Saturday 17 June 2017

सक्षक्त समाजातूनच सक्षम समाजाची निर्मीती

 पुणे, दि. 16 (प्रतिनिधी) – दृष्टीहिन विद्यार्थ्यांकरीता ब्रेल साहित्याची निर्मीती, अनाथ मुलांना आई-वडिलांची माया देण्याकरीता घेतलेला पुढाकार आणि मुलींना मिळणाऱ्या संधीचे सर्वतोपरी सोने करणाऱ्या या महिलांनी समाजातील वेगवेगळ्या स्वरुपाचे प्रश्न समजून घेत काम केले आहे. सध्या महिला दिनासह आपण अनेक दिन साजरे करतो. त्यामुळे मुलींना सक्षम करीत त्यांना संधी मिळवून देण्याचे काम समतेकडे नेणारे आहे. सक्षक्त समाजातूनच सक्षम समाजाची निर्मीती होते. त्यामुळे समाजातील गरजू घटकांना संधी उपलब्ध करून देण्याकरीता पुढाकार घ्यायला हवा, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे 120 व्या मंदिर वर्धापनदिनी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. उषा काकडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, ऍड. शिवराज कदम जहागिरदार, बी. एम. गायकवाड, शिरीष मोहिते, चंद्रशेखर हलवाई, ऍड. एन. डी. पाटील, युवराज गाडवे, उल्हास कदम उपस्थित होते. निवांत अंध मुक्त विकासायलाच्या संचालिका मीरा बडवे, सावली अनाथगृहाच्या संचालिका झरीना खान आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू किशोरी शिंदे यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा तिसरे वर्ष आहे.
टिळक म्हणाल्या, भाविकांनी समाजासाठी दिलेले पुन्हा समाजाला देण्याचे मोलाचे काम दत्तमंदिर ट्रस्टच्या माध्यमातून केले जात आहे. ऊस तोडणी कामगारांपासून ते तमाशा कलावंतांपर्यंत अनेक समाजघटाकांमध्ये आम्ही काम करतो. त्यामुळे त्यांना बळ देण्याचे काम आपण प्रत्येकाने करायला हवे. शिक्षणासोबतच खेळही तितकाच महत्त्वाचा असून महापालिकेंतर्गत असलेली क्रीडांगणे अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
किशोरी शिंदे म्हणाल्या, एखाद्या शाळेमध्ये प्रवेश घेताना मुलांचे पालक शाळेतील शिक्षक, गुणवत्ता आणि निकाल यावर भर देतात. परंतु त्या शाळेला क्रीडांगण आहे का, तेथे कोणते खेळ घेतले जातात, हे देखील पहायला हवे. खेळातून विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध असून मेहनत व प्रामाणिक कष्टाच्या जोरावर ते पुढे जाऊ शकतात. अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन, तर ऍड. शिवराज कदम-जहागिरदार यांनी आभार मानले.

चौकट
माहितीदर्शक नामफलक
लक्ष्मी रस्त्याची ओळख धन या शब्दाशी निगडीत नसून कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या नावाने आहे. परंतु लक्ष्मी रस्ता असे त्याचे नामकरण सध्या प्रचलित आहे. या लक्ष्मी रस्ता अशा फलकामध्ये दुरुस्ती करीत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई पथ असे नाव द्यावे, अशी मागणी अध्यक्ष अंकुश काकडे यांनी केली. त्यावर महापौरांनी लक्ष्मी रस्त्याच्या सुरुवातीला आणि शेवटी अशा दोन्ही बाजूंना लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांची माहिती व इतिहास सांगणारा फलक महापालिकेतर्फे लवकरच बसविला जाईल, असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment