Saturday 17 December 2016

बेहिशेबी पैसा 1 एप्रिलपर्यंत जाहीर कराः गंगवार

notes

नवी दिल्ली: पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत बेहिशेबी रोकड अथवा बॅंकेतील जमा 1 एप्रिल 2017 पर्यंत जाहीर करता येईल, अशी माहिती केंद्र सरकारने आज (शुक्रवार) दिली.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले, की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 50 टक्के कर, अधिभार भरून बेहिशेबी पैसा आणि बॅंकेतील बेहिशेबी जमा जाहीर करता येणार आहे. मात्र, जाहीर केलेल्या पैशांपैकी एकचतुर्थांश रक्कम बिनव्याजी बॅंकेत ठेवावी लागणार आहे. कर कायदा दुरुस्ती विधेयक 2016 लोकसभेने अर्थ विधेयक म्हणून 29 नोव्हेंबरला संमत केले आहे. याचाच भाग पंतप्रधान गरीब कल्याण योजना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हापासून बॅंकेत या बंद नोटा जमा होण्याचे प्रमाण वाढले आहे. बॅंकांमध्ये 10 नोव्हेंबरपासून 12.44 लाख कोटी रुपयांच्या या नोटा जमा झाल्या आहेत. बंद केलेल्या नोटा 15.4 लाख कोटी रुपयांच्या होत्या आणि एकूण चलनात त्यांचे प्रमाण 86 टक्के होते.

अन्य कायद्यांपासून संरक्षण नाही
या योजनेअंतर्गत उत्पन्न जाहीर करणाऱ्याला परकी चलन विनिमय कायदा, तस्करी प्रतिबंध कायदा, अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, बेनामी मालमत्ता कायदा आणि करचुकवेगिरी कायद्यापासून कोणतेही संरक्षण नाही, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी स्पष्ट केले.

वृत्तसंस्था शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

No comments:

Post a Comment