Monday 18 February 2019

कुलभूषणप्रकरणी आजपासून सुनावणी


पीटीआय

हेग (नेदरलॅंड) : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोचला असतानाच येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्यापासून (ता. 18) कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या सुनावणीवेळी दोन्ही देश आपापले म्हणणे मांडतील.

कुलभूषण जाधव या भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्याला पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपावरून डांबून ठेवले असून, त्यांना एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र, भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेत या शिक्षेवर स्थगिती आणली असून, या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी वेळापत्रक आखून दिले असून, त्यानुसार 18 ते 21 फेब्रुवारीदरम्यान या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. माजी महाधिवक्ता हरीश साळवे हे भारताची बाजू मांडण्याची शक्‍यता असून, पाकिस्तानतर्फे बॅरिस्टर खावर कुरेशी युक्तिवाद करतील.

सुनावणीच्या चार दिवसांमध्ये 18 तारखेला भारत आपली बाजू मांडेल, तर 19 ला पाकिस्तान त्यांची बाजू मांडणार आहे. वीस तारखेला पाकिस्तानच्या युक्तिवादावर भारत उत्तर देईल आणि अखेरच्या दिवशी 21 तारखेला पाकिस्तान उत्तर देईल. या प्रकरणाचा निकाल याच वर्षी मे महिन्यापर्यंत लागेल, अशी अपेक्षा आहे. न्यायालयाचा निकाल मान्य असेल, असे पाकिस्तानने कबूल केले आहे.

दोन्ही देशांनी दरम्यानच्या काळात आपल्या याचिका आणि विरोधी पक्षांच्या याचिकांवरील उत्तरे लेखी सादर केली आहेत. पाकिस्तानने जाधव यांना वकील न पुरवून व्हिएन्ना कराराचा भंग केला असल्याचा आरोप केला आहे.

No comments:

Post a Comment