Sunday 2 April 2017

वाहन परवाना आणि नोंदणी आधार क्रमांकाशी जोडणार

मोटर वाहन कायद्यातील दुरूस्तींना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मोटर वाहन कायद्याशी निगडीत दुरूस्ती विधेयकाला मंजुरी दिली. त्यानुसार वाहन परवाना आणि वाहनांची नोंदणी आधार क्रमांकाशी जोडण्यात येईल. या विधेयकात वाहतूक नियमांच्या भंगाबद्दल मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

परिवहन आणि रस्ते क्षेत्रांमधील सुधारणांच्या दृष्टीने महत्वाचे मानले जाणारे मोटर वाहन दुरूस्ती विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाण्याची शक्‍यता आहे. या विधेयकातील दुरूस्तीनुसार वाहन परवान्याचा अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक गरजेचा ठरेल. याशिवाय, शिकाऊ वाहन परवाना ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याने जनतेला तो मिळवण्यासाठी परिवहन कार्यालयात जावे लागणार नाही.

आधारशी निगडीत पडताळणीमुळे बनावट परवान्यांना आळा बसेल. वाहनांसाठी आणि परवान्यांसाठी रजिस्टर बनवले जाणार आहे. ते संपूर्ण देशात उपलब्ध होईल. या इलेक्‍ट्रॉनिक रजिस्टरच्या माध्यमातून वाहनांची नोंदणी करण्याचे आणि क्रमांक जारी करण्याचे अधिकार वाहन वितरकांना दिले जातील.
याशिवाय, खराब रस्त्यांबद्दल संबंधित कंत्राटदारांना दंड ठोठावण्याची तरतूदही विधेयकात करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment