Wednesday 5 October 2016

लष्कराच्या कारवाईबाबत संशय नको

नवी दिल्ली - भारतीय लष्कराचे सर्जिकल स्ट्राइक बनावट असल्याचा पाकिस्तानचा प्रचार खोडून काढण्यासाठी या कारवाईचे व्हिडिओ पुरावे सरकारने जाहीर करावेत, अशी मागणी होत आहे. मात्र, भारतीय लष्कराने जाहीर केलेली माहिती विश्‍वासार्ह असून, त्यावर संशय घेणे अयोग्य आहे, असा निर्वाळा कॉंग्रेसने दिला आहे. त्याचप्रमाणे, सध्या पाकिस्तानशी चर्चेसाठी योग्य वातावरण नाही, असा सल्लाही सरकारला दिला आहे. 

कॉंग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी आज दैनंदिन वार्तालापादरम्यान लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइकला जोरदार पाठिंबा दर्शवला. एवढेच नव्हे तर पाकिस्तानने चालविलेला कुप्रचार खोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि केंद्र सरकारने त्या देशाला आंतराष्ट्रीय व्यासपीठावर उघडे पाडावे, असे आवाहनही केले. दहशतवादाचा त्रास भारताला होत असताना पाकिस्तानने कारवाई केली नाही म्हणूनच भारतीय लष्कराला करवाई करावी लागली हे सांगावे. अर्थात, ताज्या सर्जिकल स्ट्राइकचे व्हिडिओ सरकारने जाहीर करावेत काय, या मागणीवर शर्मा यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले आणि "हाती असलेल्या सर्व साधनांचा वापर करून पाकिस्तानचा ढोंगीपणा उघड करावा,‘ अशी सावध टिप्पणी केली.

शर्मा म्हणाले, की भारतीय लष्कराने या आधीही 2008, 2009, 2011 आणि 2013 मध्ये केले होते. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक पहिल्यांदाच झाले, असा दावा करणे म्हणजे लष्कराच्या क्षमतेवर शंका घेण्यासारखे आहे. कारवाईचा निर्णय लष्कराचा होता. मात्र, त्याबाबतची जाहीरपणे घोषणा करणे हा राजकीय निर्णय असून विद्यमान सरकारला राजकीय जबाबदारी घ्यावी, असे वाटत असले तर कॉंग्रेसचा त्याला आक्षेप नाही. परंतु, पाकिस्तानला अजूनही जागतिक पातळीवर एकाकी पाडता आलेले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. उरीतील हल्ल्यानंतर लगेच रशियाने पाकिस्तानसोबत लष्करी सराव केला आणि काल, इराणी नौदलाने पाकिस्तानी नौदलासोबत सराव केला आहे. त्यामुळे भारताला परराष्ट्र धोरणात आणखी आक्रमकता आणावी लागेल, असे ते म्हणाले.

भारत आणि पाकिस्तानदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चर्चा झाल्याच्या वृत्तावर बोलताना शर्मा यांनी सध्या पाकिस्तानशी चर्चेला अनुकूल वातावरण नाही, अशी टिप्पणी केली. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी कलावंतांनाही त्यांनी विरोध दर्शवला. दहशतवादी आणि कलावंत यांच्यात फरक आहे पाकिस्तानातील प्रत्येक नागरिक दहशतवादी नाही; परंतु जनतेमधील थेट संपर्कासाठीही वातावरण अनुकूल नाही, असे ते म्हणाले.

सर्जिकल स्ट्राइकबद्दल विधाने करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी परिपक्वता आणि संयम दाखविण्याची गरज आहे.
- आनंद शर्मा, प्रवक्ते, कॉंग्रेस

सकाळ न्यूज नेटवर्क

No comments:

Post a Comment