Friday 17 March 2017

भाजपाच्या विजयाने चीनची वाढली डोकेदुखी

बिजींग, दि. 16 - नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या दणदणीत विजयाने चीनची चिंता वाढवली आहे. भाजपाच्या विजयामुळे आंतरराष्ट्रीय मुद्यावर भारताची भूमिका अधिक कणखर होईल. भारत तडजोड स्वीकारणार नाही असे ग्लोबल टाइम्सने आजच्या लेखात म्हटले आहे. ग्लोबल टाइम्स हे चीनमधील सत्ताधारी चीनी कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर भूमिक अधिक कठोर होईल असे ग्लोबल टाइम्सचे मत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा विजय होईल या दुस-या एका बातमीचा लेखात हवाला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूत्रे सांभाळल्यापासून कोणालाही न दुखावण्याच्या भारताच्या धोरणात बदल झाला आहे.

भारताच्या हिताला प्राधान्य देऊन वादग्रस्त मुद्यांवर मोदींची ठाम भूमिका असते.

मोदींनी पुढची निवडणूक जिंकली तर, भारताची कठोर भूमिका यापुढेही कायम राहिल.अन्य देशांबरोबर वादग्रस्त मुद्यांवर भारत तडजोडीची भूमिका स्वीकारणार नाही असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. भारत-चीन सीमेवर पंतप्रधान मोदी सैनिकांसोबत दिवाळी सादर करत असल्याचे उदहारण या लेखात दिले आहे.

भारत-चीन सीमा वादावर अजून कोणताही तोडगा दृष्टीपथात आलेला नाही. मोदींच्या राजवटीत भारत-चीन संबंध सुधारले असले तरी, रणनितीक लढाईत मोदींनी चीनला सरशी मिळू दिलेली नाही असे लेखात म्हटले आहे. भारत-चीनमध्ये व्यापारी संबंध एकाबाजूला दृढ होत असले तरी, सीमावादावर दोन्ही देशांची भूमिका अजिबात सौम्य झालेली नाही. सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैनिक अनेकदा परस्परांसमोर आले असून, दोन्ही बाजूंनी आक्रमकता दाखवली आहे.

लोकमत

No comments:

Post a Comment