काळ्या पैशावर आधारित पत्रकारितेच्या खांद्यावर नैतिकतेचा झेंडा - ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर
पत्रकार शहाणा नव्हे तर पत्रकारिता सामान्यांना समजेल अशी हवी
मुंबई : (रवींद्र मालुसरे ) - पत्रकारिता करताना अनुल्लेखाने न मारता विषयाला थेट भिडायचे हे मी माझ्या पत्रकारीतेची सुरुवात करताना आचार्य अत्रे यांच्या मराठा मधून व त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्मिकचे संपादन करताना या दोन दिग्गज व्यक्तिमत्वांकडून शिकलो, माझ्या पत्रकारितेचा डिनए तोच आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी शिवाजी पार्क येथील स्वा. सावरकर सभागृहात काढले. पत्रकारितेच्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकीतून प्रबोधनाचे कार्य केल्याबद्दल केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या हस्ते भाऊ तोरसेकर यांना ‘काकासाहेब पुरंदरे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना सुधीर मुनगट्टीवार, ग्रामीण विकासमंत्री ना गिरीश महाजन, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, भाजपा माहीम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर, व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाऊ तोरसेकर पुढे असेही म्हणाले की, हल्ली वृत्तपत्राचे मालक तेच संपादक असे कितीजण आहेत, एखादा भांडवलदार कोट्यवधी रुपयांची मोठी भांडवली गुंतवणूक करून वर्तमानपत्र वा वाहिनी सुरु करतो आणि आपला पट्टा बांधून पत्रकाराला कामाला ठेवतो, त्यामुळे डरकाळी फोडण्याऐवजी तो केविलवाणे भुंकण्याचे काम त्याच्या इशाऱ्यावर करीत असतो. मालकाचा लाभ आणि त्याचा हेतू साध्य करण्याचे एक साधन म्हणून माध्यमांचा राजरोस वापर होत असल्याने अलीकडे आजच्या पत्रकारितेची दुर्दशा झालेली आहे. काळ्या पैशाचा अधिष्ठान असलेली पत्रकारिता अविष्कार स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन नैतिकतेची भूमिका मांडतात हाच मोठा विनोद आहे. सार्वजनिक जीवनात वावरणार्यांना किंवा लोकमतावर निवडून आलेल्यांना धमकावण्याचा उद्योग हे असे मुठभर लोक करीत होते. पण जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले आणि सोप्या रुपात सामान्य माणसालाही आपला आवाज जगासमोर मांडण्याची तुटपुंजी का होईना, संधी मिळाली; त्यातून पत्रकारिता वा माध्यमांचे स्वरूप निरूपयोगी झाले आणि ती गरज भागवण्यासाठी सोशल मीडियाच्या रुपाने सामान्य माणूसच एकमेकांच्या मदतीला सज्ज झाला आहे. त्याला आता पत्रकार, वृत्तपत्रे किंवा वाहिन्यांच्या उपकाराची वा कुबड्यांची गरज उरलेली नाही. पत्रकार शहाणा असावा असे नव्हे तर आपण जे बोलतो - लिहितो ते सामान्य माणसाला कसे समजेल हा विचार घेऊन पत्रकारितेत येणाऱ्या तरुणांनी डिजिटल मीडियाचा नकारात्मक वापर न करता सकारात्मक करावा.
ना रामदास आठवले, ना. सुधीर मुनगट्टीवार, ना गिरीश महाजन यांचीही भाऊंच्या पाच दशकांच्या निर्भीड पत्रकारितेचा गौरव करणारी भाषणे झाली. पत्रकारितेने समाजातील दशा दाखविताना दिशा देण्याचे एकप्रकारे समाजाचा आरसा म्हणून काम करावे. इतर क्षेत्रातील प्रदूषण कमी करता येईल परंतु समाजा-समाजात तेढ निर्माण करणारे प्रदूषण निर्माण होणार नाही याची दक्षता पत्रकारांनी घ्यायला हवी असे विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले.
काकासाहेब पुरंदरे प्रतिष्ठान आणि आचार्य अत्रे समितीच्या अध्यक्षा ऍड आरती पुरंदरे-प्रधान यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा प्रास्ताविकात मांडला. संजय भिडे, विजय कोलते, ऍड बिना पै, अमृता राव, ज्येष्ठ कवी साहेबराव ठाणगे यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका शिबानी जोशी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवी विसुभाऊ बापट, श्रीकांत मयेकर, रवींद्र आवटी, उमा बापट, अमर तेंडुलकर, ऍड. समर्थ सदावर्ते, रवींद्र मालुसरे यांनी विशेष मेहनत घेतली. आभार प्रदर्शन सुप्रसिद्ध निवेदक विजय कदम यांनी केले. राजलक्ष्मी एकसंबेकर यांनी काकासाहेब पुरंदरे यांच्यावर कविता सादर केली तर संगीता पारनेरकर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
--
रवींद्र मालुसरे
अध्यक्ष,मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ९३२३११७७०४