Wednesday 12 October 2016

मैत्रिपूर्ण शत्रुत्व!

 

ब्रह्मपुत्रेच्या पाणीवाटपाबाबत सहकार्याची आणि ‘एनएसजी’मध्ये सहभागासाठी चर्चेची तयारी चीनने दर्शविली आहे. ही चीनची गाजरे कितीही गोजिरवाणी व गोड वाटत असली तरी, त्यामागील डावपेच अजमावूनच भारताला पावले टाकावी लागतील.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या पाकिस्तान ‘एकाकी’ अवस्थेत आहे. काश्‍मिरातील उरी येथील लष्करी तळावर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर जगभरात पुरेशी वातावरणनिर्मिती करून भारताने ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला आणि अनेक दहशतवाद्यांचा खातमा केला. तेव्हा जगातील एकही राष्ट्र पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिले नव्हते. मात्र, दरम्यानच्या काळात भारतातून पाकिस्तानला जाणारे सिंधू नदीचे पाणी रोखण्याचा प्रश्‍न चर्चेत आला आणि चीनला खडबडून जाग आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पाठराखण करणारा चीन हा एकमेव देश असल्याचे चित्र निर्माण झाले. खरे तर पंडित नेहरू आणि चौ एन लाय यांनी हातात हात घालून दिलेल्या ‘भारत-चीन भाई भाई!’ या घोषणा हवेत विरून जाण्याआधीच चीनने मॅकमोहन रेषा ओलांडून भारतावर आक्रमण केले होते. तेव्हापासून आपले चीनशी असलेले संबंध हे कधी प्रेमाचे, तर कधी तिरस्काराचे म्हणजेच ‘लव्ह-हेट’ या धर्तीचे राहिले आहेत. मात्र, येत्या आठवड्यात गोव्यातील ‘ब्रिक्‍स’च्या बैठकीसाठी होणाऱ्या चिनी पंतप्रधान शी जिनपिंग यांच्या भारतभेटीच्या निमित्ताने चीन एकीकडे दोस्तीचा, तर त्याचवेळी दुसरीकडे धमकावणीचा राग आळवू पाहत आहे. चीनचे दुटप्पी धोरण आणि चेहऱ्यावरील मुखवटा, अशा दोन्ही बाबी त्यामुळे अधोरेखित झाल्या आहेत. पाकिस्तानला त्यामुळे काहीसे हायसे वाटले असणार, यात शंकाच नाही!

चिनी प्रसारमाध्यमे, आंतरराष्ट्रीय राजकारणाचे चिनी विशेषज्ज्ञ व चीनचे अधिकृत प्रवक्‍ते यांनी शी जिनपिंग यांच्या भारतभेटीच्या पार्श्‍वभूमीवर ज्या काही वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत, त्या बघितल्या की कोणीही चक्रावून जाईल. उरी येथील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानबरोबरची संपूर्ण सीमा ‘सील’ करण्याची घोषणा अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केली आहे. ही घोषणा संपूर्णपणे ‘अतार्किक’ आहे; कारण उरी येथील हल्ला पाकिस्तानने केला होता, असा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे चिनी ‘विशेषज्ज्ञ’ छातीठोकपणे सांगत आहेत, तर त्याचवेळी अणू पुरवठादारांच्या गटातील (एनएसजी) भारताच्या सहभागासाठी आजवर घातलेला कोलदांडा बाजूस सारून, या प्रश्‍नावर चर्चा करण्याची तयारी असल्याचे चीनचे उपपरराष्ट्रमंत्री ली बोओडोंग यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय, भारताने सिंधू नदीच्या पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या पाण्याचा प्रश्‍न चर्चेत आणताच,ब्रह्मपुत्रेच्या पाणीवाटपाचा कोणताही वाद नसल्याचे सांगत या संदर्भात सहकार्याची तयारी चीनने दर्शविली आहे. मात्र, यामुळे भारताने लगेच हुरळून जाता कामा नये. कारण, एकीकडे भारताला ही अशी खुशीची गाजरे दाखवतानाच, ‘दहशतवादाचा वापर राजकीय हेतूंसाठी करता येणार नाही!’ असा अनाहूत सल्लाही देऊन चीन मोकळा झाला आहे. चीनच्या या भूमिकेकडे केवळ ‘सल्ला’ म्हणून न बघता, तो खरे तर एक प्रकारचा ‘इशारा’च आहे, हे पूर्वानुभवावरून लक्षात घ्यायला हवे. सध्या भारताचे संपूर्ण लक्ष हे पाकपुरस्कृत ‘जैशे महंमद’ या अतिरेकी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अजहरवर केंद्रित झाले आहे. भारतातील अलीकडील अनेक दहशतवादी कारवायांचा सूत्रधार मसूद अजहर हाच असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संयुक्‍त राष्ट्रांनी त्यास ‘दहशतवादी’ जाहीर करावे, या भारताच्या मागणीवर चीनने घेतलेली भूमिका पाठीमागून वार करणारीच आहे. अणू पुरवठादारांच्या गटातील भारताच्या सहभागासाठी चर्चेची तयारी दाखवून, आजवर या प्रश्‍नावर केलेला विरोध कमी होतो आहे की काय, असे चित्र एकीकडे उभे करतानाच आपले दाखवायचे आणि खायचे दात वेगवेगळे आहेत, हेही मसूद अजहरच्या निमित्ताने चीनने दाखवून दिले आहे. त्यामुळे ‘ब्रिक्‍स’च्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘एनएसजी’च्या प्रदीर्घ काळ प्रलंबित प्रश्‍नावर चिनी पंतप्रधानांबरोबरील चर्चेत सावधगिरीची भूमिका घ्यावी लागणार आहे.

उरी येथील हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेली कारवाई, या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरून सध्या पाकिस्तान कमालीचा अडचणीत आला आहे. त्यामुळेच ‘ब्रिक्‍स’च्या बैठकीच्या निमित्ताने भारताची या आणि इतर संबंधित विषयांवरून होता होईल, तेवढी कोंडी करण्याचा चीन प्रयत्न करणार, हे स्पष्ट आहे. त्यातच दिवाळीनंतर दोन आठवड्यांनी चीनशी संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या हेतूने भारत-चीन यांच्या संयुक्‍त लष्करी कवायती होणार आहेत. खरे तर ‘ब्रिक्‍स’ बैठकीनंतर भारत-चीन संबंध नेमके कोणत्या वळणावर जाऊन उभे राहतात, त्यावरच या कवायतींचे भवितव्य अवलंबून आहे. पंतप्रधान मोदी हे ‘हार्ड बार्गेनर’ म्हणून प्रसिद्ध आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडून, त्यांनी ते दाखवून दिले आहे. तेव्हा चीनची खुशीची गाजरे दिसायला कितीही गोजिरवाणी आणि  गोड वाटत असली तरी, त्यामागील राजकारणाच्या धूर्त चाली अाजमावूनच पुढची पावले टाकावी लागतील.

-- सकाळ

No comments:

Post a Comment