Wednesday 22 March 2017

आता एक्स्प्रेसच्या तिकिटात करा राजधानीतून प्रवास

नवी दिल्ली, दि. 21 - आता भारतीय रेल्वेच्या नव्या योजनेनुसार एक्सप्रेस किंवा मेलचे तिकीट खरेदी केल्यानंतरही राजधानी किंवा शताब्दी ट्रेनमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. रेल्वेने 1 एप्रिलपासून एक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेनुसार कोणत्याही ट्रेनसाठी खरेदी करण्यात आलेल्या वेटिंगच्या तिकिटाच्या बदल्यात त्याच मार्गावरील दुसऱ्या ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट दिली जाईल.

तिकीट बुक करताना पर्यायी ट्रेनमधून प्रवास करण्याचा पर्याय निवडणाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे. या योजनेमधून साध्या मेल/एक्स्प्रेसचे तिकीट खरेदी करणाऱ्यांना त्याच मार्गावरून जाणाऱ्या सुपरफास्ट, राजधानी आणि शताब्दी सारख्या ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे.

सुरुवातीला ही योजना ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्यांना लागू केली जाईल. त्यानंतर तिकीट खिडकीवरून तिकीट खरेदी करणाऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट केले जाईल.

या योजनेंतर्गत दुसऱ्या ट्रेनमध्ये जागा उपलब्ध झाल्यावर उरलेली रक्कम परत केली जाणार नाही, तसेच दुसऱ्या ट्रेनचे तिकीट महाग असले तरी त्याची अतिरिक्त रक्कम वसूल केली जाणार नाही. त्यामुळे या योजनेतून रेल्वेला रद्द झालेल्या तिकिटांसाठी द्यावा लागणारा 7 हजार 500 कोटी रुपयांचा परतावा वाचेल.

या योजनेबाबत रेल्वेचे अधिकारी म्हणाले की, या योजनेंतर्गत आम्हाला दोन गोष्टी साध्य करायच्या आहेत. एक म्हणजे वेटिंग तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना सीट उपलब्ध करून देणे आणि दुसरी म्हणजे काही ट्रेनमधील रिकाम्या जागांची समस्या सोडवणे. त्यामुळे या योजनेचा सामान्य प्रवाशांना कसा लाभ मिळतो हे पाहावे लागेल.

लोकमत

No comments:

Post a Comment