Monday 21 November 2016

‘प्राप्तिकर’कडून खात्यावरच्या रकमेची दखल - पीटीआय

नवी दिल्ली - बॅंक खात्यांमध्ये पाचशे व हजाराच्या नोटांच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात जमा होत असलेल्या रकमेची दखल घेण्यास प्राप्तिकर विभागाने सुरवात केली आहे. प्राप्तिकर विभागाने याप्रकरणी शेकडो नागरिकांना नोटिसा बजावून पैशांच्या स्रोतांची विचारणा केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर खात्याने देशभरात व्यक्ती, तसेच कंपन्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या मोठ्या रकमेची दखल घेतली आहे. अशांना प्राप्तिकर कायद्यातील कलम १३३ नुसार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांद्वारे या पैशाच्या स्रोतांची विचारणा केली आहे. बॅंक खात्यामध्ये अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रकम संशयास्पदरीत्या जमा झाल्याचे बॅंकांकडून प्राप्तिकर विभागाला कळविण्यात येत आहे. यानुसार या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

विभागाने पाठविलेल्या नोटिसांमध्ये त्या व्यक्तीच्या बॅंक खात्यावर जमा झालेली रक्कम, त्याची तारीख आदी तपशील देण्यात आले आहेत. या रकमेचा स्रोत व अन्य पुरावे संबंधित व्यक्तीला प्राप्तिकर विभागासमोर सादर करावे लागणार आहेत. प्राप्तिकर विवरणपत्र भरले असल्यास मागील दोन वर्षांची त्याची प्रतही सादर करावी लागणार आहे.
धर्मादाय संस्थांनाही नोटिसा
प्राप्तिकर विभागाने शेकडो धर्मादाय, तसेच धार्मिक संस्थांना नुकत्याच नोटिसा बजावल्या आहेत. या संस्थांना प्राप्तिकरातून सवलत असली, तरी त्यांनी त्यांच्याकडील ८ नोव्हेंबरपर्यंतच्या रोख रकमेचे तपशील मागविले होते. या संस्थांमधून काळा पैसा पांढरा होण्याची शक्‍यता असल्याने त्यांच्याकडूनही माहिती मागविण्यात आली होती. सहकारी बॅंकांत जमा झालेल्या पैशावरही प्राप्तिकर विभाग नजर ठेवून आहे.

नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार दररोज अर्थ मंत्रालयाकडून निर्णय घेतले जात आहेत. यात कोणतीही गोंधळाची स्थिती नसून सरकार दक्ष आहे. जनतेच्या विरोधातील निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाला परवडणारा नसतो. पक्षाला शेवटी जनतेकडेच जावे लागते. लोकांना दिलासा देण्यासाठी प्राप्तिकर मर्यादा वाढविण्यापासून अनेक सूचना सरकारकडे येत आहेत.
- निर्मला सीतारामन, केंद्रीय वाणिज्य मंत्री

बॅंक खात्यांमध्ये बंद झालेल्या नोटांचा मोठा भरणा होत असल्याचे आढळले आहे. अशा खातेदारांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. यात काळा पैसा आहे का, याचा शोध घेतला जात आहे

- प्राप्तिकर विभाग

No comments:

Post a Comment