Saturday 15 October 2016

रशिया भारतात गुंतवणार 50 कोटी डॉलर्स

नवी दिल्ली: रशियन गुंतवणूक फंड ‘आरडीआयएफ‘ (रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड) भारतीय फंड ‘एनआयआयएफ‘सोबत मिळून भारतात संयुक्तरित्या सुमारे एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरील दिमित्रिव्ह यांनी दिली.

या संयुक्त फंडात आरडीआयएफ आणि एनआयआयएफचे (नॅशनल इन्वेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड) प्रत्येकी 50 कोटी डॉलर्सचे योगदान असणार आहे. यावरुन रशियन कंपन्यांचे चिनी कंपन्यांप्रमाणे भारतीय कंपन्यांसोबतदेखील संबंध प्रस्थापित होत असल्याचे अधोरेखित होत आहे. गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत या भागीदारीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर सुमारे 20 गुंतवणूक प्रस्तावांचा आढावा घेतला जाणार असून 2017 मध्ये पहिला करार करण्याचे फंडाचे उद्दिष्ट असल्याचे दिमित्रिव्ह यांनी सांगितले,

"एनआयआयएफच्या स्थापनेसाठी आम्ही मदत केली आहे. यापुढे आम्ही संयुक्त रशियन-भारतीय प्रकल्पांसाठी विशेषतः भारतात शेअर भांडवलाचा पुरवठा करु", असे दिमित्रिव्ह म्हणाले.

दिमित्रिव्ह यांनी 2011 साली आरडीआयएफची स्थापना केली होती. याआधी आरडीआयएफने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या भारत दौऱ्यावेळी भारतीय कंपनी आयडीएफसीसोबत मिळून भारतीय वीज प्रकल्पांमध्ये एक अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचा करार केला होता. नवे रस्ते, रेल्वे आणि वीज प्रकल्पांमध्ये गुंतवणूकीसाठी भारत सध्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या शोधात आहे.

No comments:

Post a Comment