Sunday 17 February 2019

पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना अखेरचा निरोप


पीटीआय

आग्रा : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनावर गुरुवारी (ता. 14) झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांवर त्यांच्या मूळगावी शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक ठिकाणी हजारोंच्या जमावाने या शूरवीरांना साश्रुनयनाने अंतिम निरोप दिला.

उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यातील हुतात्मा जवान कौशल कुमार रावत यांची अंत्ययात्रा आज सकाळी नऊ वाजता कऱ्हाई या गावातून काढण्यात आली. त्यांच्या कुटुंबासह सरकारी अधिकारी, राजकीय नेते व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री एस. पी. सिंह बाघेल हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. "आपल्या वडिलांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही,' असा विश्‍वास रावत यांची मुलगी अपूर्वा हिने या वेळी व्यक्त केला.

रावत यांच्या स्मारकासाठी त्यांच्या कुटुंबाला गावात जमीन देण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आज आग्रयात "बंद' पाळण्यात आला. येथील दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. नागरिकांनी पाकिस्तानविरोधात घोषणा देत मोर्चे काढले होते.

मुख्यमंत्र्यांनी दिला खांदा

डेहराडून : उत्तराखंडमधील मोहन लाल (वय 53) या "सीपीआरपीएफ'च्या हुतात्मा जवानावर हरिद्वारमध्ये गंगेच्या किनारी आज अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी हुतात्मा लाल यांच्या निवासस्थानी भेट देऊन पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून सर्व मदत देण्याची ग्वाही दिली. लाल यांच्या पार्थिवाला रावत यांनी खांदा दिला. उत्तराखंडमधील जवान वीरेंद्रसिंह हेही या हल्ल्यात हुतात्मा झाले आहे. आपल्या लाडक्‍या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक या वेळी उपस्थित होते. या वेळी "सीआरपीएफ'चे पोलिस उपमहानिरीक्षक दिनेश उन्नीयाल आणि जी. विमल बिश्‍त, राज्याचे नागरी विकास मंत्री मदन कौशिक आदी उपस्थित होते.

नितीश कुमार यांनी वाहिली श्रद्धांजली

पाटणा : बिहारमधील "सीआरपीएफ'चे हुतात्मा जवान संजय कुमार सिन्हा आणि रतन कुमार ठाकूर व झारखंडमधील विजय सोरेंग यांचे पार्थिव खास विमानाने आज पाटण्यातील विमानतळावर आणण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सोरेंग यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने झारखंडमधील त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. सिन्हा यांच्यावर मसुरी येथे, तर ठाकूर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी भागलपूरला अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment