Tuesday, 1 September 2015

मन की बात : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या  कार्यक्रमाद्वारे  साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
 
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वांना नमस्कार,
 
मनातल्या काही गोष्टी सांगण्यासाठी आज पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मला मिळाली आहे. दक्षिण भारतातील नागरिक ओणमच्या सणात रंगले आहेत आणि कालच साऱ्या देशानं रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला. सामाजिक सुरक्षा हा मुद्दा लक्षात घेऊन भारत सरकारनं सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक नव्या योजना सुरू केल्या आहेत. अगदी अल्पावधीतच सर्वांनी या योजना स्वीकारल्या याचा मला आनंद वाटतो. रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपल्या भगिनींना या सुरक्षा योजनांची भेट आपण द्यावी अशी विनंती मी केली होती. या योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत 11 कोटी कुटूंब त्यांच्याशी जोडली गेल्याची माहिती मला मिळाली आहे आणि या योजनांचा जवळजवळ निम्मा लाभ माता-भगिनींना मिळाला आहे असंही मला सांगण्यात आलं. मी सर्व माता-भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभ पर्वाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो. आज मी आपल्याशी बोलत असताना जनधन योजना मोठ्या प्रमाणात हाती घेतल्याला एक वर्ष  झालं आहे. ते काम साठ वर्षात झालं नाही ते इतक्या कमी कालावधीत होणार का? अनेक प्रश्न होते पण हे सांगताना मला आनंद होतो की सरकारच्या सर्व संबंधित विभागांनी, बँकांच्या विभागांनी या कामात त्यांचं सर्व बळ लावलं आणि यश मिळालं. माझ्या माहितीनुसार सुमारे पावणे अठरा कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. 17 कोटी 74 लाख गरीबांची श्रीमंतीही मी पाहिली. शून्य शिलकीवर खातं उघडायचं होतं. पण गरीब नागरिकांनी बचत करून 22 हजार कोटी रुपये जमा केले. अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग बँकिंग क्षेत्रही आहे आणि ही व्यवस्था गरीबाच्या घरापर्यंत पोहचावी म्हणून बँक मित्र योजनेलाही बळकटी देण्यात आली आहे. आज सव्वा लाखाहून अधिक बँक मित्र देशभरात काम करत आहेत. तरुणांना रोजगारही मिळाला आहे. आपल्याला हे ऐकून आनंद होईल की या एका वर्षात बँकिंग क्षेत्र, अर्थव्यवस्था आणि गरीब माणूस यांना जोडण्यासाठी 1 लाख 31 हजार आर्थिक साक्षरता शिबिरांचं आयोजन केलं गेलं. फक्त खातं उघडून थांबायचं नाहीये. आता तर हजारो नागरिक या जनधन योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधेकरता पात्र आहेत आणि त्यांनी ती सुविधा घेतलीही आहे. गरीबांना बँकेतून पैसे मिळू शकतात हा विश्वास निर्माण झाला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि बँकेत खातं उघडणाऱ्या सर्वांना, गरीबातल्या गरीब बंधू-भगिनींना आवर्जून सांगू इच्छितो की तुमचं बँकेशी असलेलं नातं अतूट ठेवा. ही बँक तुमची आहे, आता तुम्ही तिला सोडू नका. मी बँक तुमच्यापर्यंत आणली आहे, आता तिला धरुन ठेवणं हे तुमचं काम आहे. आपल्या सगळ्यांची बँक खाती सक्रीय राहतील, हे तुम्ही कराल याचा मला विश्वास आहे.
 
नुकत्याच गुजरातमध्ये झालेल्या घटनांमुळे, हिंसेच्या तांडवामुळे सारा देश अस्वस्थ झाला आणि हे साहजिकच आहे की गांधीजी आणि सरदार यांच्या भूमीत काही घडलं तर साऱ्या देशाला त्याचा धक्का सर्वात आधी बसतो. त्रास होतो. परंतु अत्यंत कमी वेळात गुजरातमधल्या माझ्या सर्व सुजाण बंधुभगिनींनी परिस्थिती नियंत्रणात आणली. परिस्थिती बिघडणार नाही याकरता सक्रीय भूमिका बजावली आणि पुन्हा एकदा गुजरात शांतीच्या मार्गावर चालू लागला. शांती, एकता आणि बंधुभाव हाच योग्य मार्ग आणि आणि विकासाच्या वाटेवर चालताना खांद्याला खांदा लावून चालायचं आहे. विकास हेच आमच्या समस्यांवर उत्तर आहे.
 
सुफी संप्रदायातील विद्वान व्यक्तींना भेटण्याची संधी नुकतीच मला मिळाली. त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली आणि तुम्हाला खरं सांगतो, जणू काही संगीत ऐकू यावं असा अनुभव त्यांच्या बोलण्यातून मला जाणवला. त्यांची शब्दांची निवड, बोलण्याची पध्दत, म्हणजे सूफी परंपरेत असणारी उदारता, सौम्यपणा, ज्यात संगीताची एक लय आहे, त्या साऱ्याचा प्रत्यय या विद्वानांशी बोलताना मला आला. मला खूप छान वाटलं. बहुधा इस्लामचं खरं स्वरुप जगापर्यंत पोचवायची खरी गरज आहे. सुफी संप्रदाय जो प्रेम, औदार्य यांच्याशी जोडला गेला आहे, तो हा संदेश दूरवर पोचवेल, ज्याने मानव समाजाचं भलं होईल, इस्लामचंही भलं होईल आणि मी इतरांनाही सांगतो की आपण कोणत्याही संप्रदायाचे असा, सुफी संप्रदाय, सुफी परंपरा समजून घ्या.
 
येत्या काही दिवसांत आणखी एक संधी मिळणार आहे. आणि हे निमंत्रण मला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. जगभरातल्या अनेक देशांमधून बौध्द परंपरेतील विद्वान भारतात, बोधगया इथे येणार आहेत. मानवसमूहाच्या भल्याविषयी, कल्याणाविषयी, वैश्विक विषयांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी मला निमंत्रण मिळालं आहे, बोधगया इथे येण्याचं निमंत्रण मिळाल्याबद्दल मी आनंद आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू बोधगया इथे गेले होते. जगभरातल्या अशा विद्वान व्यक्तींबरोबर बोधगया इथे जाण्याची संधी मला मिळणार आहे हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे.
 
माझ्या प्रिय शेतकरी बंधू भगिनींनो, आज मी पुन्हा एकदा आपल्याला माझ्या मनातली गोष्ट मुद्दाम सांगू इच्छितो. मन की बातमधून यापूर्वीही हा विषय मी मांडला होता. तुम्ही ऐकलं असेल, संसदेत माझ्या भाषणात, सार्वजनिक सभांमधून, मन की बात मधून मला ऐकलं असेल. प्रत्येकवेळी मी हेच सांगत आलो की ज्या भूमी अधिग्रहण कायद्याविषयी वाद सुरू आहे, त्या बाबतीत भारत सरकारचं मन खुलं आहे. शेतकऱ्यांच्या भल्याच्या कोणत्याही सूचना स्वीकारायची माझी तयारी आहे, हे मी वारंवार सांगत आलोय. पण आज मला माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना हे सांगायचं आहे की भूमी अधिग्रहण कायद्यात सुधारणा राज्यांकडून सुचवल्या गेल्या आहेत. आग्रहपूर्वक सुचवल्या गेल्या आणि सर्वांना वाटत होतं की गावाचं, गरीब शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल, शेतापर्यंत पाणी पोचण्यासाठी कालवे बांधायचे असतील, गावात वीज येण्यासाठी खांब उभारायाचे असतील, रस्ता तयार करायचा असेल, गावातल्या गरीबांसाठी घरं बांधायची असतील, गावातल्या गरीब तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर नोकरशहांच्या तावडीतून हा कायदा मोकळा करावा लागेल म्हणून या सुधारणांचा प्रस्ताव आला. पण मी बघितलं. खूप गैरसमज पसरवले गेले, शेतकऱ्यांना घाबरवलं गेलं. माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो, माझ्या शेतकऱ्याच्या मनात शंका तर नकोच आणि भीती तर नकोच नको. शेतकऱ्यांनी शंका घ्यावी, त्यांनी घाबरावं अशी वेळच मी येऊ देणार नाही. माझ्या देशात प्रत्येकाच्या बोलण्याला, आवाजाला महत्व आहे आणि शेतकऱ्यांच्या बोलण्याला, आवाजाला तर विशेष महत्व आहे.  आम्ही एक अध्यादेश जारी केला होता, उद्या 31 ऑगस्ट रोजी त्या अध्यादेशाची कालमर्यादा संपेल आणि मी ठरवलंय की ती संपून द्यायची. याचा अर्थ असा की माझ सरकार स्थापन होण्याआधी जी स्थिती होती, ती आता पुन्हा स्थापित झाली आहे.  पण त्यात एक काम अपूर्ण राहिलं होतं, ते म्हणजे 13 अशा महत्त्वाच्या गोष्टी होत्या, असे मुद्दे होते, जे एका वर्षात पूर्ण करायचे होते, आणि म्हणून हा अध्यादेश आम्ही जारी केला होता. पण या सगळ्या वादात तो मुद्दा बाजूलाच पडला तो प्रश्न सुटलाच नाही. त्या अध्यादेशाची कालमर्यादा संपते आहे, पण ज्यामुळे शेतकऱ्यांना सरल लाभ मिळणार आहे, त्यांचा आर्थिक फायदा ज्याच्याशी थेट जोडला गेला आहे त्या 13 मुद्यांना, नियमांमध्ये बसवून आजच आम्ही अंमलात आणतो आहेात. जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही आणि म्हणून ज्या 13 मुद्यांची अंमलबजावणी याआधीच्या कायद्यात होत नव्हती ती आज आम्ही करत आहोत. माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो, मी खात्री देऊ इच्छितो की जय जवान जय किसान ही आमच्यासाठी केवळ घोषणा नाही. तो मंत्र आहे गावाचं, गरीबांचं, शेतकऱ्यांचं कल्याण. म्हणूनच 15 ऑगस्टला आम्ही सांगितलं होतं की केवळ कृषी विभागाची नाही तर कृषी आणि किसान कल्याण विभागाची स्थापना केली जाईल. या निर्णयाची आम्ही तातडीनं अंमलबजावणी करतो आहेात. माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो आता कोणतीही शंका मनात ठेवू नका आणि कुणी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला तरीही घाबरू नका.
 
आणखी एक मुद्दा मला सांगायचा आहे. 1965 च्या युध्दाला, दोन दिवसांपूर्वी 50 वर्ष पूर्ण झाली आणि जेव्हा 1965 च्या युध्दाचा विषय निघतो तेव्हा साहजिकच लालबहादूर शास्त्रीजींचं स्मरण होतं. जय जवान-जय किसान या मंत्राचंही स्मरण साहजिक होतं आणि भारताच्या तिरंग्याच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरणही साहजिकच होतं. 65 च्या युध्दात भारताला ज्यांच्यामुळे विजय मिळाला, त्या सर्वांना मी प्रणाम करतो, वीरांना प्रणाम करतो. इतिहासातील अशा घटनांपासून आम्हाला सदैव प्रेरणा मिळेल.
 
ज्याप्रमाणे गेल्या आठवड्यात सुफी संप्रदायाच्या व्यक्तींना भेटण्याची संधी मला मिळाली, तसाच एक सुखद अनुभव मला आला. देशभरातील नामवंत शास्त्रज्ञांना भेटण्याची, तासन्‌तास त्यांच्याबरोबर बोलायची संधी मला मिळाली. त्यांचं बोलणं ऐकण्याची संधी मिळाली आणि भारत विज्ञानाच्या क्षेत्रात, अनेक दिशांनी उत्तम प्रकारची कामं करत आहे हे जाणून मला आनंद वाटला. आमचे वैज्ञानिक खरोखच उत्तम कामगिरी करत आहेत. त्यांच्या संशोधनाला लोकांपर्यंत कसं पोचवता येईल? यासाठी आता आम्हाला संधी मिळाली आहे. मंत्राला यंत्रात कसं रुपांतरीत करता येईल? प्रयोगशाळा आणि शेती यांची सांगड कशी घातली जाईल? एक संधी म्हणून हे पुढं न्यायला हवं. खूप नवी माहिती मला मिळाली. मी म्हणू शकतो की माझ्यासाठी हे प्रेरणादायी तर होतंच त्याचबरोबर नवं काही शिकवणारं सुध्दा होतं. आणि मी बघितलं, अनेक तरुण वैज्ञानिक किती उत्साहानं बोलत होते. कितीतरी स्वप्नं त्यांच्या डोळ्यात दिसत होती. मन की बातमधून मागच्यावेळी मी सांगितलं होतं की विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या क्षेत्राकडे वळलं पाहिजे. या बैठकीनंतर मला वाटतंय की खूप संधी आहेत. अनेक शक्यता आहेत. मी पुन्हा सांगू इच्छितो की माझ्या तरुण मित्रांनी विज्ञानाकडे आवडीनं पहावं, आमच्या शैक्षणिक संस्थांनी त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावं.
नागरिकांकडून अनेक पत्रं मला येतात. ठाण्याहून श्रीमान परिमल शाह यांनी शैक्षणिक सुधारणांविषयी माय जीओव्ही डॉट इन वर लिहिलं आहे. कौशल्य विकासाबद्दल लिहिलं आहे. तामिळनाडूतील चिदंबरमच्या श्रीमान प्रकाश यांनी प्राथमिक शिक्षणासाठी चांगल्या शिक्षकांच्या गरजांवर भर दिला आहे. शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणांवर भर दिला आहे.
 
विशेषत: माझ्या तरुण मित्रांना एक गोष्ट मी सांगू इच्छितो. 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात मी म्हटलं होतं की खालच्या पातळीवरील नोकरीसाठी ही मुलाखत, हा इंटरव्ह्यू कशासाठी? आणि जेव्हा मुलाखतीसाठी पत्रं येतं तेव्हा प्रत्येक गरीब कुटूंब, विधवा आई या चिंतेत पडतात की कोणाची शिफारस मिळेल? कुणाच्या मदतीनं ही नोकरी मिळेल? कुणाचा वशिला लावावा लागेल? माहित नाही, काय काय शब्द वापरले जातात? सर्वांची धावाधाव होते आणि कदाचित खालच्या पातळीवरील भ्रष्टाचाराचं हेही एक कारण असावं. या खालच्या पातळीवरील निवडीसाठी तरी मुलाखतीचा ससेमिरा त्यांच्यामागे लागू नये असं मी माझ्या 15 ऑगस्टच्या भाषणात म्हटलं होतं आणि मला सांगायला आनंद होतो की इतक्या कमी कालावधीत केवळ 15 दिवस झाले आहेत, याबाबतीत सरकारनं फार वेगानं पावलं उचलली आहेत. सूचना पाठवल्या जात आहेत आणि लहान लहान पदांसाठी मुलाखतीची अट ठेवू नये या निर्णयाची आता जवळजवळ अंमलबजावणी होणार आहे.  कुणाची शिफारस मिळवण्यासाठी गरीबांना धावपळ करावी लागणार नाही. शोषण होणार नाही, भ्रष्टाचार होणार नाही.
 
सध्या भारतात जगभरातल्या अनेक देशांमधून पाहुणे आले आहेत. आरोग्यासाठी, विशेषत: माता मृत्युदर आणि शिशू मृत्युदर कमी व्हावा यासाठी, कॉल टू ॲक्शन या शीर्षकाखाली जगातल्या 24 देशांनी मिळून भारताच्‍या भूमीवर विचारमंथन केलं. अमेरिकेव्यतिरिक्त अन्य देशात पहिल्यांदा अशी बैठक झाली. आपल्या देशात प्रत्येक वर्षी जवळजवळ 50 हजार माता आणि 13 लाख बालकं, प्रसूतीवेळी आणि प्रसूतीनंतर लगेच मृत्युमुखी पडतात हे दुर्दैवानं वास्तव आहे. हे चिंताजनक आणि भयावह आहे. तसं पाहिलं तर याबाबतीत बरीच सुधारणा झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यासाठी भारताची प्रशंसा होत आहे. पण ही संख्या काही छोटी नाही. ज्याप्रमाणे आम्ही पोलिओचं निर्मूलन केलं. जननी-शिशू यांना होणाऱ्या धनुर्वाताचं उच्चाटन केलं, ते जगानं मान्य केलं. पण आता आपल्या मातांना, नवजात अर्भकांना आपल्याला वाचवायचं आहे.
 
बंधू-भगिनींनो, डेंग्यूबद्दलच्या बातम्या हल्ली येत आहेत. हे खरं आहे की डेंग्यू हा प्राणघातक आहे पण त्यापासून वाचणंही सहज शक्य आहे आणि स्वछ भारत मोहिमेविषयी मी सांगतो ना त्या मोहिमेशी त्याचा थेट संबंध आहे. दूरचित्रवाणीवर आपण जाहिरात पाहतो पण लक्ष देत नाही, वर्तमानपत्रांमधून जाहिराती छापून येतात पण आम्ही बघत नाही. शुध्द पाण्याबरोबरच घरात लहान लहान वस्तू स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. त्याबाबतीत मोठ्या प्रमाणात लोकशिक्षण होत आहे पण त्याकडे आमचं लक्ष जात नाही आणि कधी कधी वाटतं की आपण फार चांगल्या घरात राहतोय, सर्वत्र स्वच्छता आहे पण आपल्याच घरात, घरापाशी कुठेतरी पाणी साठलंय आणि आपणच डेंग्यूला निमंत्रण देतोय हे लक्षात येत नाही. मरण इतकं स्वस्त करू नका असं मी आपल्याला आग्रहपूर्वक सांगू इच्छितो. जीवन अत्यंत मूल्यवान आहे. अशुध्द पाण्याकडे दुर्लक्ष, स्वच्छतेबद्दल उदासीनता ही मृत्यूची कारणं ठरावीत हे योग्य नाही. संपूर्ण देशात सुमारे 514 केंद्रांवर डेंग्यूची तपासणी विनामूल्य केली जाते. वेळेवर त्याची तपासणी करून घेतं, जीव वाचवण्यासाठी आवश्यक आहे आणि यात आपण सगळ्यांनी सहकार्य करणंही आवश्यक आहे. स्वच्छतेकडे कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे. स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा विषय आहे.
 
रक्षाबंधन ते दिवाळी हा काळ म्हणजे आपल्या देशात अनेक उत्सवांचा काळ. आमच्या प्रत्येक उत्सवाची स्वच्छतेशी सांगड घालूया, बघा हा स्वच्छतेचा गुण तुमच्या स्वभावात आपोआप येईल.
 
माझ्या प्रिय देशवासियांनो. आनंदाची एक बातमी आज मी आपल्याला देणार आहे. देशाकरीता प्राण अर्पण करण्याचं भाग्य आता आपल्याला मिळणार नाही पण देशासाठी जगण्याचं भाग्य मात्र निश्चित मिळालं आहे असं मी नेहमी म्हणतो.
 
आपल्या देशातील दोन तरुण, दोन भाऊ, महाराष्ट्राच्या नाशिकचे डॉ. हितेंद्र महाजन आणि डॉ. महेंद्र महाजन यांच्या हृदयात आदिवासींची सेवा हीच प्रबळ इच्छा आहे, त्या दोन भावांनी भारताची शान वाढवली आहे. रेस ॲक्रॉस अमेरिका ही सायकल शर्यत, अत्यंत कठीण, सुमारे 4800 किलोमीटर अंतराची अमेरिकेतली शर्यत या दोन भावांनी जिंकली. भारताचा मान वाढवला. या दोघांचं मी अभिनंदन करतो, या दोन भावांना अनेक शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे हे संगळं, टीम इंडिया-व्हिजन फॉर ट्रायबल, आदिवासींकरीता काही करून दाखविण्याच्या उद्देशानं, हे दोघं करत आहेत याचा मला विशेष आनंद वाटला बघा. देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीनं कसे प्रयत्न करत आहे आणि हेच तर आहे-जे ऐकून उर अभिमानानं भरुन येतो.
 
कधीकधी समजून घेण्यात कमी पडल्यामुळे आपल्या तरुणांवर आपण अन्याय करतो. नव्या पिढीला काही कळत नाही हा जुन्या पिढीचा समज असतो. भारतात हे अनेक वर्ष सुरू आहे. पण युवकांच्या बाबतीत माझा अनुभव वेगळा आहे. त्यांच्याशी बोलून कधी कधी नव्या गोष्टी आपल्याला कळतात, शिकायला मिळतात. संडे ऑन सायकल हे व्रत मी घेतलं आहे, असं सांगणारे अनेक युवक मला भेटले. आठवड्यातून एक दिवस सायकल-डे असा काहींचा निश्चय आहे. आरोग्य, पर्यावरण यासाठी उत्तम आणि तरुण असण्याचा आनंद सगळचं साधलं जातं असं त्यांचं म्हणणं. आपल्या देशात हल्ली अनेक घरांमध्ये सायकल वापरणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय. त्यासाठी अनेक जण प्रोत्साहन देतात. पर्यावरण वाचवण्यासाठी, आरोग्य टिकवण्यासाठी हे चांगले प्रयत्न आहेत आणि आज माझ्या देशाच्या दोन तरुणांनी अमेरिकेत भारताचा झेंडा फडकवला, म्हणून भारतातले युवक याहीबाबतीत विचारशील आहेत याचा उल्लेख करताना मला आनंद झाला.
 
महाराष्ट्र शासनाचं आज मी विशेष अभिनंदन करतो. मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक स्थापन व्हावं हा अनेक वर्ष रेंगाळलेला विषय महाराष्ट्रातल्या नव्या शासनानं निकाली काढला. त्या जागी आता डॉ. आंबेडकरांचं भव्य-दिव्य स्मारक उभं राहील. दलित, शोषित, पीडित, वंचित यांच्याकरता कार्य करण्याची प्रेरणा ते स्मारक आम्हाला देईल.
 
त्याचबरोबर लंडनमध्ये 10 किंग हेनरी रोड जिथे डॉ. आंबेडकरांचं वास्तव्य होतं तेही घर महाराष्ट्र शासनानं खरेदी केलं आहे. तिथे एक स्मारक उभं केलं जाईल. जगभरात पर्यटनासाठी जाणारे भारतीय जेव्हा लंडनला जातील तेव्हा ते स्मारक त्यांना प्रेरणा देईल.  डॉ. आंबेडकरांचा गौरव करणाऱ्या या दोन्ही उपक्रमांसाठी मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो.
 
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, यानंतरच्या मन की बात पूर्वी तुमचे विचार माझ्यापर्यंत आवश्क पोचवा. लोकशाही, लोकांच्या सहभागातून आकाराला येते यावर माझा विश्वास आहे. खांद्याला खांदा लावून देशाला पुढे नेता येईल. आपणा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद!
 
 

No comments:

Post a Comment