रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई
९३२३११७७०४
No comments:
Post a Comment