Showing posts with label Terror. Show all posts
Showing posts with label Terror. Show all posts

Tuesday, 18 October 2016

'सर्जिकल' बदला घेण्याचा 'आयएसआय'चा प्लॅन - वृत्तसंस्था

नवी दिल्ली- काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना ‘आयएसआय‘ नवा प्लॅन करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी सघंटनावर बंदी घालण्यात आल्यानंतर त्या निष्क्रीय झाल्या आहेत. निष्क्रीय झालेल्या संघटनांपैकी जैसे अल् उमर मुजाहिदीन, हरकत उल अंसार/मुजाहिदीन, अल बदल, इख्वाल उल मुजाहिदीन व अल जेहाद फोर्स यांना सक्रिय करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. शिवाय, या दहशतवादी संघटनांना भारतामध्ये हल्ले घडवून आणण्याची जबाबदारी सोपविण्यात येत आहे, अशी माहिती भारताच्या गुप्तचर संघटनेने अहवालाद्वारे दिली आहे.

‘काश्मीर खोऱयामध्ये 250 दहशतवाद्यांमध्ये 107 स्थानिक नागरिकांचा सहभाग आहे. सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले घडवून आणण्यासाठी स्थानिकांची मदत होत आहे. स्थानिकांच्या मदतीने हल्ले घडवून आणण्याची योजना ‘आयएसआय‘ आखत आहे,‘ असेही गुप्तचर संघटनेने म्हटले आहे.

Monday, 17 October 2016

दहशतवादाची पाकिस्तान ही मातृभूमी- मोदी - वृत्तसंस्था

मडगाव - दहशतवादामुळे दक्षिण आशिया, पश्‍चिम आशिया, मिडल ईस्ट, यूरोपला धोका निर्माण झाला असून, दुर्दैवाने आमचा शेजारी देश जगभरातील दहशतवादाची मातृभूमी आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानवर निशाणा साधला. जगभरात दहशतवादाची जी पाळेमुळे रोवली आहेत, त्याचे मूळ आमच्या शेजारी राष्ट्राशी संबंधित आहे. हा देश दहशतवाद्यांचे फक्त आश्रयस्थान नसून, या देशाची मानसिकताही दहशतवादीच आहे, असा हल्लाबोलच त्यांनी केला. 

गोव्यामधील ब्रिक्‍स देशांच्या परिषदेत बोलताना मोदींनी दहशतवादावरून थेट नाव न घेता पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले. आर्थिक विकासाच्या मार्गात दहशतवाद हा सर्वांत मोठा अडथळा आहे. ब्रिक्‍स देशांनी दहशतवादाविरोधात ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. दहशतवादाला मदत करणाऱ्यांना बक्षीस न देता, त्यांना शिक्षा दिली पाहिजे, असे विधान करत मोदींनी चीनलाही खडेबोल सुनावले. दक्षिण गोव्यातील बाणावली येथील ताज एक्‍झोटिका हॉटेलात ब्रिक्‍स परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग, ब्राझीलचे अध्यक्ष जेकब झुमा व दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष मायकल तेमर या वेळी उपस्थित होते.

आमच्या प्रदेशात शांती, सुरक्षा व विकासाला दहशतवादामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. दुर्दैवाने दहशतवादाला शेजारच्या राष्ट्राकडून आश्रय मिळत आहे. संपूर्ण जगातील दहशतवादी पद्धती या देशाशी जोडल्या गेल्या आहेत. हे राष्ट्र केवळ दहशतवादाला आश्रय देत नाही, तर राजकीय लाभासाठी दहशतवादाचे समर्थन करणारी मानसिकता तयार करत आहे. आम्ही या मानसिकतेचा तीव्र निषेध करत आहोत, असे मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले.
दहशतवाला पाठिंबा देणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका मोदी यांनी परिषदेत मांडली. ते म्हणाले, दक्षशतवाद व दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना बक्षीस नव्हे, तर शिक्षा मिळाली पाहिजे. दहशतवादाचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वंकष आंतरराष्ट्रीय दहशतवाद परिषदेची सुरवात करण्यासाठी ब्रिक्‍स राष्ट्रांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

शांती, सुधारणा, सामंजस्य व स्पष्ट कृती हा ब्रिक्‍स राष्ट्रांचा उद्देश आहे. प्रगतिशील वाटचालीसाठी गुणवत्ता, संकल्पना, तंत्रज्ञान व भांडवल याचा ब्रिक्‍स देशांमध्ये विनाअडथळा प्रवाह सुरू झाला पाहिजे. जागतिक अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी स्पष्ट नकाशा तयार केला पाहिजे, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. विद्यमान व्यवस्थेला पूरक ठरतील अशा जागतिक संस्था आम्ही उभारल्या पाहिजेत आणि सायबर व समुद्रातील चाचेगिरी आणि मानवी व्यापार, या आव्हानांचाही एकत्रितपणे सामना केला पाहिजे, असे मोदी यांनी नमूद केले.

दहशतवादाविरोधी लढ्याला सहकार्याचा "ब्रिक्‍स‘चा ठराव

पणजी - दहशतवाद हा वाढता धोका असून, त्याविरोधात लढताना सहकार्य करण्यात येईल, असे आज ब्रिक्‍स देशांच्या परिषदेत ठरविण्यात आले. गोवा जाहीरनामा नावाने ओळखल्या जाणाऱ्या याविषयीच्या ठरावाला आज ब्रिक्‍स शिखर परिषदेच्या समारोप सत्रात मान्यता देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, ब्राझीलचे अध्यक्ष मायकल तेमर आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा सहभागी झाले होते. दिवसभर या राष्ट्रप्रमुखांच्या एकास एक पद्धतीने द्विपक्षीय चर्चा झाल्या. त्यानंतर सायंकाळी एकत्रित बैठक झाली. त्यात गोवा जाहीरनाम्याला सर्व राष्ट्रप्रमुखांनी स्वीकृती दर्शवली. दहशतवादाला थारा देणारे, पाठिंबा देणारे, प्रोत्साहन देणारेही दहशतवादासारखेच घातक असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात स्पष्ट केले.

ब्रिक्‍स परिषदेत रविवारी नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानची कोंडी करण्यावरच भर दिला. दहशतवादासंदर्भात सहकार्य करण्यावर सर्व देशांचे एकमत झाले आहे. दहशतवादाविरोधात लढा देणे, सीमेपलीकडील दहशतवाद आणि त्यांचे समर्थक, हे ब्रिक्‍स देशांच्या प्राध्यान्यक्रमावर असतील, असे मोदींनी आपल्या लेखी निवेदनातून सांगितले. आठव्या ब्रिक्‍स संमलनाचे यजमानपद भारताकडे होते, तर नववे संमेलन हे चीनमध्ये होणार आहे. दहशतवाद, कट्टरतावाद याविरोधात आमचे एकमत झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ब्रिक्‍स देश हे चांगले मित्र आणि सहकारी आहेत. ब्रिक्‍स देशांमधील भागीदारी आणखी दृढ होणे गरजेचे आहे, असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत विशेषतः ब्रिक्‍स गटाचा सदस्य असलेल्या भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करतो, असे गोवा जाहीरनाम्यात म्हटले आहे. दहशतवादाला आर्थिक आणि अन्य स्वरूपात मदत करणाऱ्यांना शोधून त्यांचा नायनाट करण्याची गरज आहे, यावर भारताने ब्रिक्‍समध्ये भर दिल्याचे मोदींनी सांगितले.

Sunday, 2 October 2016

जमीन बळकविण्याची हाव नाही- नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली - भारताने कधीच दुसऱ्या देशावर आक्रमण केलेले नाही तसेच आम्हाला इतर देशांची जमीन बळकावण्याचीदेखील हाव नाही. जेव्हा गरज भासली तेव्हा आमच्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिले असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला. मोदींच्या या वक्तव्यास भारत-पाकिस्तान संघर्षाची किनार आहे.

भारताने कधीही भूप्रदेशासाठी अन्य देशांवर हल्ला केला नाही; पण दोन जागतिक युद्धांमध्ये (ज्याचा भारताशी कधीही प्रत्यक्ष संबंध नव्हता.) आमच्या दीड लाखांपेक्षाही अधिक शूर सैनिकांनी बलिदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. प्रवासी भारतीय केंद्राच्या उद्‌घाटन समारंभामध्ये बोलताना मोदी यांनी हे वक्तव्य केले.

भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या सर्जिकल स्टाईकनंतर उभय देशांतील परराष्ट्र संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे, त्या पार्श्‍वभूमीवर मोदींनी केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. भारतीय जवानांनी मोठे बलिदान दिले असले तरीसुद्धा आम्ही ते जगाच्या लक्षात आणून देऊ शकलेलो नाही. मी जेव्हा परदेशामध्ये जातो, तेव्हा आवर्जुन हुतात्मा झालेल्या जवानांच्या स्मारकांना भेट देतो असेही मोदी यांनी नमूद केले. परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांना राजकीय सत्तेत काडीचाही रस नसतो. ते अन्य समुदायामध्ये सहज मिसळतात. परदेशामध्ये राहणारे भारतीय हे पाण्यासारखे असतात, गरजेनुसार आपला रंग आणि आकार बदलतात, असेही मोदी यांनी सांगितले.

भीती दूर करा

जगभरातील असंख्य देशांमध्ये भारतीय समुदाय ताकदवान असून तेथे त्याने अन्य लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आमच्या देशातील लोकांच्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर झाल्यास सध्या निर्माण झालेले ‘ब्रेन ड्रेन’चे रूपांतर ‘ब्रेन गेन’ध्ये होईल असा विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त केला. ज्या पद्धतीने धरणातील पाण्याचा विद्युतनिर्मितीसाठी वापर केला जातो त्याच प्रमाणे दोन कोटींपेक्षाही अधिक अनिवासी भारतीयांच्या शक्तीची भारतास प्रकाशमान होण्यासाठी गरज असल्याचे त्यांनी नमूद केले

- - पीटीआय

Friday, 30 September 2016

पाकिस्तानविरुद्ध शिवरायांची नीती प्रभावी - कर्नल सुरेश पाटील


पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईबद्दल लष्कराचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अत्यंत कौतुकास्पद आहे. उरी हल्ल्यानंतर तडकाफडकी प्रतिक्रिया न देता भारताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचा केलेला अवलंब प्रभावी आहे. या कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करायला हवे.

या परिस्थितीत थेट युद्धासाठी आव्हान देणे योग्य ठरणार नाही. मात्र, या कारवाईमुळे देशवासीयांमधील संतापाला वाट मिळेल. आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत राजनैतिक धोरण परिणामकारक ठरत असताना ताबडतोब आव्हान न देता, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी ही युद्धनीती उपयुक्त ठरेल. त्यामुळे या हल्ल्याबद्दल भारताला दोष देऊ शकणार नाहीत. अन्यथा घाईत दिलेली प्रतिक्रिया म्हणजे अपरिपक्व कारवाई वाटली असती. मागील काही वर्षांमधील प्रगतीमुळे भारताचे स्थान उंचावलेले आहे. त्याला साजेशी अशी कारवाई करण्यासाठी मोदींनी शिवाजी महारांजांची नीती वापरली आहे.

अशा हल्ल्यात कमीत कमी वेळात शत्रूचे जास्त नुकसान केले जाते. शस्त्रांचे आगार (कोट) व दारूगोळा साठविण्याची ठिकाणे उडविली जातात.

थेट युद्धाने देश 50 वर्षे मागे जाईल!

सर्जिकल स्ट्राइक अतिशय योग्य असून, त्यामुळे आपली हानी कमी होते. या उलट थेट युद्ध केल्यास ते पाच दिवस जरी झाले तर भयंकर खर्च होतो. तसे युद्ध केल्यास अर्थव्यवस्थेवर ताण येऊन पेट्रोल होईल 200 रुपये लिटर, आणि दूध होईल 100 रुपये प्रतिलिटर. युद्धामध्ये अमाप दारूगोळा वापरावा लागतो. एका तोफगोळ्यासाठी दोन हजार ते लाखो रुपयांपर्यंत खर्च होतो. 100 मीटर ते काही किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला गाठणारे हे गोळे असतात. काही वेळातच कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल, आणि युद्ध करणारा देश 50 वर्षांनी मागे जाईल.

दोन्ही देशांमध्ये 80 टक्के जनता ही कमी उत्पन्न असणारी आहे. युद्ध आणि शस्त्रास्त्र स्पर्धांमुळे अधिकाधिक खर्च होत राहतो. देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ताण वाढतो. क्युबा देशामध्ये 20 टक्के खर्च शिक्षणावर केला जातो. आपल्याकडे हे प्रमाण दीड टक्का एवढे कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही युद्ध करताना रयतेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी नेहमी घेतली. रयतेच्या कल्याणाला प्राधान्य देण्याची त्यांचे धोरण होते.

आत्मघातकी हल्ल्यांपेक्षाही प्रभावी...

दोन पाकिस्तानी दहशतवादी येऊन हल्ला करतात, आणि आपला देश हालवून टाकतात. आपणही तसे हल्ले पाकच्या हद्दीत घडवून आणू शकतो, परंतु आपल्याला लौकिकाला ते साजेसे ठरणार नाही. हानी टाळण्यासाठी ही सर्जिकल पद्धत योग्य ठरते.

शत्रूची ठाणी आणि दारुगोळा उद्ध्वस्त करणे हे परिणामकारकता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. अशा हल्ल्यांमध्ये नुकसान करून परत येऊ शकतो. हल्ला केलेल्या ठिकाणाजवळ छोटी गावे असतात, तिथे राहून हल्ला घडविण्याचे एक तंत्र आहे, मात्र भारतीय सैन्याची तिथे ताबडतोब ओळख पटू शकते, त्यामुळे ते तंत्र धोकादायक आहे. पाकपुरस्कृत दहशतवादी मात्र काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मदतीने असे हल्ले घडवून आणतात.

दहशतवाद्यांनी वापरले अत्याधुनिक तंत्र...

उरी येथे झालेल्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी अत्याधुनिक फॉस्फरस ग्रेनेडचा वापर केला. हा हल्ला अतिशय नियोजनपूर्वक केल्याचे स्पष्ट होते. हे ग्रेनेड टाकल्यावर त्याचे तुकडे उडतात, त्यातून फॉस्फरस गॅस बाहेर उडतो. त्याचा धूर होतो, शरीरावर किंवा कापडावर ते उडताच आगीचा भडका होतो. उरी हल्ल्यात  जवान आगीमध्ये होरपळून हुतात्मा झाले, त्यावरून तिथे असेच फॉस्फरस ग्रेनेड वापरल्याचे दिसते.

भारतीय सैन्याचेही नुकसान शक्य...

या हल्ल्यात आपल्या बाजूला किती हानी झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय सैन्याचेही काही नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, सीमेलगतच्या भागात भूमिगत सुरुंग (लँडमाइन) पेरलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणी जाताना व्यक्तीसोबत, जीपसारखी वाहने आणि रणगाडेसुद्धा उद्धवस्त करण्याची क्षमता असते. तसेच, पाककडून गोळीबारामुळेही हानी झालेली असेल.

खरंच युद्ध करायचं का?

युद्ध करा हे बोलणे खूप सोपे आहे. परंतु, सीमेवर लढताना आम्ही स्वतः मृत्यू जवळून पाहिला आहे. ज्याचा मुलगा युद्धात गेला आहे त्या आईला विचारा युद्ध हवंय का? जिचा नवरा युद्धात हुतात्मा झालाय त्या पत्नीला विचारा युद्ध हवे आहे का? हुतात्मा कर्नल महाडिक यांच्या घरी मी गेलो होतो, तेव्हा पत्नी गाईसारखा हंबरडा फोडत होती. ते पाहवत नव्हते.

- कर्नल सुरेश पाटील

'आसुर' मर्दन!

‘एलओसी’ओलांडून सर्जिकल स्ट्राइक; उरी हल्ल्याचा घेतला बदला

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ११ दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या विशेष जवानांनी काल मध्यरात्रीपासून आज पहाटेपर्यंत केलेल्या पाच तासांच्या लक्ष्यवेधी कारवाईत (सर्जिकल स्ट्राइक) नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे सात तळ उद्‌ध्वस्त केले. या कारवाईत किमान ३५ ते ४० दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले.

पाकिस्ताव्याप्त काश्‍मीरमध्ये जमलेल्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानी नेतृत्वाला हा इशारा मानला जातो. काल (ता. २८) मध्यरात्री सुरू झालेली ही कारवाई आज पहाटे साडेचारच्या सुमारास समाप्त झाली. नियंत्रणरेषा ओलांडून भारताने प्रथमच अशी कारवाई केली आहे. या कारवाईत हवाई दलाचेही सहकार्य होते. उरीतील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी जोरात होती. ‘उरीच्या हल्लेखोरांना शिक्षा दिली जाईल आणि १८ जवानांचे हौतात्म्य आम्ही विसरणार नाही,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते, तसेच हल्ल्याचे ठिकाण आणि वेळ लष्कर ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार लष्कराच्या विशेष जवानांनी ही कारवाई यशस्वी केली. उरीतील हल्ल्यानंतर व्याप्त काश्‍मीर व नियंत्रणरेषेपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील भागात एक आठवड्यापासून लक्ष केंद्रित करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली, तर कुपवाडा आणि पूंचजवळच्या नियंत्रणरेषेजवळील पाच-सहा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी सांगितले.

अर्थात लष्कराने कारवाईचा तपशील देण्याचे टाळले असले, तरी यात दहशतवाद्यांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची लक्षणीय प्रमाणात हानी झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ही मोहीम सुरू ठेवण्याची कोणतीही योजना नाही, असेही लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

लष्कराने काल मध्यरात्री नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त करण्यासाठी केलेली कारवाई यशस्वी झाल्यानंतर याची माहिती तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे यावर लक्ष ठेवून होते, असे कळते. यानंतर पंतप्रधान मोदींनी आज सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन या कारवाईची माहिती दिली. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही सरकारतर्फे याबाबत माहिती देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयातर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईची औपचारिकरीत्या घोषणा करण्यात आली. लष्करी कारवाई विभागाचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग आणि परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानी हद्दीमध्ये असलेल्या तळांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी जमा झाले असून, त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी निवेदनात स्पष्ट केले. अर्थात ही पत्रकार परिषद निवेदनापुरतीच मर्यादित राहिली.

लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी प्रारंभी उरी आणि पूंछमधील हल्ल्यांची पार्श्‍वभूमी विशद केली. नियंत्रण रेषेजवळील तळांवर मोठ्या संख्येने जमा झालेल्या दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा आणि जम्मू-काश्‍मीर व देशातील महानगरांमध्ये हल्ले घडवून आणण्याचा त्यांचा डाव आहे, अशी विश्‍वसनीय आणि अचूक माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने या तळांवर लक्ष्याधारीत हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) केले. या संभाव्य घुसखोरीमुळे भारतीय नागरिकांची जीवितहानी होऊ नये या उद्देशानेच लष्कराने ही कारवाई केली, असे त्यांनी सांगितले.

या कारवाईमध्ये दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली आहे. पुन्हा अशी कारवाई करण्याची लष्कराची कोणतीही योजना नाही. परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईची माहिती पाकिस्तानी ‘डीजीएमओ’ यांना देण्यात आल्याचे सांगताना लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग म्हणाले, की शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. मात्र दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेपलीकडे राहून कारवाया कराव्यात आणि आपल्या नागरिकांवर हल्ले करत राहावे हे खपवून घेतले जाणार नाही. दहशतवाद्यांना भारताविरुद्ध कारवायांसाठी आपल्या भूप्रदेशाचा वापर करू दिला जाणार नाही, या २००४ मध्ये पाकिस्तानने दिलेल्या ग्वाहीची त्यांनी पाकिस्तानला आठवण करून दिली.

उरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर १८ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सरकारवर वाढत्या दबावानंतर काल मध्यरात्री लष्कराने दहशतवाद्यांना धडा शिकवला. गेल्या वर्षी भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत शिरून नागा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्यानंतर कालच्या कृतीने भारतीय लष्कराची सक्षमता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. यामध्ये लष्कराच्या तुकड्या आणि हेलिकॉप्टरचा वापर झाल्याचे समजते.

पुन्हा अशी कारवाई करण्याची लष्कराची कोणतीही योजना नाही; परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज आहे.

- लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग, महासंचालक, लष्करी कारवाई

सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय?

नियोजनबद्ध आणि नेमकेपणाने केलेल्या लष्करी कारवाईला ‘सर्जिकल स्ट्राइक’ म्हटले जाते. या कारवाईमध्ये जे लक्ष्य असते, त्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोचणार नाही, याची काळजी यामध्ये घेतली जाते. ‘सर्जिकल स्ट्राइक’मध्ये कायद्याअंतर्गत बसणाऱ्या गोष्टींचा विचार करूनच शत्रूच्या तळावर हल्ला केला जातो. यामध्ये कोणतीही वाहने, इमारती अथवा सार्वजनिक पायाभूत सुविधांची किंवा उपयुक्त गोष्टींची हानी होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते. ठरलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन विमानातून बाँबहल्ला करणे हे ‘सर्जिकल स्ट्राइक’चे योग्य उदाहरण म्हणता येईल. जमिनीवरून बाँबहल्ला करण्याच्या हे अगदी विरुद्ध आहे.

अशी झाली कारवाई...

विशेष कृती दलाने बुधवारी (ता. २८) रात्री १२.३० ते पहाटे ४.३० या दरम्यान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दोन किलोमीटर आतपर्यंत असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर ही कारवाई केली.

जवानांना उतरविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत

व्याप्त काश्‍मीरमधील भिंबर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा सेक्‍टरमध्ये ही कारवाई झाली.

किमान १५० जवानांना या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे उतरविण्यात आले.

पर्रीकर, दोवाल यांचे कारवाईवर लक्ष

अत्यंत नियोजनबद्ध चाल करत जवानांनी सात दहशतवादी तळ नष्ट केले.

भारताची हानी नाही; मात्र किमान ३८ दहशतवादी ठार.

कारवाईनंतर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेऊन मोदींनी दिली लष्करी कारवाईची माहिती.

उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनाही दिली माहिती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनाही याविषयी सांगितले.

गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोनिया गांधींसह सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना या कारवाईबाबत माहिती दिली.

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी लष्करी कारवाईबाबत कळविले.

राजनाथसिंह यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक.

पाककडून हल्ल्याची शक्‍यता लक्षात घेऊन पंजाब, राजस्थानमधील सीमेला लागून असलेल्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर.

जम्मू आणि काश्‍मीरमध्येही याच पद्धतीची दक्षता.

हल्ला झाल्याचा पाकिस्तानकडून इन्कार; नऊ सैनिक ठार झाल्याचा दावा

संकेत धुडकावून भारताने आक्रमण केल्याचा नवाझ शरीफ यांचा कांगावा

पुढच्या वेळी आम्ही उत्तर देऊ - ख्वाजा असिफ यांची धमकी

- - सकाळ न्यूज नेटवर्क