Wednesday 8 February 2017

मोबाईल नंबर आधारला संलग्न करा

नवी दिल्ली : देशातील 100 कोटी मोबाईलधारकांचे मोबाईल क्रमांक त्यांच्या आधारकार्डाशी संलग्न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. मोबाईल सिमकार्डचा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारने योग्य यंत्रणेमार्फत सिमकार्डधारकांची काटेकोरपणे नोंद ठेवण्यात यावी, असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे.

"सिमकार्डचा दुरुपयोग टाळण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करावा' अशी मागणी करणारी जनहित याचिका नीती फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. याबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जगदीशसिंग खेहर आणि न्या. एन. व्ही. रामण्णा यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे.
मोबाईल सिमकार्ड घेताना ग्राहकांनी सादर केलेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रभावी यंत्रणा विकसित करण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात यावे; अशी मागणी नीती फाउंडेशनने केली होती. यावर केंद्राने मोबाईलधारकांच्या माहितीची पडताळणी करण्यासाठी कोणती यंत्रणा उभारली आहे; याची माहिती देणे आवश्‍यक आहे. कारण यापुढील काळात मोबाईलचा वापर आर्थिक व्यवहारांसाठी करण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे; असे मत न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीत व्यक्त केले होते. मोबाईलधारकांची ओळख पटविण्यासाठी कोणती पावले उचलली जातील; त्याची दोन आठवड्यांत माहिती द्यावी; असे आदेशही न्यायालयाने दिले.

सध्या मोबाईलधारकांची ओळख पटविण्याची प्रक्रिया ढिसाळ स्वरूपाची आहे. मात्र यापुढे बॅंकिंग व्यवहार मोबाईलद्वारे होणार असल्याने ही प्रक्रिया काटेकोरपणे करावी. अन्यथा याच कारणामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न होऊ शकतो असेही याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले.

भारतातील आधारकार्ड धारक : 1 अब्ज 11 कोटी 15 लाख
भारतातील मोबाईल वापरकर्ते
सूची - वायरलेस - वायरलाईन - एकूण
एकूण टेलिफोन वापरकर्ते- 98.081 कोटी- 2.615 कोटी- 100.696 कोटी
शहरी वापरकर्ते 56.295 कोटी- 2.125 कोटी- 58.421 कोटी
ग्रामीण वापरकर्ते 41.785 कोटी- 49 लाख- 42.275 कोटी

वृत्तसंस्था मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

No comments:

Post a Comment