Showing posts with label संरक्षण. Show all posts
Showing posts with label संरक्षण. Show all posts

Monday, 15 August 2016

पराक्रमी हंगपान दादांना अशोकचक्र

नवी दिल्ली - उत्तर काश्‍मीरमधील तेरा हजार फूट उंचीवर हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये रक्त गोठविणाऱ्या थंडीत पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घालत देशासाठी प्राणार्पण करणारे हवालदार हंगपान दादा यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर झाले आहे. पठाणकोट हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर देणारे लेफ्टनंट कर्नल निरंजन आणि कार्पोरल गुरूसेवक सिंह यांच्यासह संरक्षण आणि निमलष्करी दलांमधील 82 कर्मचाऱ्यांना शौर्यपदके प्रदान करून त्यांचा गौरव केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून अशोकचक्रासमवेत, 14 शौर्यचक्रे, 63 सेनापदके, दोन नौसेना पदके आणि दोन वायूसेना पदकांची घोषणा करण्यात आली.

मागील वर्षी गोव्यामध्ये अपघातग्रस्त झालेल्या डॉर्नियर विमानामधून दोन जवानांचे मृतदेह बाहेर काढणारे नौदलाचे खलाशी वीर सिंह आणि लेफ्टनंट कमांडर विकासकुमार नरवाल यांना नौसेना पदक जाहीर झाले आहे. स्क्वाड्रन लीडर अभिषेकसिंह तन्वर आणि स्क्वाड्रन लीडर भावेशकुमार दुबे यांची वायू सेना मेडलसाठी निवड झाली. भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट राधाकृष्ण राजेश नांबिराज आणि कुलदीप प्रधान यांत्रिक यांना तटरक्षक पदक बहाल केले जाणार आहे. लष्कराला एक अशोकचक्र (मरणोत्तर) 11 शौर्यचक्रे (यातील 6 मरणोत्तर) आणि 63 सेनापदके जाहीर झाली असून, यातील 12 ही मरणोत्तर बहाल केली जाणार आहेत. "ऑपरेशन मेघदूत‘, "ऑपरेशन रक्षक‘ आणि "ऑपरेशन ऱ्हिनो‘ यांसारख्या मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगारी करणाऱ्या जवानांसाठीही 28 शौर्यपदके जाहीर झाली आहेत.

पराक्रमाचे दादा

यंदा मे महिन्यामध्ये उत्तर काश्‍मीरमधील शामसाबरी भागातून घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना हंगपान दादांनी कंठस्नान घातले होते. हंगपान दादा हे मूळचे अरुणाचल प्रदेशचे. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये ते "दादा‘ नावाने परिचित होते. मागील वर्षी त्यांची येथील डोंगराळ भागामध्ये नियुक्ती झाली होती. दादांच्या लष्करी करिअरला 1997 मध्ये आसाम रजिमेंटमधून सुरवात झाली होती. त्यानंतर त्यांची 35 राष्ट्रीय रायफल्समध्ये नियुक्ती झाली होती. मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांच्या पथकाला सीमावर्ती भागामध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. दादांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने दहशतवाद्यांशी चोवीस तास झुंज देत त्यांना रोखून धरले. तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर दादांनी अन्य एका दहशतवाद्याशी थेट दोन हात करून त्याला ठार मारले. या संघर्षामध्ये दादा गंभीर जखमी झाले होते.

पोलिस, राज्यसेवेचाही सन्मान

केंद्रीय आणि राज्य पोलिस दलांमधील 948 कर्मचाऱ्यांना आज शौर्यपदके जाहीर झाली, भारत तिबेट सीमा पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे निरीक्षक गुलाम नबी भट यांच्यासह तेलंगणमधील तीन पोलिस कर्मचाऱ्यांचाही राष्ट्रपती पदकाने गौरव होणार आहे. "सीआरपीएफ‘ने यंदाही सर्वाधिक म्हणजे 43 शौर्यपदके पटकावली असून, यातील बहुसंख्य पदके ही नक्षलविरोधी कारवायांमधील सरस कामगिरीबद्दल बहाल करण्यात आली आहे. मागील सात वर्षांपासून "सीआरपीएफ‘ सर्वाधिक शौर्यपदके पटकावत आहे. मागील वर्षी 27 जुलै रोजी पंजाबच्या दिनानगर भागामध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या तीन गृहरक्षक दलाच्या जवानांना शौर्यपदके प्रदान केली जाणार आहेत.

यावर्षी मुंबईतील अग्नितांडवामध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या अग्निशामक दलाच्या चौघा कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती शौर्यपदके जाहीर झाले आहेत. सात कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिसपदक, 170 कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, 88 कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक तर, 683 कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठीचे पोलिसपदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये तेलंगणमधील 24, ओडिशातील 16, महाराष्ट्रातील दहा, झारखंडमधील आठ, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील नऊ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सीबीआय कर्मचाऱ्यांचाही गौरव

केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) कार्यरत असलेल्या 31 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिसपदक जाहीर झाले आहे. विशेष आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ही पदके त्यांना बहाल केली जाणार आहेत. सहा अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलिसपदक दिले जाणार असून, 25 कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिसपदक बहाल केले जाणार आहे. अग्निशामक दलातील 67 कर्मचाऱ्यांचाही सेवा पदके बहाल करून सन्मान केला जाणार आहे.

पीटीआय

Monday, 23 May 2016

महाराष्ट्रमुंबई महाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरात वीरमरण

श्रीनगर कुपवाडा जिल्ह्यातील ड्रगमुला भागात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेले नायक पांडुरंग महादेव गावडे यांना वीरमरण आलं आहे. गावडे यांचं रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती आज संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

पांडुरंग गावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील सुपुत्र होते. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पार्थिव सिंधुदुर्गातील त्यांच्या मूळगावी पाठवण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी तब्बल नऊ तास चाललेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देत पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. ४७ राष्ट्रीय रायफल्स, ४१ राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना ४१ राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग महादेव गावडे, ४७ राष्ट्रीय रायफल्सचे अतुल कुमार व अन्य एक जवान गंभीररीत्या जखमी झाले होते. पांडुरंग यांच्या चेहऱ्यावर गोळी लागली होती तर अतुल यांच्या उजव्या खांद्याला गोळी लागली होती. या दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत प्रथम ड्रगमुला येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर श्रीनगर येथील रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले होते. तिथे उपचार घेत असतानाच आज पांडुरंग गावडे यांची प्राणज्योत मालवली. 


पाच वर्षापूर्वी झाले होते भरती :

 पांडुरंग हे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-मुळवंदवाडीतील होते. पाच वर्षांपूर्वीच ते लष्करात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा अवघा दोन ते तीन महिन्यांचा आहे. पांडुरंग यांच्या निधनाने गावडे कुटुंब तसेच संपूर्ण आंबोलीवरच शोककळा पसरली आहे. 

मटा ऑनलाइन वृत्त 

Sunday, 15 May 2016

संरक्षण सामुग्रीसाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण

 

नवी दिल्ली : तंत्रज्ञान हस्तांतरणासह संरक्षण सामुग्रीचा पुरवठा करण्यासाठी सरकारने इस्रायलच्या काही कंपन्यांबरोबर केले आहेत. त्याचप्रमाणे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे इस्रायलच्या संरक्षण संशोधन संचालनालयाबरोबर विविध विकास कार्यक्रम आहेत. याअंतर्गत, इस्रायल तंत्रज्ञानाची देवाणघेवाण तसेच एकत्रित संशोधन प्रकल्प हाती घेतले जातात. संरक्षण कार्याचा आढावा घेण्यासाठी उभय संस्थांची वार्षिक बैठक होते. - संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर (लोकसभा)

Sunday, 8 May 2016

नवीन संरक्षण खरेदी प्रक्रिया निश्चित



नवी दिल्ली : सरंक्षण खात्यामध्ये नवीन खरेदी प्रक्रिया (2016) निश्चित करण्यात आली आहे. या प्रक्रियेची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर 28 मार्च 2016 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या नवीन खरेदी प्रक्रियेत सरकारच्या “मेक इन इंडिया अभियानाला प्राधान्य देऊन संपूर्णपणे देशी बनावटीची उत्पादने खरेदी करण्यावर भर देण्यात येणार आहे. भारतीय उद्योजकांची पूर्णपणे स्वदेशी उत्पादने लष्करात जास्तीत जास्त वापरली जावीत, यासाठी विशेष प्रयत्न नवीन खरेदी धोरण निश्चित करताना  केले आहे - संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर (राज्यसभा)   
  

Friday, 29 April 2016

रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स


नवी दिल्ली : बंगळुरुचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स केंद्र आणि पुण्याची संशोधन व विकास संस्था (इंजिनिअर्स) या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या प्रमुख प्रयोगशाळा आहेत ज्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स क्षेत्रात काम करत आहेत. डीआरडीओने रोबो सेन्ट्री, ऑटोनॉमस गाईडेड व्हेईकल आदी यापूर्वीच विकसित केले आहेत. रोबोटिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संबंधीचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी डीआरडीओने शैक्षणिक संस्थांबरोबर संशोधन करार केले आहेत - संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर (लोकसभा)