Tuesday 18 October 2016

पाकच्या शस्त्रसंधिभंगात एक जवान हुतात्मा - पीटीआय

श्रीनगर - राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष सीमारेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधिभंग केला. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात झालेल्या या चकमकीमध्ये एक जवान हुतात्मा झाला, तर एक जखमी झाल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क विभागातर्फे सांगण्यात आले.

"सर्जिकल स्ट्राइक‘च्या मोहिमेनंतर प्रत्यक्ष सीमारेषेवर आतापर्यंत 25 वेळा शस्त्रसंधीचा भंग करण्यात आला असल्याची माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. विशेषत: पाकव्याप्त काश्‍मीरमधून शस्त्रसंधीचा भंग अधिक प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच भागात दहशतवाद्यांचे तळ असल्याचाही भारतीय लष्कराला संशय आहे. पाकिस्तानच्या शस्त्रसंधिभंगाला भारतीय लष्कर जोरदार प्रत्युत्तर देत असल्याचेही या लष्करी अधिकाऱ्याने या वेळी सांगितले.

याआधी 8 ऑक्‍टोबरला पाकिस्तानी सैन्याने पूंच जिल्ह्यातील मेंधरकृष्णागती भागात केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान जखमी झाला होता, तर 5 ऑक्‍टोबरला पाकिस्तानी सैन्याने तीन वेळा शस्त्रसंधिभंग केला होता. राजौरी व पूंच जिल्ह्यामध्ये हे शस्त्रसंधिभंग करण्यात आले होते. त्याआधी 4 ऑक्‍टोबरला पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानांच्या तळावर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते. या हल्ल्यावेळी पाक सैन्याने बॉंबसह इतर स्फोटके व अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला होता. या वेळी भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्त्युत्तर दिले होते. या वेळी झालेल्या चकमकीमध्ये नऊ पाकिस्तानी सैनिक जखमी झाले होते.

राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टर, झानगर, कलसिआन, मक्री भागाला शस्त्रसंधिभंगाचा आतापर्यंत सर्वाधिक फटका बसलेला आहे.

उरी हल्ल्यानंतर या भागातील वातावरण तणावग्रस्त बनलेले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने होत असणाऱ्या शस्त्रसंधिभंगांचा स्थानिक नागरिकांना फटका बसत असून, जनजीवन पूर्णत: विस्कळित झाले आहे.

No comments:

Post a Comment