Saturday 24 February 2018

'कॅशलेस'ला प्रोत्साहन देण्यासाठी बाजार समित्यांमध्ये 'ई-नाम'

पुणे - बाजार समित्यांमध्ये कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील संपूर्ण बाजार समित्यांमध्ये "ई-नाम' योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत बाजार आवारात शेतीमालाचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात राज्यातील 30 आणि दुसऱ्या टप्यात तीस बाजार समितीमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. पुण्यातही दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात येणार आहे.

बाजार समित्यांमध्ये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. या योजनेच्या कामकाजाचा आढावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतला. यावेळी कृषी पणन मंडळ, पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह साठ बाजार समितीचे सभापती व सचिव उपस्थित होते.

ई-नाम योजना बाजार समिती व शेतकऱ्यांच्या हिताची आहे. त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करणारे देशातील महाराष्ट्र राज्य हे पहिले ठरले पाहिजे. त्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये यांची अंमलबजावणी तातडीने कशी करता येईल, या दृष्टीने प्रयत्न करावेत. ज्या बाजार समित्यांमध्ये चांगले काम चालते. त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचा तर ज्या बाजार समित्यांचे कामकाज समाधानकारक नाही, त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना यावेळी देशमुख यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment