Wednesday 23 August 2017

मूर्ती घरात बनवायची; विसर्जन करायचे घरातच

प्रमोद जेरे 

मिरज - घरगुती गणेशोत्सवासाठी घरात मूर्ती बनवायची आणि विसर्जनही घरातच करायचे, अशी निसर्गस्नेही संकल्पना शेकडो कुटुंबांनी अंमलात आणली आहे. ‘निसर्गसंवाद’च्या सात वर्षांतील प्रयत्नांना यंदा चांगले यश आले आहे. प्रतिसादही चांगला मिळतो आहे. २०१० मध्ये केवळ तीन गणेशमूर्तींनी सुरू झालेल्या उपक्रमात यंदा सव्वाशेहून अधिक कुटुंबे सहभागी झाली. सर्व कुटुंबांनी घरच्या गणेशमूर्तीचे विसर्जन घरात करण्याचा संकल्प सोडला आहे; तर काही शाडूच्या मूर्ती बनविलेल्या कुटुंबांनी त्यांच्या मूर्तींचे विसर्जन घरात करून त्याची माती शेतात पसरविण्याचे ठरविले आहे.
सात वर्षांपासून ‘निसर्गसंवाद’ ने या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. मूर्ती थेट हाताने साकारायची, अशी संकल्पना पुढे आली.

प्रसिद्ध शिल्पकार विजय गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गप्रेमी कुटुंबांची कार्यशाळा घेण्यात आली. त्यानंतर काही कुटुंबांनी यात सातत्य ठेवले. त्यांच्या घरी हाताने मूर्ती साकारण्यात आल्या. काही शेतकरी पार्श्‍वभूमीच्या कुटुंबांनी तर मूळ परंपरेप्रमाणे शेतातील चारही दिशांची माती जमा करून त्याची मूर्ती केली; तर काही कुटुंबांनी शेतातील माती, नदीकाठाची चिकन माती वापरून ‘इको’ गणेशाचे सुंदर रूप साकारले. काही मंडळींना हे जमेना. अशा हौशी मंडळींसाठी साच्यातील गणेशमूर्ती तयार करण्याच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठीही मिरजेत सहा आणि सांगलीत दोन ठिकाणी अर्चना लेले, तेजस जाधव, कल्याणी गाडगीळ आणि  वर्षा चापोरकर यांनी कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळांना शेकडो इच्छुक आले.
याच सर्वांनी आपापल्या घरी शाडू आणून साच्यातील मूर्ती तयार केल्या. सध्या सर्वजण याच मूर्तींच्या रंगरंगोटीत व्यस्त आहेत. या साच्यातील मूर्तींची रंगरंगोटीही नैसर्गिक स्वरूपाचीच आहे. घरातीलच उपलब्ध साहित्यांनी साच्यातील मूर्तीस सुबक आकार दिला जातो. त्यानंतर विटकरीचा काव आणि चुना किंवा कोळसा यापासून तयार केलेल्या रंगांनी रंगविले जाते.

मिरजेतील ११० घरांत अशा प्रकारच्या ‘इको’ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाईल. पुढील वर्षी हा आकडा आणखी वाढेल. काही वर्षांत ही चळवळ बनेल, असा विश्‍वास या संकल्पनेसाठी झटणाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

1 comment: