Monday 18 February 2019

कुछ याद उन्हें भी कर लो...

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना रविवारी डोंगरे वसतिगृह मैदानावर नाशिककरांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांचे स्मरण करताना नागरिकांचे डोळे पाणावले. मेणबत्त्या पेटवून तसेच काही क्षण मौन धारण करून शहिदांना अभिवादन करण्यात आले.

१४ फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या वाहनांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. यामध्ये ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध सुरू आहे. नाशिकमध्येही राजकीय पक्षांसह विविध संघटनांद्वारे शहीद सर्कल, हुतात्मा स्मारकासह ठिकठिकाणी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. रविवारी गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह येथे श्रद्धांजलीसाठी एकत्रित जमण्याचे आवाहन नाशिककरांना करण्यात आले होते. त्यानुसार सायंकाळी साडेसहापासूनच नागरिकांची पाऊले डोंगरे वसतिगृहाकडे वळू लागली. देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते. महिला, मुले आणि पुरूषांसह श्रद्धांजली वाहण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय होती. येथे शहिदांना अभिवादन करणारा फलक उभारण्यात आला होता. त्यासमोर पुष्पचक्र वाहून तसेच मेणबत्त्या प्रज्वलित करून नागरिकांनी अभिवादन केले. त्यानंतर आयोजकांच्या आवाहनानुसार सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली

No comments:

Post a Comment