Showing posts with label बातम्या. Show all posts
Showing posts with label बातम्या. Show all posts

Tuesday, 8 September 2015

फाटलेल्या बुटाने धावला, तरीही "चॅम्पियन' बनला

नागपूर - जिद्द, चिकाटी अन्‌ डोळ्यासमोर निश्‍चित ध्येय असेल, तर कोणतीही अडचण तुमच्या यशाचा मार्ग रोखू शकत नाही. युवा धावपटू शुभम मेश्रामने ते सिद्ध करून दाखविले. त्याचे बूट फाटले होते. त्याने ते शिवले. सुसाट वेगाने धावला आणि "चॅम्पियन‘ होऊनच दम घेतला. 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे रविवारी आंतरमहाविद्यालयीन क्रॉस कंट्री आयोजित करण्यात आली. 12 किलोमीटर अंतराच्या या शर्यतीत शुभमने अव्वल स्थान पटकावून सर्वांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. शुभमने ज्या परिस्थितीत हे यश मिळविले, ते बघता कुणीही त्याची पाठ थोपटल्याशिवाय राहणार नाही. 

20 वर्षीय शुभमचे आतापर्यंतचे आयुष्य खूप कष्टात गेले. तीन-चार वर्षांचा असताना त्याची आई जळून मरण पावली. पत्नीच्या मृत्यूचा धक्‍का सहन न झाल्याने वडिलांनीही प्राण सोडला. त्या परिस्थितीत एकाकी पडलेल्या शुभमचा शिलाई मशीनचे काम करणाऱ्या मावशीने सांभाळ केला. मावशीची परिस्थितीही जेमतेम असल्यामुळे तिच्या घराच्या बांधकामाचे निमित्त साधून शुभमने रघुजीनगरात किरायाने रूम घेतली. त्यासाठी बेसा येथील बालपांडे फार्मसी कॉलेजमध्ये "लॅब अटेंडन्ट‘ म्हणून त्याने नोकरी पत्करली. दिवसभर ड्युटी करून सायंकाळी घरी परतल्यानंतर तो लगेच सरावासाठी एस. बी. सिटी महाविद्यालयाच्या मैदानावर जातो. माजी आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स प्रशिक्षक वैशाली चतारेच्या मार्गदर्शनाखाली सध्या तो प्रशिक्षण घेतो आहे. 

हजरतबाबा ताजुद्दीन महाविद्यालयात (एचबीटी) बी. ए. प्रथम वर्षाला असलेल्या शुभमने अभ्यासासाठी वेळ मिळत नसल्याने मुक्‍त विद्यापीठातून अकरावी व बारावी केली. त्याच्याकडे ऍडमिशनसाठीही पैसे नव्हते. तेव्हा एचबीटीत क्रीडा शिक्षक असलेले बाबूलाल धोत्रे यांनी त्याला महाविद्यालयात नि:शुल्क प्रवेश दिला. शुभमने क्रॉस कंट्री जिंकून एचबीटीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. शुभमला आंतरराष्ट्रीय ऍथलिट बनायचे आहे. देशासाठी 
पदक मिळवायचे आहे. दुर्दैवाने त्याच्याकडे ना दर्जेदार बूट आहेत, ना "डायट‘साठी पैसे. याही परिस्थितीत त्याचा सकाळ-सायंकाळ संघर्ष जारी आहे.

नरेंद्र चोरे : सकाळ वृत्तसेवा 

...तर पाकिस्तानचे चार तुकडे करू- स्वामी


आग्रा (उत्तर प्रदेश)- भारताने यापूर्वीच पाकिस्तानचे दोन तुकडे (पाकिस्तान व बांगलादेश) केले आहेत. दोन्ही देशांत पुन्हा युद्ध झाल्यास चार तुकडे करू, असे भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. 

शत्रूकडून पुकारल्या गेलेल्या कोणत्याही प्रकारच्या छोट्या अथवा मोठ्या युद्धाला तोंड देण्यास पाकिस्तानी लष्कर सक्षम आहे. भारताने युद्ध पुकारल्यास "मोठी किंमत चुकवावी‘ लागेल, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी म्हटले होते. 

शरीफ यांनी केलेल्या वक्तव्यावर भारतीय नेत्यांनी चांगलाच हल्ला केला आहे. पाकिस्तान घाबरले असल्याने अशा प्रकारचे वक्तव्य करत असल्याचेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. काही लोकांना वायफळ बोलण्याची सवय असते. कोणी वायफळ बोलत असेल तर खुशाल बोलू द्या. वेळ आल्यावर आपण दाखवून देऊ. भारत सर्व बाजूंनी सक्षम आहे, असे व्ही.के. सिंग यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तानने पहिले आपल्या देशातील अंतर्गत गोष्टींचा तपास करावा. पंजाबचे राज्यपालांची हत्या झाली त्याचा तपास लावावा. देशातील गरिबीकडे पहावे, असे नेते अतुल अंजान यांनी म्हटले आहे. सत्यपाल सिंग, पी.एल. पुनिया यांच्यासह मनोज झा यांनी सुद्धा शरीफ यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
[वृत्तसंस्था]

वैमानिकांचीही आता 'वन रॅंक वन पेन्शन'ची मागणी


नवी दिल्ली - भारतीय लष्करातील माजी सैनिकांसाठीच्या "वन रॅंक, वन पेन्शन‘ची (ओआरओपी) अंमलबजावणीची केंद्र सरकारकडून नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर आता एअर इंडियाच्या वैमानिकांनीही "ओआरओपी‘ची मागणी केली आहे. एअर इंडियाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांच्या एअर इंडियाच्या वैमानिकांसोबत अनेक बैठकी केल्या आहे. वैमानिकांच्या योग्य मागण्यांवर विचार केला जाईल, असे अश्विनी लोहानी यांनी सांगितले. शिवाय वैमानिकांनी संपावर न जाण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. भारतीय व्यावसायिक वैमानिक संघटनेने वैमानिकांना "ओआरओपी‘ देण्याबाबत रविवारी गुप्त मतदान घेतले असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
[वृत्तसंस्था]

भारताने हल्ल्याचा विचारही करू नये- अझीझ


इस्लामाबाद - पाकिस्तानची भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारेन समजून घ्यायला हवी. भारताने पाकिस्तानवर हल्ल्याचा विचारही करू नये, असे वक्तव्य पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीझ यांनी केले आहे.

भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चर्चा नुकतीच रद्द झाली होती. पाकिस्तानने फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याची अडमुठी भूमिका घेतल्याने ही चर्चा रद्द झाली होती. पाकिस्तानने चर्चा रद्द होण्याचे सर्व आरोप भारतावर लावले होते. आता पुन्हा पाकिस्तानकडून आगळीक सुरूच असून, भारताला दोषी ठरविण्यात येत आहे.

अझीझ म्हणाले, की भारताने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व लष्करे तैयबाचा दहशतवादी हाफिज सईदला पकडण्याचे गुप्त ऑपरेशन सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. भारताचे पंतप्रधान निवडणुकांच्या सभांमध्ये पाकिस्तानविरुद्ध नारेबाजी करतात, ते चांगले नाही. मोदी सरकारची धोरणे ही पाकिस्तानविरोधी असून, सत्तेत आल्यापासून पाकिस्तानविरोधी कारवाया होत आहेत. काश्मीरचा मुद्दा चर्चेत आल्यापासून भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध चांगले होणे अशक्य आहे. सीमेवरील शस्त्रसंधी उल्लंघन प्रकरणी सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पाकिस्तीन सैन्यामध्ये बैठक होणे गरजेचे आहे.

[वृत्तसंस्था]