Sunday 12 March 2017

शहीद दीपक घाडगे अनंतात विलीन

अंगापूर (सातारा), दि. 11 : सातारा तालुक्यातील फत्त्यापूर येथे शनिवारी शहीद जवान दीपक घाडगे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आठ जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या तीन फैरी झाडल्या तसेच अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री विजय शिवतारे, मंत्री महादेव जानकर, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद यादव, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे यांनी फत्त्यापूर येथे पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

शनिवारी दुपारी शहीद जवान दीपक घाडगे यांचे पार्थिव फत्त्यापूर येथील निवासस्थानी आणण्यात आले.

या ठिकाणी कुटुंबीय, ग्रामस्थ तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. चौकाचौकात आदरांजलीचे फ्लेक्स लावले होते.

अमर रहे, अमर रहे, दीपक घाडगे अमर रहे, भारत माता की जय, अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा फत्त्यापूर येथील अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, तहसीलदार स्मिता पवार, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, जिल्हा परिषद सदस्य मनोज घोरपडे, पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, सरपंच अरविंद घाडगे, विक्रम पावसकर, आई शोभा, वडील जगन्नाथ, पत्नी निशा, बहीण माया यांनी पुष्पचक्र वाहून अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर सेना दलाच्या वतीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नि. कर्नल राजेंद्र जाधव, सैनिक सहकारी बँकेचे अध्यक्ष कॅ. उदाजीराव निकम, कर्नल अरुण जाधव, १५ मराठा लाईफ इन्फंट्री बटालियनच्या वतीने कमांडिंग आॅफिसर कर्नल एम. डी. मुत्याप्पा, कर्नल आर. एस. लेहल यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

शहीद दीपक घाडगे यांच्या पार्थिवाला वडील जगन्नाथ घाडगे यांनी अग्नी दिला. यावेळी विविध अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते

आॅनलाइन लोकमत

No comments:

Post a Comment