आज आहे अक्षय तृतीया (आखाजी) असे आहे महात्म्य...
हिंदू धर्मशास्त्रानुसार...
गुढी पाडवा (चैत्र शुध्द प्रतिपदा),
अक्षय तृतीया (वैशाख शुध्द तृतीया),
विजया दशमी (दसरा - अश्विन शुध्द दशमी)
दिवाळी पाडवा (कार्तिक शुध्द प्रतिपदा)
हे चार दिवस साडेतीन मुहूर्त म्हणून गणले जातात. यातील दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त असून बाकीचे तिन्ही दिवस पूर्ण मुहूर्त मानले जातात. हे चारही दिवस कोणत्याही शुभकार्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. या दिवशी वेगळा मुहूर्त वेळ पाहण्याची आवश्यकता नाही. बहुतांश धर्मशास्त्र मानणारे लोक हे चारही दिवस फार महत्वाचे मानतात.
अक्षत म्हणजे कधीही क्षत न पावणारे, कधीही नाश न पावणारे, अक्षत अथवा अक्षय.
अक्षय तृतीयेला कृत युग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग' असे म्हणतात.
ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे मानले जाते. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला ‘कल्पादीं' तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचा काळ) प्रारंभ म्हणजे ‘युगादी'. ही तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येते. मात्र त्रेतायुग नेमक्या कोणत्या वर्षी सुरू झाले त्याची माहिती मिळत नाही.
ही तिथि भारतातील विविध प्रांतात विविध पद्धतीने साजरी केली जाते. या तिथिवर लक्षून सुरू केलेले कोणतेही शुभकार्य अक्षय म्हणजेच अविनाशी राहते.
चार वेद, अठरा पुराणे, तेरा उपनिषदे, रामायण व महभारत हे धर्मग्रंथ इ. हा हिंदू धर्माचा अलौकीक व अमूल्य ठेवा आहे. हिंदू संस्कृतीचा फार मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. हे केवळ थोतांड नव्हे तर आजही त्यामध्ये असलेले अनेक शास्त्रीय आधार सिध्द झाले आहेत. हिंदू धर्मातील प्रत्येक सण, वार, तिथी, परंपरागत रुढी यांचा बारकाईने अभ्यास केल्यास त्यामागे असलेला शास्त्रीय दृष्टिकोन समजून येईल. यामध्ये संस्करमुल्य जपलेली आहेत. आपल्या पूर्वजांनी हा वारसा संस्कार, श्रद्धा आणि एक शास्त्र म्हणून जपून ठेवला आहे. त्याचे आपण पुढच्या पिढ्यांनी जतन करणे आवश्यक आहे.
अक्षय तृतीया अर्थात आखाजी सणाचे महात्म्य पंचांगाप्रमाणे अनेक प्रकारच्या शुभ गोष्टींची सुरुवात त्याचप्रमाणे मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी मुहूर्त पाहिला जातो. त्यातील साडेतीन मुहूर्त असल्यास मग पंचांग शुद्धी बघण्याची गरज नसते. त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया होय.
हिंदू सणांपैकी अक्षय तृतीया हा एक महत्त्वाचा सण आहे. अक्षय तृतीया वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. शुक्लपक्ष म्हणजे अमावस्यानंतरचे १५ दिवस, ज्यामध्ये चंद्राचा आकार हळूहळू वाढत जातो.
अक्षय तृतीया शुक्ल पक्षातच येते व याला आखाती देखील म्हटले जाते. 'अक्षय'चा अर्थ होतो जो कधीही नष्ट होणार नाही. म्हणून असे म्हटले जाते की अक्षय तृतीया या तिथीत सौभाग्य आणि शुभ फळाची प्राप्ती होते.
महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहिण्यासाठी सुरुवात या दिवशी केली, तर युधिष्ठिर यास अक्षय पात्र प्राप्ती याच दिवशी झाली. पुढे याच अक्षय पात्रातून गरजूंना त्याने आयुष्यभर दान केले. याच दिवशी परशुराम जयंती, अन्नपुर्णा जयंती, गंगा अवतरण जयंती साजरी केली जाते. विवाहासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. सर्व प्रकारची शुभ कार्य, त्याचप्रमाणे मौल्यवान वस्तू खरेदी, नूतन वास्तू प्रवेश हे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केले जातात.
कृष्ण सुदामा भेट ही अक्षय तृतीया या दिवशीच झाली होती. बद्रीनारायण मंदिर यांचे दरवाजे आजच उघडतात. पाडव्याच्या दिवशी स्थानापन्न झालेल्या चैत्रगौरीचे अक्षय तृतीयेला समाप्ती पूजन होते. या समाप्ती पूजनासाठी कैरीची डाळ खीर वाटप करून हळदी कुंकू केले जाते.
श्रीकृष्णाने युधीष्ठिराला असे सांगितले होते, की 'या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून हिला अक्षयतृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.
अक्षय तृतीया हा सण खान्देशात आखाजी नावाने साजरा केला जातो. या दिवशी सासुरवाशिणी माहेरी येतात. पूजेनंतर पारंपारिक अहिराणी गाणी व खेळ खेळले जातात. सांजोऱ्या, शेवया, पुरणपोळ्या पुरणाचे मांडे, आंब्याचा रस असा बेत जेवणासाठी असतो. अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी मध्यम आकाराचा लाल माठ म्हणजे केळा व त्यावर बसेल असा छोटा माठ म्हणजे करा, त्याचप्रमाणे पाट, लाल वस्त्र, तांदूळ पाच प्रकारची फळे, सुट्टी फुले व हार असं साहित्य लागते. या दिवशी पितरांचे पूजन केले जाते. विष्णू लक्ष्मीपूजन कृष्ण पूजन या देखील या दिवशी केले जाते.
पंचांगाप्रमाणे अनेक प्रकारच्या शुभ गोष्टींची सुरुवात त्याचप्रमाणे मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी मुहूर्त पाहिला जातो. त्यातील साडेतीन मुहूर्त असल्यास मग पंचांग शुद्धी बघण्याची गरज नसते त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया होय.
अक्षय तृतीया साजरी करण्यामागे अनेक मान्यता आहेत. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेचे महत्त्व आहे. देवी लक्ष्मी आणि विष्णू भगवानाची पूजा करून त्यांना तांदूळ चढवले जातात. पूजेनंतर तुळशीच्या पानांसोबत त्यांना भोजन दिले जाते. सर्व पूजा झाल्यावर धूपबत्ती लावून आरती केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी लहान लहान गोष्टी दान करण्याचे मोठे महत्त्व आहे. दान केल्याने त्याचे फळ लवकर प्राप्त होत. शुद्ध मनाने केलेले दान अधिक फलदायी असते,
शेतीसंबंधी प्रथा...
या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते.
अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे.
या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे.
यावेळी आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.
आथानी कैरी तथानी कैरी,
यंदा करोना येल शे वैरी
आंबा खावानी इच्छा गहेरी,
कसं काय उतरुं घर नी पायरी
घरमाच झोपी फाटीग्यात झावरी,
बाहेर जावान्या येतीस लहरी
आगारी टाकाले नही शे गवरी,
बाहेर जासू ते पोलीस मारी
आथानी कैरी तथानी कैरी
यंदा करोना येल शे वैरी !!
आथानी कैरी तथानी कैरी,
घरमांच राहशात ते तब्येत बरी.!
अक्षय राहो सुख तुमचे..
अक्षय राहो धन तुमचे..
अक्षय राहो प्रेम तुमचे..
कोरोनाचा नाश होवोनी,
अक्षय राहो आरोग्य तुमचे..
आशा आहे या मंगलदिनी,
तुमच्या जीवनात नवचैतन्य येवो..
अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा..!
➖➖➖➖➖➖➖➖