Saturday 20 May 2017

लष्कराला हवे स्वत:चे मिनी हवाई दल

 नवी दिल्ली, दि. 20 - भारतीय लष्कराने पुन्हा एकदा मिनी हवाई दलाची मागणी केली आहे. भारतीय लष्कराला स्वत:चे मिनी हवाई दल हवे आहे. यापूर्वी भारतीय लष्कराच्या या मागणीला भारतीय हवाई दलाने विरोध केला होता. भारतीय लष्कराला आपल्या ताफ्यात लढाऊ हॅलिकॉप्टरच्या तीन स्कवाड्रन्स हव्या आहेत.

लष्कराने 11 लढाऊ अपाची हॅलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. सरकारने 13,952 कोटीला वायू दलासाठी अशा 22 लढाऊ हॅलिकॉप्टर्सच्या खरेदीचा करार केला आहे. संरक्षण मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी होणा-या संरक्षण साहित्य खरेदी परिषदेच्या बैठकीत लष्कराच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

जुलै 2019 पासून भारतीय हवाई दलाला 22 अपाची हॅलिकॉप्टर्स मिळण्याची प्रक्रिया सुरु होईल. तत्कालिन काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने 22 अपाची हॅलिकॉप्टर्स हवाई दलाला देण्याचा निर्णय घेतला होता. भविष्यात लढाऊ हॅलिकॉप्टर लष्करासाठी खरेदी करण्याचे आश्वासन दिले होते. सध्या वापरात असलेल्या रशियन बनावटीच्या एमआय 25/35 हॅलिकॉप्टर्सची उपयुक्तता कमी होत चालली आहे.

ऑनलाइन लोकमत

No comments:

Post a Comment