Wednesday 15 February 2017

संवेदनशील "ब्राह्मोस' क्षेपणास्त्राचा पल्ला वाढणार

brahmos

नवी दिल्ली - भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमामधील अत्यंत महत्त्वाचे क्षेपणास्त्र असलेल्या "ब्राह्मोस'चा पल्ला साडेचारशे किमीपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थेकडून आज (बुधवार) करण्यात आली. ब्राह्मोस हे भारत व रशिया या देशांनी संयुक्तरित्या विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.

या नव्या रुपातील ब्राह्मोसची पहिली चाचणी येत्या 10 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. सध्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा पल्ला तीनशे किमी इतका आहे. याचबरोबर, येत्या अडीच वर्षांत ब्राह्मोसचा पल्ला आठशे किमीपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचा मनोदय डीआरडीओकडून व्यक्त करण्यात आला आहे. डीआरडीओचे मुख्य अधिकारी एस ख्रिस्तोफर यांनी यासंदर्भातील संकेत दिले आहेत. ब्राह्मोसचा पल्ला वाढविण्यात आल्यामुळे पाकिस्तानमधील कोणत्याही भागामध्ये या क्षेपणास्त्राने हल्ला करण्याची क्षमता भारतास प्राप्त होणार आहे.

क्षेपणास्त्रांच्या विकास कार्यक्रमाच्या दृष्टिकोनामधून अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटामध्ये (एमटीसीआर) नुकत्याच झालेल्या समावेशानंतर आता ब्राह्मोसचा पल्ला वाढविण्याचा भारताचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. एमटीसीआर अंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळेच ब्राह्मोसचा पल्ला तीनशे किमीपर्यंत मर्यादित ठेवणे भारतास भाग पडले होते. मात्र आता एमटीसीआरचे निर्बंध हटविण्यात आल्याने ब्राह्मोससहित एकंदरच भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमास नवी उर्जा मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

वृत्तसंस्था

No comments:

Post a Comment