Sunday 12 March 2017

मिळकतकर थकबाकीदार नसावा शेजारी

अन्यथा संपूर्ण सोसायटीच वेठीस, पाणीपुरवठा सील होणार

पुणे - मिळकतकराचा थकबाकीदार नसावा शेजारी अशी म्हणायची वेळ पुणेकरांवर येणार असून ज्या सोसायट्यांमध्ये मिळकतकराची बाकी असणारे सदस्य असतील तेथील पाणीपुरवठा शुक्रवारपासून सील होणार आहे. एवढेच नाही तर त्यांना क्‍लब हाऊस आणि इतर सुविधांपासूनही वंचित रहावे लागणार आहे. राज्यशासनाने 31 मार्चपुर्वी शहरातील 90 टक्के करवसूलीचे टार्गेट महापालिकेला बंधनकारक केले आहे. शिवाय याचा थेट परिणाम महापालिका आयुक्तांच्या केआरएवर होणार असल्याने या थकबाकीदारांना हा पठाणी हिसका दाखविण्याचा अफलातून निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे एकप्रकारे थकबाकीदारांना महापालिकेच्या भरणा काऊंटरवर पाठविण्याची जबाबदारी एकप्रकारे संपूर्ण सोसायटीवर आली आहे.

दरम्यान, शहरात एक लाख80 हजार 11 थकबाकीदार मिळकतधारक असून त्यांनी सुमारे 1360 कोटी रुपयांचा मिळकतकर थकविला आहे. या सर्वांना महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यात नोटीसा बजावल्या होत्या. थकबाकी वसूल करण्यासाठी तब्बल 500 ते 600 कर्मचाऱ्यांची फौजही महापालिकेने नियुक्त केली आहे. शहरात तब्बल 8 लाख 42 हजार मिळकती आहेत. त्यांचा वार्षिक कर तसेच थकबाकी मिळून तब्बल 2300 कोटींची कर मागणी 2016-17 या आर्थिक वर्षासाठी होती. त्यातील केवळ 1064 कोटी रूपयेच कर वसूल झाला आहे. त्यातच राज्यशासनाने शहरातील वाढत्या नागरिकरणाच्या समस्या सोडवून नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या कर मागणीच्या 90 टक्के कर वसूल करण्याची अट महापालिका आयुक्तांच्या की रिझल्ट एरिया (केआरए) मध्ये घातलेली आहे. अन्यथा आयुक्तांच्या सर्व्हिस रेकॉर्डमध्ये या थकबाकीची नोंद होणार आहे. त्यामुळे महापालिकेने आता नोटीसा बजावूनही थकबाकीदार जुमानत नसल्याने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असल्याचे कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले.

संपूर्ण सोसायटीच वेठीस शहरात व्यावसायिक मिळकतींबरोबरच मोठया प्रमाणात रहिवासी मिळकतींचाही कर थकलेला आहे. अनेकदा घरात कोणीच नसल्याने त्यांना थकबाकीच्या नोटीसा मिळत नाहीत. तर एखादे घर बंद असल्यास ते सील करता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून ज्या सोसायटयांमध्ये घरांचा कर थकलेला आहे. अशा सोसयटयांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबधित सभासदांना कर भरण्याच्या सूचना देण्याची विनंती केली होती. त्यानंतरही अनेक हजारो रहिवासी मिळकतींचा कर थकीतच आहे. त्यामुळे जर एखाद्या थकबाकीदारचे घर बंद असल्यास आता प्रशासनाकडून थेट सोसायटीचे अथवा स्वतंत्र घर असल्यास त्या घराचे नळजोड तोडले जाणार आहे. या शिवाय जर सोसायटी मध्ये 50 टक्के पेक्षा अधिक थकबाकीधारक असल्यास अशा सोसायटीचे क्‍लब हाऊस, स्विमिंग पूल , गार्डन तसेच इतर ऍमेनिटी सुविधा सिल करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

परिक्षामुळे बॅंडची झाली पंचाईत
महापालिकेने थकबादीदारांच्या दारात बॅंड वाजविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सध्याच्या थकबाकीदारांमध्ये मोठया प्रमाणात शाळांच्या इमारतींचाही कर थकीत आहे. त्यामुळे हे बॅंड पथक शाळाच्या आवारात जाऊन बॅंड वाजवित आहे.मात्र, त्याच वेळी या शाळांमध्ये दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरू असल्याने या पथकाला माघारी फिरावे लागत आहे. परिक्षांमुळे बॅंड धारकांच्या झालेल्या या पंचाईतीचा गैरफायदा घेत परिक्षांमुळे बॅन्ड पथक परत जात असल्याने या शाळांकडून कर भरण्याकडे पाठ फिरविली जात असल्याचे करसंकलन विभागाकडून सांगण्यात आले.

Dailyhunt

No comments:

Post a Comment