Friday 20 July 2018

लष्करी विधि महाविद्यालय देशात सर्वोत्कृष्ट होईल

लेफ्ट. जनरल डी.आर. सोनी : विक्रमी वेळेत सुरू झाले कॉलेज

पुणे - फक्‍त पाच महिन्यांत महाविद्यालय सुरू करणे कठीण होते. परंतु, असाध्य गोष्टीदेखील उत्कृष्टपणे साध्य करणे, हीच सैन्याची खासियत आहे. त्यामुळे विक्रमी वेळेत हे लष्करी विधि महाविद्यालय उभारणे साध्य झाले, अशा शब्दांत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी जवानांचे कौतुक केले. तसेच पुढील पाच वर्षांत हे महाविद्यालय हे देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय बनेल, असा विश्‍वासही सोनी यांनी व्यक्त केला.

लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे सैनिक कल्याण उपक्रमांतर्गत लोणावळा जवळील कान्हे येथे "आर्मी लॉ कॉलेज'चे लेफ्टनंट जनरल सोनी यांच्या हस्ते उद्‌घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायायाधीश डी. जी. कर्णिक, राधा कालियनदास दर्याननी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रेम दर्याननी, लेफ्टनंट जनरल मनोज पांडे, लॉ कॉलेजचे अध्यक्ष ए. के. शुक्‍ला उपस्थित होते.

सोनी म्हणाले, "मुले ही देशाचे भविष्य आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरेल असे शिक्षण या महाविद्यालयात दिले जाणार आहे. सुरवातीला 60 मुले याठिकाणी प्रशिक्षण घेतील. सध्या प्रत्येक क्षेत्रात "कॉर्पोरेटायझेशन' होत आहे. अशा स्पर्धेच्या युगात या महाविद्यालयाचे विद्यार्थी टिकून राहावे, यासाठी बी.बी.ए. आणि एल.एल.बी अशाप्रकारचा अभ्यासक्रम देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त संस्थेत क्रीडा सुविधादेखील उभारल्या जाणार आहेत.

कर्णिक म्हणाले, "लष्करी कुटुंबातील मुलांसाठी स्वतंत्र विधि महाविद्यालय सुरू होणे अभिमानाची गोष्ट आहे. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी "त्यांच्या पालकांचे शस्त्र हे बंदूक आहे तर तुमच्याकडे पेन आणि भाषा हे शस्त्र आहे,' ही बाब नेहमी लक्षात ठेवावी. तसेच आपल्या शस्त्रांचा योग्य वापर करावा.'

दर्याननी म्हणाले, "सैन्य दलास उपयुक्त अशाप्रकारे पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी ही जागा देण्यात आली आहे. फक्‍त पाच महिने इतक्‍या कमी वेळात महाविद्यालयाची उभारणी करणे आव्हान होते. पण लष्कराने नियोजनबद्ध पद्धतीने कमी वेळेत काम पूर्णत्वास नेले. या माध्यमातून समाज हा लष्कराच्या सदैव पाठीशी आहे, हाच संदेश द्यायचा आहे.'

सर्वसामान्य विद्यार्थीही घेऊ शकतील प्रवेश

लष्करी विधि महाविद्यालयात सध्या फक्‍त लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. गुणवत्तेच्या आधारावर ही निवड करण्यात आली आहे. मात्र, आगामी काळात संस्थेचा विस्तार करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसोबतच प्रशासकीय पातळीवर विविध बदल केले जातील. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही या संस्थेतून शिक्षण घेऊ शकतील. मात्र त्यांची निवडदेखील गुणवत्तेच्याच आधारावर होणार आहे, अशी माहिती लेफ्टनंट जनरल सोनी यांनी दिली.

Dailyhunt

No comments:

Post a Comment