Sunday 22 May 2022

कॅप्टन स्मिता गायकवाड

 2004 ची गोष्ट आहे . 


भारतीय सैन्यात रुजू होणाऱ्या 75 महिला अधिकाऱ्यांच्या आमच्या कोर्स मध्ये महाराष्ट्रातून आम्ही दहा जणी होतो .


त्यापैकी तीन कुलकर्णी होत्या. तीन कुलकर्णी आणि मी एक गायकवाड  अशी आमची चौकडी होती . त्यामुळे आम्हाला  K3G  म्हटलं जायचं . सैन्यात जाण्यासाठी तयारी करत असताना जिच्याबरोबर मी Running Practice करायचे ती माझी जिवलग मैत्रीण  देशपांडे  होती जी नंतर भारतीय सैन्यात रुजू झाली . ज्याच्याबरोबर Group Discussion ची practice करायचे तो  उपासनी  होता . जे सध्या भारतीय सैन्यातील एका बटालियनचे Commanding Officer म्हणून नेतृत्व करत आहे . ज्यांनी मला सैन्यात जाण्यासाठी मार्गदर्शन केलं ते  कर्नल चितळे  होते . सैन्यात प्रशिक्षण घेवून सुट्टीवर आल्यावर घरी बोलावून कौतुक करणाऱ्या माझ्या शाळेतील वर्गशिक्षिका आणि त्यांचे पती  जनरल भट  होते . बाकी अनेक गोडबोले, रानडे, जोगळेकर ,जोशी , अभ्यंकर मी आर्मी मध्ये पाहिले आहेत .

सांगण्याचा उद्देश हा की  राजू शेट्टी  किंवा  Caravan सारख्या जातिवाद्यांनी  कितीही विष पेरायचं काम केलं तरी हा समाज स्वानुभवातून मतं बनवत असतो आणि बनवत राहील . आणि त्याही पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे _जेव्हा जोशी ,कुलकर्णी, गायकवाड, कांबळे , निंबाळकर किंवा अजून कोणीही सैन्यात भरती होतात तेव्हा ते जोशी , कुलकर्णी, गायकवाड, कांबळे,  निंबाळकर रहात नाहीत त्यांची ओळख फक्तं  "फौजी"  इतकीच असते.  फील्ड मार्शल करिअप्पा  ह्यांचा  मुलगा  म्हणजे  एअर मार्शल के सी नंदा  .भारत पाक युद्धाच्या वेळी  के सी नंदा Squadron Leader होते . त्यांचे विमान पाकिस्तानने पाडले आणि त्यांना बंदी बनवले . नंतर अयुब खान ह्यांना समजले की फिल्ड मार्शल करीअप्पा ह्यांचा मुलगा बंदी बनवला आहे ..अयुब खान आणि करिअप्पा हे दोघं ब्रिटिश आर्मी मध्ये एकत्र लढले होते . त्यामुळे अयुब खान ह्यांनी करिअप्पांना फोन करून त्यांच्या मुलाला सोडण्याची offer दिली .  करिअप्पा  तेव्हा म्हणाले की 'सगळेच POW (Prisoners of War) माझी मुलं आहेत सोडायचं असेल तर सगळ्यांना सोडा' .  जिथे रक्ताची नाती त्या युनिफॉर्म च्या नात्यापुढे दुय्यम ठरतात तिथे "जात" किस झाड की पत्ती  

राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आणि फुटीरतावाद पसरवण्यासाठी  कोणी कितीही सैनिकांच्या जाती काढण्याचा प्रयत्न केलात तर त्यातून स्वतःच्या वैचारिक दारिद्र्याचं आणि संकुचित मानसिकतेचं प्रदर्शन मांडताय. ह्यापेक्षा जास्तं काही साध्य होणार नाही .कारण बुरसटलेल्या जातीवादी संकुचित मानसिकतेपेक्षा त्या  Olive Green  वर्दीतल्या  Camaradarie  ची  ताकद खूप जास्त आहे  . जी  तुमच्या संकुचित जातीवादी मानसिकतेला आणि तुमच्या फुटीरतावादी अजेंड्याला पुरून उरेल . हा केवळ विश्वास नाही तर अनुभव आहे .


-  कॅप्टन स्मिता गायकवाड 

No comments:

Post a Comment