Friday 17 March 2017

नोटाबंदीमुळे जवानांचे हाल, दुर्गम भागातील जवानांच्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार


समुद्रसपाटीपासून वीस हजार फूट उंचीवर असलेल्या सियाचीन तसेच झारखंडमधील नक्षलग्रस्त भागांसारख्या दुर्गम ठिकाणी कर्तव्य बजावणाऱया जवानांना नोटाबंदीचा चांगलाच फटका बसला आहे. बँकांतून नोटा बदलून घेण्याच्या काळात अशा दुर्गम भागात तैनात असणाऱ्या जवानांना रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता आमच्या हक्काच्या पैशांसाठी पण सरकारकडे भीक मागायची का, असा सवाल जवानांकडून केला जात आहे.

नोटाबंदीची घोषणा झाली त्यावेळी सियाचीनसारख्या ठिकाणी तैनात असलेले नायक महेंद्र सिंग यांना तेथील खराब वातावरणामुळे नोटाबंदीची बातमी जवळपास आठवडाभराने कळली.

त्यांच्याजवळ त्यावेळी सहा हजार रुपयांच्या जुन्या नोटा होत्या. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणातून ३० डिसेंबरपर्यंत ज्यांना नोटा बदलता येणार नाहीत त्यांना रिझर्व्ह बँकेत जाऊन नोटा बदलता येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सिंग यांनी मार्च महिन्यातच नोटा बदलण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांनी दहा दिवसांची सुट्टीही घेतली व ते राजस्थानमधील त्यांच्या गावी आले. तेथून ते थेट रिझर्व्ह बँकेत गेले, मात्र तेथे त्यांना नोटा बदलून देण्यास नकार दिला.

असाच प्रकार झारखंडमधील नक्षलग्रस्त भागात घनदाट जंगलात तैनात असलेल्या पंकज सिंग आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे अधिकारी राजेश यांच्यासोबतही घडला. आमच्यासारखे जवान जे झारखंडमधील घनदाट जंगलात तैनात असतात. जिथे फोन, रेडिओही चालत नाहीत तिथे आम्हाला नोटाबंदीची खबर कशी काय मिळणार आणि नोटाबंदीबाबत कळलेही असते तरी नोटा बदलून घेण्यासाठी आम्हाला सुट्ट्या दिल्या असत्या का, असा संतप्त सवाल राजेश यांनी सरकारला केला आहे.

आमच्या हक्काच्या पैशासाठी भीक मागायची का?

“ज्यांच्याकडे लाखोने पैसे आहेत अशा एनआरआय लोकांना १०-२० हजार गेले तर काही फरक पडत नाही. पण आमच्यासारख्या जवानांना ३० हजारांहून कमी पगार आहे. त्यामुळे आमच्यासाठी हे पैसे खूप महत्त्वाचे आहेत. आमच्या हक्काच्या पैशांसाठी आम्ही सरकारकडे भीक मागायची का?”
– पंकज सिंग (नक्षलग्रस्त भागातील जवान)

सामना 

No comments:

Post a Comment