Sunday 12 March 2017

मनोहर पर्रीकरांची घरवापसी! गोव्यात भाजपाचे सरकार?

पणजी, दि. 12 - मोदींच्या मंत्रिमंडळातील विश्वासू सहकारी असलेल्या मनोहर पर्रीकर यांची घरवापसी होणार आहे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री होणार असतील तरच पाठिंबा देऊ, अशी अट गोव्यातील स्थानिक पक्ष आणि अपक्षांनी घातल्याने पर्रीकर यांनी संरक्षण मंत्री सोडून गोव्यात परतण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, पर्रीकरांनी मगोप, गोवा फॉरवर्ड ब्लॉक आणि अपक्षांसोबत राज्यपालांची भेट घेत गोव्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यामुळे गोव्यात काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्यानंतरही भाजपाचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे.

आज महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड ब्लॉक या दोन स्थानिक पक्षांच्या प्रत्येकी तीन आमदारांनी आणि दोन अपक्ष आमदारांनी मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला पाठिंबा दिला.

त्यानंतर मनोहर पर्रिकर यांनी राज्यपालांची भेट घेत सरकारस्थापनेचा दावा केला.

काल लागलेल्या विधानसभेच्या निकालांमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह भाजपच्या अनेक मातब्बर मंत्र्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र कुठल्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने गोव्यात सरकार स्थापन करण्यासाठी चुरस निर्माण झाली होती. त्यात मगोपाच्या सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड ब्लॉकच्या विजय सरदेसाई यांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने भाजपा सत्तास्थापनेजवळ पोहोचला आहे.

दरम्यान, "आम्ही राज्यपालांची भेट घेतली, त्यांच्याकडून आमंत्रण मिळण्याची अपेक्षा आहे. सत्ता स्थापनेचं आमंत्रण मिळाल्यानंतर आम्हाला पाठिंबा देणा-यांसोबत चर्चा करून शपथ घेण्याची तारीख ठरवू," असे मनोहर पर्रिकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तर "मनोहर पर्रिकरांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा अजून दिलेला नाही, गोव्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याआधी त्यांना राजीनामा द्यावा लागेल, " असे नितीन गडकरी म्हणाले.

लोकमत

No comments:

Post a Comment