Sunday 17 February 2019

पाकिस्तान सीमेवरील पोखरणमध्ये 'वायुशक्ती'; हल्ल्यानंतर सराव


वृत्तसंस्था

पोखरण : राजस्थानातील पाकिस्तान सीमेवरील पोखरणमध्ये हवाई दलाने जोरदार सराव केला. यात हवाई दलाची सुमारे 140 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर सहभागी झाली होती. पुलवामा हल्ल्यानंतर दोन दिवसांतच हा सराव झाल्याने त्याला महत्त्व दिले जात आहे. सुरक्षा दलांना हल्लेखोरांविरुद्ध कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. देशाचे कोणत्याही आक्रमणापासून रक्षण करण्यास हवाई दल सक्षम असल्याची ग्वाही हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी या वेळी दिली.

"वायुशक्ती' या नावाने झालेल्या या सरावात "तेजस' हे हलके लढाऊ विमान, आधुनिक हेलिकॉप्टर, जमिनीवरून आकाशात मारा करणारे "आकाश'; तसेच हवेतून हवेत मारा करणारे "अस्त्र' ही क्षेपणास्त्रे सहभागी झाली होती. लढाऊ विमान आणि हेलिकॉप्टर यांनी दिवस-रात्र लक्ष्यभेदाचा सराव केला. सुधारित "मिग-29' हे लढाऊ विमानही सरावात सहभागी झाले होते.

अचूक लक्ष्यभेद करण्याचा सराव या वेळी करण्यात आल्याचे हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितले. "एसयू-30', "मिराज-2000', "जॅग्वार', ""मिग-21' या लढाऊ विमानांचाही सरावात सहभाग होता. "आयएल-78 हर्क्‍युलस' आणि "एएन-32' ही विमानेही होती. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, विविध देशांचे संरक्षणतज्ज्ञ या सरावास उपस्थित होते.

राजकीय नेतृत्वाने सोपविलेल्या जबाबदारीला हवाई दल "योग्य प्रतिसाद' देईल.
- बी. एस. धनोआ, हवाई दलप्रमुख


No comments:

Post a Comment